जेव्हा रवी शास्त्री बूट घेऊन मियाँदादला हाणायला गेला होता….
१९८७ ची हि गोष्ट. पाकिस्तानचा संघ ५ टेस्ट आणि ६ वनडे मॅचेस खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आली होती. २० मार्चला हैदराबादमध्ये दोन्ही संघांमध्ये तिसरी वनडे मॅच खेळवण्यात आली. पाकिस्तानने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आणि स्वस्तात भारताच्या ओपेनर्स लोकांना बाद करून विजयाच्या दिशेने कूच करायला सुरवात केली होती.
पण नंतर रवी शास्त्री ६९ आणि कपिल देव ५९ या दोघांच्या खेळाच्या जोरावर ४४ ओव्हरमध्ये २१२ धावा बनवल्या. २१२ धावांचा पाठलाग करायला पाकिस्तानची टीम बॅटिंगला उतरली. पाकिस्तानने दणक्यात रनांचा पाठलाग करायला सुरवात केली पण नंतर फलंदाजांची हाराकिरी झाल्याने मॅच एंडला गेली. इतक्या एंडला गेला लोकांची उत्सुकता शिगेला पोहचली. अजूनही निर्णय झालेला नव्हता कि कोणता संघ विजयी ठरला आहे.
मॅचचा शेवटचा बॉल पाकिस्तानला विजयासाठी २ धावांची गरज होती. पण दुसरा रन चोरण्याचा नादात अब्दुल कादिर रनआऊट झाला. स्कोर लेव्हल झाली खरी पण या मॅचचा निर्णय झाला तत्कालीन नियमानुसार आणि भारताला यात विजयी ठरवण्यात आलं. या मॅचमध्ये भारताचे सहा खेळाडू बाद झालेले आणि पाकिस्तानचे ७ खेळाडू बाद झालेले. एका विकेटच्या फरकाने भारताला विजयी घोषित करण्यात आलं.
मॅच अशा वेगळ्याच निर्णयाने हरल्याने जावेद मियाँदादचा तिळपापड झाला आणि तो रागाने भारतीय ड्रेसिंग रूमच्या दिशेने गेला. भारतीय खेळाडू बसलेले होते आणि तिथं जाऊन जावेद मियांदाद म्हणाला कि तूम चीटिंग करके जीते हो….हे वाक्य कानावर पडताच रवी शास्त्रीला राग आला आणि त्यांनी हातात बूट उचलला.
लालबुंद झालेल्या शास्त्रींच्या चेहऱ्याकडे एकवार जावेद मियाँदादने बघितलं आणि नंतर त्यांच्या हातातल्या बुटाकडे बघितलं, रवी शास्त्री उठले आणि मियाँदादच्या दिशेने पळू लागले. मियांदाद ते दृश्य बघून सरळ पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूमच्या दिशेने पळत सुटला आणि पाठीमागे बूट मारायचा म्हणून रवी शास्त्री पळत सुटले.
शेवटी पाकिस्तानच्या ड्रेसिंगरुममध्ये शिरल्यावर इम्रान खानने रवी शास्त्रींना रोखलं नाही तर मियाँदादची चंपी शास्त्री करणार होते. इम्रान खानने ते प्रकरण शांत केलं आणि हातापायीची लढाई बोलून मिटवली.
पण रवी शास्त्री आणि जावेद मियांदाद यांनी हे प्रकरण जास्त वाढू दिलं नाही. पुढच्या मॅचसाठी त्यांनी एकत्र विमानप्रवास केला आणि नंतर कधीच कुठेही या प्रकरणाचा उल्लेख केला नाही. मग हा किस्सा पुढे आला तो रवी शास्त्रींनी लिहिलेल्या स्टारगेजिंग या पुस्तकात त्यांनी हे प्रकरण लिहिलंय.
स्पोर्टमनस्पिरिट म्हणजे काय असतं हे या किस्स्यातून कळलं पण त्या दिवशी इम्रान खान मध्ये आला नसता तर रवी शास्त्रींनी त्याची चांगलीच धुलाई केली असती.
हे हि वाच भिडू :
- २००७ च्या वर्ल्डकपला रवी शास्त्रींची भविष्यवाणी धोनीने चुकीची ठरवली होती
- कोहलीचे किती जरी लाडके असले तरी आता शास्त्री गुरुजींच्या गच्छंतीची वेळ जवळ आलीय..
- त्यानंतर रवी शास्त्रींनी दारूच्या नशेत कधीच कमिटमेंट दिली नाही.
- युवराज, पोलार्डच्या आधी शास्त्री गुरुजींनी सहा बॉलला सहा सिक्स ठोकले होते.