सर जडेजाच्या आयुष्यात दोन महेंद्रसिंह महत्वाचे आहेत, एक धोनी आणि दुसरे चौहान

आत्ताच्या घडीला आयपीएल मध्ये सगळ्यात जास्त धिंगाणा कोण घालत असेल तर तो म्हणजे सर रवींद्र जडेजा. आयपीएलच्या एका मॅचमध्ये हर्षल पटेलला एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्सर मारून जडेजाने हवा केली होती. आजही त्याची फिफ्टी झाल्यावर बॅट तलवारीसारखी काढून फिरवण्याची स्टाईल फॉरेनमध्येसुद्धा लोकप्रिय आहे. पण इथपर्यंत येण्यासाठी जडेजाच्या आयुष्यात दोन लोकं फार महत्वाचे आहेत. 

त्या दोन लोकांपैकी पहिले म्हणजे महेंद्रसिंग चौहान. अगोदर या महेंद्रसिंग चौहान यांच्याबद्दल जाणून घेऊया. 

जडेजाच्या घरी कोणालाच क्रिकेट आवडत नसायचं. पण रवींद्र जडेजा हा क्रिकेटच्या आहारी गेलेला खेळाडू होता. त्याला क्रिकेटचं इतकं वेड होतं की तो झोपेतसुद्धा क्रिकेट बद्दल बोलत असायचा. रवींद्र जडेजाचं क्रिकेटचं वाढतं वेड बघून त्याच्या वडिलांना त्याच्या भविष्याची काळजी लागून राहिली होती. त्यामुळे अधूनमधून त्या बाप मुलाचे खटके सुद्धा उडायचे. पण जडेजा काय बधला नाही.

रवींद्र जडेजा हा क्रिकेट क्लबमध्ये फास्टर बॉलर म्हणून खेळायचा आणि तो थोडीफार बॅटिंग करायचा. आता त्याला एका चांगल्या कोचची गरज होती जो त्याला योग्य दिशा देण्याच काम करील.

जडेजाच्या आयुष्यात ती व्यक्ती आली आणि तिचं नाव होतं महेंद्रसिंग चौहान. महेंद्रसिंग चौहान हे एक पोलीस ऑफीसर होते. क्रिकेटच्या वेडामुळे क्रिकेट बंगलो नावाचा एक क्लब चालवत होते. शाळेतली बरीच मुलं तिथं क्रिकेट प्रशिक्षण घ्यायला जात असे. 

महेंद्रसिंग चौहान यांनी जडेजाला हेरलं आणि सगळ्यात अगोदर त्याची हाइट बघून त्याची फास्ट बॉलिंग बंद केली आणि त्याला स्पिनर बनवण्याचं काम सुरू केलं. यानंतर जडेजा लेफ्ट आर्म ऑर्थोडोक्स स्पिनर बनला. महेंद्र चौहान हे कडक शिस्तीचे होते. खेळताना त्यांचं लक्ष पुर्णपणे जडेजावर असायचं. क्लब मॅचमध्ये जडेजाच्या चुका ते लिहून काढायचे आणि त्यानुसार त्यावर मात करून  जडेजा खेळ सुधरवत होता.

एका क्लब मॅचची ही गोष्ट. महेंद्रसिंग चौहान यांच्या क्लबमध्ये एक मॅच सुरू होती. 

त्या मॅचला जडेजाला भरपूर सिक्सर,चौकार पडत होते. जडेजाने भरपूर रन दिले होते. त्याची ओव्हर चालू असतानाच महेंद्रसिंग चौहान मैदानात गेले आणि जडेजाला त्यांनी फटकावून काढलं आणि समजावलं की तू कुठं चूक करतो आहेस. त्यानंतर मात्र जडेजा त्या माराने थाऱ्यावर आला आणि त्या मॅचला जडेजाने 5 विकेट मिळवल्या होत्या.

कोचच्या झापडीने त्याच्या डोळ्यावरची झापड उडाली आणि त्याच मॅचमध्ये 5 विकेट मिळवून जडेजाने कोचची शाबासकीसुद्धा मिळवली. इथून नंतर जडेजाने जो धुमाकूळ घातला तो तर आपण पाहतच आहोत. 

नंतर भारतीय संघात आल्यावर महेंद्रसिंग धोनीने त्याला सर ही पदवी दिली आणि तिथून पुढे रवींद्र जडेजा हा सर रवींद्र जडेजा झाला. जगातल्या उत्कृष्ट फिल्डर्समध्ये जडेजाचं नाव घेतलं जातं. आज घडीला जगातला सगळ्यात उत्तम ऑल राउंडर म्हणूनही जडेजाचा दबदबा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.