त्यादिवशी सर जडेजा आपल्याच टीमच्या खेळाडूसोबत थेट मैदानात भांडले होते.

भारतीय टीमचे ऑलराउंडर सर श्री श्री रविंद्र जडेजा यांचे अनेक किस्से क्राईम मास्टर गोगो प्रमाणे जगप्रसिद्ध आहेत. कधी कोणत्या कळा त्याला सुचतील हे सांगता येत नाही.

गोष्ट आहे २०१३ सालची. भारतीय क्रिकेट टीम वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेली होती. 

वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि भारत तिरंगी सामने होणार होते. पण दुर्दैवाने पहिल्याच मॅचमध्ये भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी जखमी झाला. श्रीलंकेविरुद्धच्या मॅच पासून विराट कोहलीला कप्तानी देण्यात आली होती.

पहिले दोन सामने आपण हरलो होतो. तिसरी मॅच यजमान वेस्ट इंडीजबरोबर होती. ड्वेन ब्रावोने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग निवडली. रोहित शर्मा, धवनने जबरदस्त ओपनिंग पार्टनरशिप करून दिली. त्यात नव्यानेच कॅप्टन बनलेल्या विराटने जोरदार शतक ठोकल.

भारताने विंडीजसमोर जिंकण्यासाठी ३१२ धावांचं आव्हान ठेवलं.

गेल ब्राव्हो पोलार्ड सारखे तगडे फलंदाज असल्यामुळे त्यांना हे टार्गेट अशक्य नव्हते. पण भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांनी भन्नाट सुरवात करून दिली.

युनिव्हर्सल बॉस गेल फक्त १० धावांवर, पोलार्ड डकवर आउट झाला. 

पंचवीस ओव्हर झाले तेव्हा वेस्ट इंडीजचे फक्त ११३ धावांवर ८ विकेटस पडले होते. मॅच भारताच्या हातात होती. पण आपले आक्रमक कॅप्टन विराट कोहली लवकर मॅच संपवण्यासाठी खेळाडूंना मोटिव्हेट करत होते. ही मॅच मोठ्या फरकाने जिंकलो तर आपल्याला बोनस पॉईंट मिळणार होता. सिरीजमध्ये आपले आव्हान कायम राहणार होते.

पण दुर्दैवाने नवव्या विकेटसाठी सुनील नरेन व केमार रोच यांची जोडी जमली. या दोघाही बॉलरनी अतिशय शांत व संयमी खेळी करून विकेट टिकवली. जरा लूज बॉल दिसला की त्याचा योग्य समाचार घेतला.

इतका वेळ खुश असलेल्या टीम इंडिया मध्ये या दोघांची पार्टनरशिप बघून टेन्शन येऊ लागलं.

विशेषतः भारताचे दोन स्पिनर अश्विन आणि जडेजा या दोघांना तर त्यांनी फोडून काढलं होत.

केमार रोच आणि सुनील नरेन आपल्याला सिक्स मारत आहेत हे पाहण सुद्धा वैताग देणारं ठरलं होत.

३१ वी ओव्हर टाकायला जड्डू आला. पहिल्याच बॉलला रोचने त्याला बाउन्ड्री हाणली. पाचव्या बॉलला स्ट्राईकवर आलेल्या सुनील नरेनने त्याला लॉंग ऑंनला उचलून शॉट मारला. बॉल खूप उंच गेला होता.

जडेजा ने कॅच असा जोरात कॉल दिला.

पण योगायोगाने तो झेल घेण्यासाठी भुवनेश्वर कुमार आणि रैना दोघे एकाच वेळी पोहचले. दोघांच्यात थोडं मिसकम्युनिकेशन झालं आणि रैनाने अगदी सिम्पल कॅच हातातून सोडला. जडेजाच तोंड बघण्यालायक झाल होतं.

पुढच्याच बॉलला रोचने जडेजाला पुढे येऊन सिक्सर मारला.

तो ओव्हरचा शेवटचा बॉल होता. पुढे ड्रिंक्स ब्रेक झाला. अचानक टीव्ही स्क्रीनवर दिसू लागले की रैना आणि जडेजामध्ये काही तरी बाचाबाची होत आहे. सुरेश रैना जडेजाच्या पाठीवर हात ठेवून काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पण जडेजा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. त्याच्या बोलण्यावरून तो प्रचंड शिव्या घालत असल्याप्रमाणे वाटत होतं.

कप्तान कोहलीने अखेर भांडणे सोडवली.

पुढच्याच ओव्हरला जडेजाने नरेन आणि रोचला सलग दोन बॉलमध्ये आउट काढले. रोचची तर स्टाईलमध्ये दांडी उडवली. मॅच जिंकल्यावर मात्र जडेजा आणि रैना हसत ग्राउंडमधून बाहेर पडताना दिसले. दोघांच्यातील वाद मिटल्यासारख वाटत होतं.

भारताने बोनस पॉईंट घेत मॅच जिंकली होती. कोहलीचा कप्तान म्हणून हा पहिला विजय होता शिवाय तो मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला होता.

पण त्यादिवशी सगळी चर्चा रैना आणि जडेजा यांच्यामधील भांडणाची होती.

तस बघायला गेलं तर मॅच दरम्यान अशा घटना बऱ्याचदा घडताना दिसतात पण फक्त एका कॅच सोडण्यावरून प्रकरण इतके तापणे हे पहिल्यांदा घडत होतं. आणि टीम इंडियाचे दोन खेळाडू मैदानात खुलेआम भांडत आहेत हे तर सगळ्या जगापुढे लाजिरवाणी गोष्ट होती.

या भांडणामागे रविंद्र जडेजाचा वाचाळपणा कारणीभूत ठरला होता. तो रैनाला म्हणाला होता की,

“कॅप्टन्सी मिली नही इसका मतलब फिल्डिंग पर भी ध्यान नही दोगे क्या ?”

त्याने रैनाच्या जखमेवर मीठ चोळल होत. खर तर विराट कोहलीच्या आधी रैना भारतीय टीमच्या कर्णधार पदाचा दावेदार होता. धोनीच्या अनुपस्थितीत २०११ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यात त्यानेच नेतृत्व केलं होतं. पण अचानक गेल्या काही महिन्यात कोहलीचा उदय झाला आणि रैनाच्या तोंडचा घास काढून घेतला गेला.

याचा अर्थ असा नव्हता की त्याने मुद्दामहून कॅच सोडला होता.

रैना खरतर जडेजाहून कितीतरी सिनियर. दोघेही धोनीचे दोस्त, चेन्नई सुपरकिंगमध्ये एकत्र खेळणारे खेळाडू. पण तरीही जडेजाने रागाच्या भरात थेट मैदानात त्याच्यावर आरोप केला व सगळ्या जगासमोर टीमची नाचक्की केली.

मैदानातून बाहेर येताना दोघे हसत हसत आले होते पण ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर परत त्यांची भांडणे झाली अशी चर्चा होती. बीसीसीआयचे चेअरमन जगमोहन दालमिया यांनी मिडिया समोर येऊन या घटनेवर कडक  कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले व कसबस हे प्रकरण मिटल.

आजही भारतीय टीमच्या काही लाजिरवाण्या प्रसंगामध्ये या घटनेचा समावेश होतो.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.