दृष्टी नव्हती तरी रामायणातील गाणी जिवंत केली. याच गाण्यांनी रामजन्मभूमीचा इतिहास घडवला

मै प्रेम की दिवाणी हूं फ्लॉप झाल्यावर खूप मोठा सेटबॅक बसलेले सूरज बडजात्या नवीन सिनेमा बनवत होते. या सिनेमा साठी त्यांनी बॅक टू बेसिक जायचं ठरवलं होतं. राजश्री प्रोडक्शनचे सिनेमे म्हणजे फॅमिली ड्रामा, प्रेम कहाणी, जुन्या परंपरा भारतीय संस्कृती याला धरून बनवलेला सिनेमा.

मै प्रेम की दिवानी हूं या पासून भटकला होता म्हणून फ्लॉप झाला होता.

मैने प्यार किया, हम आपके है कौन, हं साथ साथ है सारखे सुपरहिट सिनेमे बनवलेले सूरज बडजात्या यांच्या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य असायचं म्हणजे त्यातलं साधं सोपं शुद्ध भारतीय संगीत. या पूर्वी रामलक्ष्मण हे त्यांच्या सिनेमाला म्युजिक देत होते. पण मै प्रेम की दिवानी हूं वेळी त्यांनी अन्नू मलिक ला संगीताची जबाबदारी दिली. सिनेमा पेक्षाही याची गाणी सुपरफ्लॉप झाली होती.

विवाह साठी मात्र सूरज बडजात्या आपल्या राजश्री प्रोडक्शनच्या जुन्या पण आता विस्मरणात गेलेल्या संगीतकाराला परत घेऊन आले. शाहिद कपूर अमृता राव यांचा विवाह तुफान गाजला, सूरज बडजात्या यांचं पुनरागमन झालं. याच श्रेय त्यांनी सिनेमाच्या म्युजिकला दिलं.

आजही विवाह मधली गाणी ऐकली तर खास राजश्री ब्रँडच प्युअर म्युजिक जाणवतं.

या सिनेमाचं संगीत दिलं होतं एका अंध व्यक्तीने.

एखाद्याला कलेची आसक्ती असेल, तर तो कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ती कला जगत असतो. कलेचं सादरीकरण करताना शारीरिक व्याधी, दुखणं – खुपणं अशा कोणत्याच गोष्टींचा तो विचार करत नाही. त्याच्यापाशी असलेली प्रतिभा इतकी विलक्षण असते, की सर्व गोष्टींच्या पलिकडे जाऊन तो कलेचा आस्वाद घेतो. महाभारतात अर्जुन जसा धनुर्विद्येत निष्णात असतो. डोळ्यांना जरी पट्टी बांधली असली तरी अचूक नेम साधण्यात अर्जुन पारंगत असतो.

भारतीय सिनेसृष्टीत सुद्धा असाच एक संगीतकार होऊन गेला आहे, ज्याच्या डोळ्यांना जन्मतःच दृष्टी नव्हती. परंतु तरीही त्यांनी संगीतक्षेत्रात केलेलं काम अलौकिक आहे.

हा संगीतकार म्हणजे रवींद्र जैन. आज रवींद्र जैन यांचा स्मृतिदिन.

नव्या पिढीला रवींद्र जैन यांची थोडक्यात ओळख सांगायची झाली, तर रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका लॉकडाऊन मध्ये पुन्हा दाखवली गेली होती. या मालिकेचा घरबसल्या अनुभव सर्वांनी घेतला असेल. ‘रामायण’ मालिकेच्या संगीताची संपूर्ण धुरा सांभाळली होती रवींद्र जैन यांनी.

या मालिकेत जवळपास प्रत्येक भागांमध्ये एकतरी गाणं ऐकायला मिळतं. ही गाणी, मालिकेसंबंधी असलेलं इतर संगीत रवींद्र जैन यांनी दिलं आहे. शिवाय गायलं देखील आहे.

रवींद्र जैन यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९४४ रोजी अलीगढ येथे झाला.

ते जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांचा श्वास सुरू होता परंतु डोळे बंद होते. शेवटी डॉक्टरांनी काहीतरी करून लहानग्या रवींद्रचे डोळे उघडले. परंतु डोळे उघडले असले तरी त्या डोळ्यांतून रविंद्रला जग बघता येणार नव्हतं. एका मुलाखतीमध्ये रवींद्र यांनी खुलासा केला,

“देवाने माझ्या डोळ्यांना दृष्टी नाही दिली. परंतु माझ्या बुध्दीला त्याने प्रकाशित केले. यासाठी मी देवाचे आभार मानतो.”

रवींद्र यांचे वडील एक जैन पंडित होते. त्यांचं नाव इंद्रमणी जैन. त्यांनीच रविंद्रला लहानपणी एक हार्मोनियम खरेदी करून दिली. रवींद्र बाबांसोबत मंदिरात जायचे.

देवळात होणारं‌ भजन रविंद्रच्या कानावर पडायचं. हे भजन हळूहळू रवींद्र शिकत गेले.

लहानपणी मंदिरात कानावर पडलेल्या धून, संगीत ऐकून रवींद्र यांना संगीताचं रीतसर शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यामुळे ते आपल्या काकांसोबत कलकत्त्याला आले. इथे आल्यावर राधेश्याम झुनझुनवाला यांच्याकडे त्यांनी संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि हळूहळू ओळखी वाढल्या आणि याच ओळखींमुळे त्यांनी मुंबईची वाट धरली.

संगीतक्षेत्रात स्ट्रगल करणाऱ्या रवींद्र जैन यांना पहिला सिनेमा मिळाला तो म्हणजे राजश्री प्रोडक्शन निर्मित ‘सौदागर’. सिनेमा इतका चालला नाही. परंतु रवींद्र यांनी संगीतबद्ध केलेलं ‘सजना है मुझे, सजना के लिये’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. या सिनेमानंतर ‘चोर मचाये शोर’, ‘अखियो के झरोको से’, ‘दो जासुस’, ‘पती, पत्नी और वो’, ‘नदिया के पार’ अशा अनेक सिनेमांना रवींद्र जैन यांनी संगीत दिले. त्यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीत त्यांचं सर्वात वेगळं आणि सुंदर काम म्हणजे ‘रामायण’.

१९८७ साली आलेल्या ‘रामायण’ या मालिकेच्या संगीताचं शिवधनुष्य रवींद्र जैन यांनी यशस्वीरीत्या पेललं. पौराणिक मालिकेच्या विषयानुसार त्यांनी दिलेलं संगीत हे उल्लेखनीय म्हणता येईल.

त्यांनी बनवलेली ही गाणी एवढी गाजली याचा वापर विश्व हिंदू परिषदे ने आणि भाजपने रथयात्रेत केला. रामजन्मभूमीची जनजागृती करण्यात रवींद्र जैन यांची मंदिर वही बनाएंगे वगैरे गाणी प्रचंड उपयोगी पडली.

पांच रुपइया दे दे रे भैया, राम शिला के नाम, राम के घर में लग जाएगा पत्थर तेरे नाम’

अडवाणी यांच्या साक्षीने जेव्हा रवींद्र जैन हे गाणे गायचे तेव्हा सामान्य माणसापासून ते साधू संतापर्यंत प्रत्येकजण पेटून उठायचा. स्टेजवर येऊन नाचायला लागायचा.

परवा नरेंद्र मोदी यांनी राममंदिराचे भूमीपूजन केले तेव्हा देखील बॅकग्राउंडला रवींद्र जैन यांच्या आवाजात रामचरितमानस वाजलं जात होतं.

तुम्हाला वाचताना कदाचित प्रश्न पडला असेल, की डोळ्यांनी दिसत नसलं तरी इतक्या सहज गोष्टी त्यांना कशा लाभल्या. रवींद्र जैन यांनी स्वतःच्या कामाने संगीतक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली हे खरं आहे.

परंतु सुरुवातीच्या आयुष्यात त्यांच्या वाटेला आलेला हा प्रसंग रवींद्र जैन विसरले नाहीत. झालं असं, रवींद्र जैन लहानपणी मंदिरात भजन गायचे.

केवळ मंदिरात नाही तर मित्रांसोबत रस्त्यावरून चालताना सुद्धा रवींद्र भजन गायचे.

एकदा रवींद्र आणि त्यांचे मित्र अलीगढ स्टेशनवर आले. तेव्हा रवींद्र भजन गात एका बाकड्यावर मित्रांसोबत बसले होते. तेव्हा जाणाऱ्या काही प्रवाशांनी रवींद्रच्या हातावर पैसे ठेवले. असे पैसे मिळाल्यामुळे रवींद्रला आनंद झाला. ते खुशीत घरी आले आणि त्यांनी वडिलांना हे पैसे दाखवले. हे पैसे कसे मिळाले याची सुद्धा हकीकत सांगितली. हे ऐकुन वडिलांना फार वाईट वाटलं.

“यापुढे आयुष्यात तू पुन्हा अशा पद्धतीने पैसे कमावणार नाहीस, हे लक्षात ठेव.”

असं वडील रविंद्रला म्हणाले. झाला प्रकार रवींद्र यांच्या लक्षात आला आणि त्यांनी पुढे पैसे अशा मार्गाने कमावणार नाही, असं वडिलांना वचन दिलं.

रवींद्र जैन यांचा भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन सन्मान केला तसेच ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट संगीतकार’ म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

एरवी छोट्या छोट्या शारीरिक त्रासाने कुरुबरी करणाऱ्या आपल्यासारख्या माणसांना जन्मतःच दृष्टी नसलेल्या रवींद्र जैन यांचं आयुष्य नक्कीच प्रेरणादायी आहे. रवींद्र जैन यांनी लिहिलेल्या या ओळी त्यांच्या आयुष्याचा पट आपल्यासमोर उलगडतात. रवींद्र जैन लिहितात,

ऊंचे महल के झरोखे से तुम, अंबर की शोभा निहारो जरा,
रंगो से रंगो का ये मेल जो, आँखो से मन मे उतारो जरा.
सूनैना, दूर आसमानों को तुम देखो, और मे तुम्हे देखते हुए देखु,
मैं बस तुम्हे देखते हूए देखू

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.