मतदानाचं वय २१ होतं अन् दाजी १८ व्या वर्षी गावचं सरपंच झालं…

रावसाहेब दानवे. जालन्याचे खासदार. आणि सध्याचे केंद्रीय Consumer Affairs राज्यमंत्री. गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून सुरु झालेला राजकीय प्रवास आज देशाच्या केंद्रीय मंत्र्यांपर्यंत आला आहे. यापूर्वी २०१४ ला देखील त्यांच्याकडे हेच खातं होत.

२०१४ ला मंत्री होण्यापूर्वी महाराष्ट्र सोडला तर बाहेर कुठे जास्त नाव परिचित नव्हतं. जास्त म्हणण्यापेक्षा अजिबातच नव्हतं. खुद्द दानवेंच भाषणांमध्ये सांगायचे.

कार्यकर्ता पत्र जरी मागायला आला तरी तू माझा शर्ट घे पण पत्र नको. काय करतो पत्र घेऊन? असा प्रश्न विचारायचे.

जालन्यात देखील ते अशाच बिनधास्त भाषणांसाठी प्रसिद्ध होते. बोलण्याल्या बिनधास्त पणा, त्यातला गावरान बाज, मुद्देसूद मांडणीपेक्षा अगळ-पगळ बोलून समोरच्या कार्यकर्त्यांची मन जिंकणारा नेता अशी ओळख त्यांनी मिळवली होती.

त्यांच्या अशाच बिनधास्त बोलण्यातून रावसाहेबांनी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीचा रंजक किस्सा २०१७ मध्ये औरंगाबादमध्ये पार पडलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सत्कार मेळाव्यात सांगितलं आहे.

आज ग्रामपंचायत मतदानाच्या दिवशी खास ‘बोल भिडू’च्या वाचकांसाठी.

खरतर त्यांनी राजकारणात पडावं असं त्यांच्या घरातल्यांना अजिबात वाटत नव्हतं. नोकरी करून चार पैसे कमवावे असा अट्टहास होता. पण दानवे जनता पक्षातून राजकारणात आले. १९७७ चा तो काळ, देशात नव्यानेच जनता पक्षाची स्थापना झाली होती.

आपल्या राजकीय प्रवेशाबद्दल दानवे सांगतात,

“आमच्या गावात कोणी अध्यक्ष व्हायला तयार नव्हतं. मग मीच अध्यक्ष झालो. त्यावर्षींच्या लोकसभा आणि १९७८ ला विधानसभेला दोन्हीकडे फुल्ल जोशात प्रचार केला, दोन्ही उमेदवार निवडून आले.”

त्यानंतर काही महिन्यातच ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाली. रावसाहेब दानवे यांचे आजोबा दशरथ बाबा गणपत पाटील दानवे हे त्यांच्या जवखेडा गावासोबतच पंचक्रोशीतलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होतं. दानवे यांनी सुरुवातीला घरी ग्रामपंचायत लढविण्याची इच्छा बोलून दाखवली. पण वडील आणि आजोबांसह सगळ्यांनीच विरोध केला.

पण त्यानंतर देखील रावसाहेब दानवे यांनी जालन्याहून परत येताना चार-पाच मित्रांना बरोबर घेतलं आणि थेट ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरूनच गावात परतले. फॉर्म भरल्याचं घरात या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही.

त्यावेळी जवखेडा बुद्रुक ,जवखेडा खुर्द आणि पळासखेडा अशा तीन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत होती. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत जवखेडा गावातून रावसाहेबांच्या आजोबांनी म्हणजे दशरथ बाबांनी दोन उमेदवार बिनविरोध द्यायच ठरवलं. पण दुसरीकडे रावसाहेबांची मात्र निवडणूक लढवायची खटपट चालू होती.

अर्जाची छाननी झाली, आणि चिन्ह वाटपाच्या वेळेला रावसाहेबांनी फॉर्म भरला असल्याचं घरी समजलं; घरात तुफान वाद झाला. तरी ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते.

गावातल्या पारावर बैठक बसली, रावसाहेबांच्या उमेदवारीवर चर्चा झाली. दशरथ बाबांनी गावकऱ्यांना सांगितले की

“माझ्या दोन माणसांनाच मतदान करा, रावसाहेब जरी माझा नातू असला तरी त्याला मतदान करू नका. दुसऱ्या बाजूनं रावसाहेबांनी प्रचार लावून धरला होता.

प्रचारासाठी लोकांच्या घरी गेल्यावर गावातली माणसं सांगायची,

“रावसाहेब तुझ्या आजोबांनी सांगितलं तरच आम्ही तुला मतदान करणार, नाहीतर नाही”

यावर अहो, माझे आजोबा नातवाला मतदान करा असं कशाला म्हणतील? असं म्हणत त्यांनी गावकऱ्यांसमोर गुगली टाकली. आजोबा-नातवाच्या भांडणात साऱ्या गावाच्या डोक्यात मुंग्या येत होत्या.

झालं, पारावर परत बैठक बसली, गावातल्या इतर जेष्ठांनी दशरथ बाबांना समजावलं,

जर तुमचा नातू निवडणुकीत हरला तर पंचक्रोशीत तुमच्याबद्दल चांगलं बोलणार नाहीत. त्यामुळे तुमची प्रतिष्ठा जाईल ते वेगळीच.

मग दशरथ बाबांनाही हे पटलं. शेवटी रावसाहेबांना मतदान करायचं ठरलं. पण निवडून देण्या आधीच रावसाहेबांनी निवडून आल्यावर लगेच राजीनामा द्यायचा अशी अट आजोबांनी घातली. यानंतर विरोधी उमेदवार असलेले यशवंतराव बापू पुंगळे यांनीच रावसाहेबांना मतदान करा म्हणत प्रचार सुरु केला.

हि अडचण संपतीय तो पर्यंत दुसरी उभी. त्यावेळी त्यांच्या गावात बूथ नव्हते, त्यामुळे दुसऱ्या गावात जाऊन मतदान करायला लागायचं. त्यावर दानवेंनी गावात बूथ पाहिजे म्हणत तहसिलदारांकडे आग्रह धरला. तर २५० मतदार असल्याशिवाय बूथ मिळणार नाही असे तहसीलदारांनी सांगितलं. पण चारशे लोकसंख्या असणाऱ्या गावात २१० एवढंच मतदान होते.

आता एवढे मतदार आणायचे कुठून असा प्रश्न पडला. यावर त्यांनी आयडिया केली.

ते सांगतात,

मी आजूबाजूच्या गावातले पोर जमा केली, त्यांची नाव मतदार यादीत टाकली. तेव्हा मतदानाच वय २१ होत, पण फुल पॅन्ट घातली की तो मतदानाला पात्र समजला जात होता. त्यामुळे गावाला बुथ मिळाले. मतदान झाले, मतमोजणीला सायकलवरनं भोकरदनला गेलो, निवडून आलो आणि दोन्ही संकटांवर मात करत अठराव्या वर्षी सरपंच झालो.

दानवे आज जरी केंद्रात मंत्री असले तरी त्यांची राजकीय कारकीर्द ही वयाच्या १८ वर्षी पासूनच सुरु झाली. ज्या काळात पोरांना निवडणुकीला मतदान करण्याचा अधिकार मिळाला, त्या वयात रावसाहेबांनी गावचं सरपंच होऊन दाखवलं होत. आणि हे ते देखील अगदी मनमोकळ्यापणे कार्यकर्त्यांसमोर आजही सांगतात.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.