हनी ट्रॅपमध्ये अडकून ‘रॉ’ च सगळ्यात जास्त नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्याची गोष्ट?
हनी ट्रॅप ही अलीकडच्या काळात सर्रास वापरली जाणारी गोष्ट, सैन्यातील अधिकारी, ‘रॉ’चे अधिकारी, आयएएस, आयपीएस ऑफिसर्स यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून देशासाठी गोपनीय असलेली माहिती काढून घेणे हा याचा मुख्य उद्देश.
पण पूर्वीच्या काळात म्हणजे १९८०-९० च्या दशकांमध्ये ही हनी ट्रॅप ही खूपच नवखी आणि मोठी गोष्ट होती, १९८५ मध्ये जेव्हा ‘रॉ’चा अधिकारी यात अडकला तेव्हा देशासाठी हा खूप मोठा मोठा धक्का होता.
१९८१ साल होत. १९६२ च्या आयपीएस बॅचचे जेष्ठ अधिकाऱ्याला ‘रॉ’ मध्ये नियुक्त केले गेले. नवीन नवीनच असल्यामुळे पोस्टिंग बाजूच्याच श्रीलंका देशात झाली.
के. व्ही. उन्नीकृष्णन, असं त्या अधिकाऱ्याचं नाव.
कोलंबोमध्ये राहत असताना त्यांची भेट अमेरिका दूतावासातील एका व्यक्तीशी झाली. भेट वाढत गेली, बोलणं वाढलं साहजिकच नुसती ओळख न राहता आता दोघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली. मग बाहेर जाण, एकत्र जेवण करण, पार्ट्या करणं अशा गोष्टी सुरु झाल्या. मैत्री एवढी वाढली की, आता कॉलेजच्या मित्रांसारखे दोघे एखाद्या वेश्येकडे जाऊन पैसे देऊन संबंध बनवायचे.
उन्नीकृष्णन यांना त्यावेळी कसलाच अंदाज नव्हता की, ते कसे एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होत आहेत आणि अमेरिकेच्या जाळ्यात फसत आहेत.
एक वेल ट्रेंड इंटेलिजन्स ऑफिसर सारख उन्नीकृष्णनच्या त्या मित्राने एका योग्य वेळेची वाट बघितली.
१९८५ मध्ये त्यांची नियुक्ती दिल्लीमध्ये होती. यानंतर त्यांना ‘रॉ’च्या सगळ्यात महत्वपूर्ण मिशनची जबाबदारी देण्यात आली. तामिळ शस्त्रास्त्र आंदोलन, श्रीलंकेमध्ये भारताच्या शांती सेनेचं ऑपरेशन, यासाठी त्यांना मद्रासमध्ये नियुक्त केले गेले.
याच दरम्यान त्यांना मुंबईवरून एक फोन येतो. तो फोन एका मुलीचा होता, जी स्वतःला पॅन अमेरिकन एअरवेजची एअर होस्टेस असल्याचे सांगते. सोबतच तो नंबर तिला अमेरिकेच्या त्यांच्याच एका जुन्या मित्राने दिला असून भारतात जर एकटे वाटले तर या नंबरवर फोन कर म्हणून फोन केला असल्याचे सांगते.
झालं.. उन्नी त्या मुलीच्या बोलण्यात फसतात, ते मद्रासवरून मुंबईत येतात, इथे दोघांची भेट होते, ओळख वाढते, काही दिवसातच दोघांचं प्रेम शारिरीक संबंधामध्ये बदलते. मुलगी उन्नीला सिंगापूरची मोफत तिकीट देते. दोघे जण सुट्टीसाठी सिंगापूरला जातात. तिथे दोघांच्यात झालेली जवळीक कॅमेरामध्ये कैद झाली. उन्नी आता या जाळ्यात पूर्णपणे फसले होते.
यानंतरच्या आपल्या पोस्टिंगच्या कालावधीमध्ये त्यांनी अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएला खुप साऱ्या गोपनीय गोष्टी पुरवल्या, यामध्ये तामिळ टायगर्सचे ट्रेनिंग, शस्त्रास्त्र पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून बरीचशी माहिती सीआयएच्या हाती लागली.
यासह भारत शांती सेनेच्या ऑपरेशनशी जोडलेली अनेक संवेदनशील कागपत्रांचा देखील समावेश होता. त्यांनी श्रीलंका सरकारसोबत ‘भारत शांती वार्ता’साठी ठरलेल्या अनेक निर्णयांची माहिती लीक केली.
उन्नी यांनी देशासोबत केलेली ही फसवणूक भारताच्या श्रीलंका मिशनच्या अपयशाच मोठं कारण सांगितले गेले. त्यावेळी ‘रॉ’ च्या इतिहासात उन्नी पहिले असे ऑफिसर होते, ज्यांनी हनी ट्रॅपमध्ये फसून एजन्सीचे आणि देशाचे इतके मोठे नुकसान केले होते.
राजीव गांधीच्या हत्येवर बनलेला मद्रास कॅफे या चित्रपटामध्ये ‘बाला’ चा रोल उन्नीवरच आधारित आहे. पण चित्रपटामध्ये बाला स्वतःला गोळी मारतो, पण सत्य परिस्थिती थोडी वेगळी आहे.
१९८६ मध्ये उन्नीची कृत्य गुप्तचर संस्थेच्या समोर येतात, १९८७ मध्ये त्यांना अटक केली, आणि कोणत्याही केस शिवाय बराच काळ तिहारच्या कारागृहात ठेवले गेले. पण कालांतराने मात्र सबळ पुराव्यांअभावी सोडून दिले. सध्या ते चेन्नईमध्ये लो-प्रोफाइल आयुष्य जगत आहेत.
त्यांची सुटका जरी झाली असली तरी त्यांच्या नावावरच धब्बा कधी हटला नाही. आजही त्यांना हनीट्रॅपमध्ये अडकलेला गुप्तहेर म्हणूनच ओळखलं जातं. अनेक बातम्यांमध्ये त्यांचे नाव आरोपी म्हणून येतच राहते.
हे ही वाच भिडू.
- वयाने वीस वर्षे लहान पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडली पण तो ISI चा एजंट निघाला.
- रेमंडवाल्यांनी कंडोम बनवलं आणि भारताला कळालं यात पण स्टाईल असते
- पाकिस्तानी पंतप्रधान भारतीय गर्लफ्रेंडसाठी फोनवर गाणी गायचा आणि हे सिक्रेट पवारांनां कळालं