रॉ चे अधिकारी म्हणाले, पुढचा पंतप्रधान मराठा होईल, पण कोण…?
देशाचा पुढचा पंतप्रधान मराठा बनेल !
असं कुण्या राजकीय नेत्यांचं वक्तव्य नसून रॉचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्लत यांचं वक्तव्य आहे. अमरजीत सिंह दुल्लत यांना पुण्याच्या सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. याच पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी असं विधान केलं कि,
देशाचा पुढचा पंतप्रधान मराठा बनेल !
गेल्या ७५ वर्षांत महाराष्ट्राचा एकही नेता देशाचा पंतप्रधान बनू शकला नाही. महाराष्ट्रातून एक पंतप्रधान गेला पाहिजे, मराठी माणसाने आता देशाचं नेतृत्व करायचा विचार केला पाहिजे असं सर्वांनाच वाटते.
त्यात अमरजीत सिंह दुल्लत यांच्या विधानासंदर्भात बोलायचं झालं तर, महाराष्ट्रातले असे कोणते मराठा म्हणजेच थोडक्यात मराठी चेहरे आहेत जे भविष्यात देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होऊ शकतात?
यासाठी आम्ही काही नावं काढलीत ज्यांची भविष्यात पंतप्रधान पदावर वर्णी लागू शकते…
शरद पवार
शरद पवारांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीतला प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणाचा दांडगा अनुभव, राज्याच्या राजकारणात असणारं महत्वाचं स्थान हे जमेच्या बाजू आहेत. आता तिसऱ्या आघाडीदेखील पवारांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे चिन्हं आपण बघतोय.
पंतप्रधानपदांच्या रेसमध्ये महाराष्ट्रातून पवारांचं नाव कायमच चर्चेत येत असतं. १९९१ मध्ये राजीव गांधीच्या मृत्यूनंतर जेंव्हा जेंव्हा पंतप्रधान पदाची चर्चा रंगात आली तेव्हा तेव्हा शरद पवारांचं नाव चर्चेत आलं.
१९९१, १९९६ आणि २००९ मध्ये देखील शरद पवार पंतप्रधान पदाच्या जवळ गेले होते. ती संधी कधी नरसिंहरावांना मिळाली तर कधी मनमोहनसिंगांना. मात्र पवारांचं चर्चेपुरतंच मर्यादित राहिलं. भाजपला सत्तेपासून लांब ठेवत त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग केला.
पंतप्रधान बनण्याच्या रेसमध्ये पवार यांच्या मार्गात आत्ताच्या घडीला काँग्रेसमधून कुणी मोठा प्रतिस्पर्धी नाहीये. त्यात शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष बनवायचा प्रस्ताव देखील अनेकदा आलेले. त्यामुळे पवार आता पंतप्रधान पदासाठी सर्व पक्षांची मोट बांधायला लागतील.
उद्धव ठाकरे
प्रादेशिक पक्ष असलेला मराठी पक्ष देशाच्या राजकारणात कसा उतरणार त्यावर उत्तर म्हणजे अलीकडेच ५ राज्यात सेनेने आपले उमेदवार उतरवले होते, तसं तर १९८९ पासूनच सेनेने राज्याबाहेर निवडणूक लढवल्यात. भले हाती अपयश आलं असेल पण या निवडणुकांच्या निमित्ताने आपला ‘प्रादेशिक’ पक्ष ‘राष्ट्रीय’ करण्याचा मार्ग आहे.
सेनेची दिल्लीतील ताकद बघायची तर शिवसेनेचे लोकसभेत १८ खासदार आहेत आणि राज्यसभेत ३ खासदार आहेत. मात्र या पक्षाला राष्ट्रीय राजकारणाचा जुना अनुभव आहे.
पण २०२४ मध्ये उद्धव ठाकरे देखील पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये असणार हे पक्कंय कारण…
अलीकडेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं कि, “२०२४ मध्ये आपण दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच”, तसेच संजय राऊत यांनी देखील, “२०२४ पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यत पोहचली असेल” असं विधान केलं होतं.
उद्धव ठाकरे यांनी देखील मागेच म्हणाले होते कि, भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्त्व नक्की करेल. या विधानांवरून सेना देशापातळीवर नेतृत्व करणार याला दुजोरा मिळतो. त्यात अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्या भेटीच्या केंद्रस्थानी हाच मुद्दा होता कि, २०२४ मध्ये मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं होतं.
नितीन गडकरी
महाराष्ट्राचाच प्रधानमंत्री झाला पाहिजे असं मला अज्जीबात वाटत नाही, उद्या जर एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल तर तो प्रधानमंत्री होईल. त्याला ती संधी मिळेल असं मागे एकदा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते.
विकासकामांचा निकष लावायचा झाला तर गडकरींचा हात कुणीच धरू शकत नाही. मोदी सरकारमध्ये सर्वोत्तम मंत्री कोण असं विचारलं तर बहुमताने लोक गडकरी यांचं नाव घेतील.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जर भाजपला देशात एकहाती सत्ता मिळाली तर भाजपचा प्लॅन बी म्हणून जितकं नाव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव येतं तितकंच महत्व गडकरींच्या नावाला देखील आहे.
खूप वर्षांनी नितीन गडकरी यांच्या रूपाने मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष एक मराठी माणूस झाला होता. तेंव्हाच गडकरी पंतप्रधानपदाच्या चर्चेत आले होते. भ्रष्टाचाराचे आरोप झाले अन पंतप्रधानपदाच्या रेसमधून ते मागे पडले. पण मराठी माणूस म्हणून गडकरी पंतप्रधान व्हावेत ही इच्छा अनेक मराठी लोकं बोलून दाखवतात.
देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात पुन्हा एकदा जर भाजपची सत्ता आली अन मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले तर भविष्यात त्यांचंही नाव पंतप्रधान पदाच्या पर्यायी नावांमध्ये येणार. पण त्यांच्यासाठी हा मार्ग वाटतोय तितका सोपा नसणारे कारण या रेसमध्ये नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांचंही नाव असणार आहे. योगींनंतर सर्वात जास्त खासदारांना लोकसभेत पाठवणारे फडणवीसच आहेत.
२०१३ मध्ये फडणवीस यांची प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड झाली. महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढविण्यात त्यांचा मोठा रोल हे कुणीच नाकारू शकत नाही.
राजकीय जाणकारांच्या मते, २०१४ च्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीनंतर फडणवीस हे मोदींचे फेव्हरेट झालेत. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या साच्यातले प्रशासक अशी प्रतिमा सातत्याने विकसित केलीये. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करण्यात मोदी आणि शहा यांना यश आले आहे.
भविष्यात पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये फडणवीस हे ‘लंबी शर्यतीचा घोडा’ म्हणून मानले जातात कारण त्यांचं वय ५० च्या जवळपास आहे. थोडक्यात २०५० पर्यंत महाराष्ट्रातून अनेक पंतप्रधान होऊ शकतात पण त्यात वय जास्त असलेल्या गडकरी किंव्हा पवारांना हे लागू होणार नाही.
फडणवीस यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरील निष्ठा आणि राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ आहे. या सगळ्या जोरावर भविष्यात फडणवीस देखील पंतप्रधान पदापर्यंत पोहचतील हे फिक्स आहे.
आता हि चार नावं आम्ही काढलीत…बाकी तुम्हीही तुमच्या वतीने काही मराठी नावं सुचवू शकताय..
हे हि वाच भिडू :
- स्वत:ला “बुद्धांच्या संघाचा” म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंचा असा आहे इतिहास…
- ST कर्मचारी बंगल्यात घुसले चप्पल व दगडफेक : नेमकं काय घडल सिल्व्हर ओकवर..?
- हिंदी देशाची अधिकृत भाषा म्हणून जाहीर करणाऱ्या शास्त्रीजींना माघार घ्यावी लागली होती