फक्त रावणाची भूमिका केली म्हणून त्यांना अयोध्येत प्रवेश नाकारण्यात आला होता…

सध्या बॉलिवूडमधला एकच विषय ट्रेंडिंगमध्ये आहे तो म्हणजे आदिपुरुषचा टिझर. रामायणावर आधारित असलेल्या या सिनेमात वापरण्यात आलेलं VFX, राम, सीता आणि हनुमान यांचा पेहराव हे मुद्दे तर चर्चेत आहेतच, पण सगळ्यात जास्त टीका होतीये ती रावणाच्या लूकवरुन.

अभिनेता सैफ अली खान या चित्रपटात रावणाची भूमिका साकारतोय. स्पाईक्स केलेला हेअरकट, डोळ्यांखाली सुरमा, पुष्पक विमानाऐवजी वटवाघूळ आणि एखादा मुघल सम्राट असावा तसा लूक यामुळं सैफ अली खान टीकेच्या केंद्रस्थानी आहे.

सैफ वर टीका करत असताना एक गोष्ट मात्र वारंवार बोलली जात आहे, ती म्हणजे रावण साकारावा तो अरविंद त्रिवेदी यांनीच.

ते साल होतं १९९४ चं. खासदार अरविंद त्रिवेदी अयोध्येच्या हनुमान गढीत हनुमानाच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हा तिथे रेवती बाबा नावाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी खासदार अरविंद त्रिवेदी यांना हनुमानाच दर्शन घेता येणार नाही अशी भूमिका घेतली.

खासदाराला दर्शन नाकारणं ही मोठी गोष्ट होती. प्रशासनाकडे तक्रार गेली. प्रशासन हजर झाले. पुजाऱ्यांना विनंती करण्यात आली पण पुजारी काही केल्या या माणसाला हनुमानाचं दर्शन घेता येणार नाही यावर ठाम होते.

पुजाऱ्यांना कारण विचारल्यानंतर पुजारी म्हणाले,

हा माणूस हनुमानजींना वारंवार मरकट म्हणतो. प्रभू श्री रामांना वन वन भटकता वनवासी म्हणतो.

अखेर अरविंद त्रिवेदी तिथून निघून गेले. त्यांचा गुन्हा काय होता तर प्रसिद्ध अशा रामायण हा सिरीयलमध्ये त्यांनी रावणाचा रोल केला होता.

त्यावेळी जग वेगळ होतं. लोक खलनायक म्हणून प्राण या अभिनेत्यावर देखील हल्ले करत होते. रामायण बघताना चप्पल काढून पाहणारी तर जय संतोषी मॉं पिक्चरसाठी थिएटरमध्ये पंचारती घेवून जाणारी माणसं होती. अशा काळात अरविंद त्रिवेदी यांनी छोट्या पडद्यावर आपली रावण म्हणून छाप सोडली होती.

मात्र खऱ्या आयुष्यात हा माणूस रामभक्त होता. त्यांनी आपल्या घराच्या बाहेर श्री राम दरबार असा बोर्ड लावला होता. वारंवार सिरियलमध्ये प्रभू श्री रामांचा अपमान केल्यामुळे त्यांनी रामायणाचे पठण सुरू ठेवले होते.

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैनचा.

पुढे हे कुटूंब इंदौरला स्थायिक झाले. त्यांचा मोठा भाऊ उपेंद्र हा गुजराती नाटकांमध्ये काम करायचा. भावाच्या पाऊलावर पाऊल टाकून हा माणूस नाटक, सिनेमांच्या नादाला लागला. रामायण सिरियलसाठी ऑडिशन सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर या सिरियलमधील केवट या पात्रासाठी त्यांनी ऑडिशन देण्याच निश्चित केलं. ठरल्याप्रमाणे त्यांनी ऑडिशन दिली.

मात्र इथे एक घोळ झाला. रामानंद सागर यांना हा माणूस रावणाच्या भूमिकेसाठी परफेक्ट वाटला. वास्तविक आयुष्यात रामभक्त असणाऱ्या माणसाला रावण साकारण्याची भूमिका देण्यात आली.

भूमिकेचा झालेला एकमेव फायदा म्हणजे ज्या ठिकाणी रावणाला पुजले जाते तिथे त्यांना यथोचित सन्मान मिळत गेला. दक्षिणेकडील राज्यात व श्रीलंकेत देखील त्यांना ओळख मिळाली. रावणदेवाला पुजणारे अरविंद त्रिवेदींना पुजू लागले.

मात्र त्यांना नाही म्हणायला मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक मंदीरात त्यांना प्रवेश नाकारला जात असे. त्यांनी विक्रम वेताळ, विश्वामित्र अशा सिरियलमध्ये काम केलं पण रावणाच्या भूमिकेने त्यांची पाठ कधीही सोडली नाही.

वेगवेगळ्या राजकिय पक्षांनी मात्र रामायणाच्या लोकप्रियतेचा अचूक फायदा घेतला.

रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांना राजीव गांधींना कॉंग्रेसच्या प्रचारात उतरवलं. सितेची भूमिका करणाऱ्या दिपिका चिखलिया यांना भाजपने बडोदा येथून १९९१ च्या लोकसभेत उमेदवारी दिली त्या निवडून देखील आल्या. त्याच प्रमाणे रावणाचा रोल करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांना भाजपने साबरकंठा येथून लोकसभेची उमेदवारी दिली.

नुकताच रामाचा मुद्दा घेतलेल्या भाजपने लोकसभेसाठी चक्क रावणाला म्हणजेच अरविंद त्रिवेदी यांना निवडून आणलं व ते लोकसभेत निवडून गेले. पुढे २००२ साली  त्यांची सेन्सॉर मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 

त्यानंतर ते सक्रिय जिवनातून रिटायर झाले. आयुष्यात रामाचा अपमान करावा लागला हीच त्यांना वाईट वाटणारी गोष्ट. त्यामुळे या पापातून मुक्त व्हावे म्हणून त्यांनी अखेरपर्यंत रामनामाचा जप कायम ठेवला होता….

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.