रवांडा रेडिओ, ज्याच्यामुळे नरसंहार सुरु झाला अन् आफ्रिकेतील एक अख्खी जमात संपवण्यात आली..

ज्या दिवशी नरसंहार घडला त्यादिवशी, रेडिओवरून हुटु लोकांसाठी एक संदेश देण्यात आला, यात म्हटले की 'झुरळे स्वच्छ करा' म्हणजे तुत्सी लोकांना ठार करा...

ही गोष्ट आहे रवांडात घडलेल्या भीषण नरसंहाराची. पूर्व आफ्रिकेतील रवांडा देशात तुत्सी अल्पसंख्यांकांची मोठ्या प्रमाणावर हत्या करण्यात आली. सलग १०० दिवस चाललेल्या या हत्याकांडात आठ ते दहा लाख लोक मारले गेले. म्हणजेच, एका दिवसात सरासरी सुमारे १० हजार लोकांची हत्या केली गेली. अल्पसंख्याक तुत्सी महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले.

या हत्याकांडातील मुख्य मारेकरी वर्ग होता हूटू. सरकार पुरस्कृत हत्याकांडात सैन्य आणि पोलिसांची जबाबदारी केवळ अल्पसंख्यांकांना ठार मारण्याची नव्हती. तर जास्तीत जास्त हुटुंना मारेकरी कसे बनविता येईल ही होती.

असं काय घडलं होत, की इतका भीषण नरसंहार घडला?

रवांडामध्ये दोन मुख्य समुदाय होते. एक हुटु आणि दुसरे तुत्सी. हुटु संख्येने जास्त होते. त्यामानाने तुत्सी अल्पसंख्याक होते. बव्हांशी हुटू वर्ग हा शेतीच्या कामांशी निगडित होता. तर तुत्सी लोक पशुपालन करीत. तत्कालीन रवांडामध्ये पशुपालन करणे हे कृषीप्रधान समाजातील समृद्धीचे लक्षण मानलं जाई. त्यामुळे त्या परिस्थितीत अल्पसंख्याक असूनही तुत्सी अधिक प्रभावशाली होते.

तुस्तींच्या प्रभावामुळे १७ व्या शतकात, तुत्सी राजेशाही उदयाला आली. अल्पसंख्यांकाचे देशात वर्चस्व हे तेथील वांशिक वाद उफाळून येण्यास कारणीभूत ठरू लागले.

बेल्जीयम आणि जर्मनीने या वांशिक वादाला खतपाणी घातलं. बेल्जियमने तुस्ती सत्ताधाऱ्यांचा आधार घेत हुटु शेतकऱ्यांवर कॉफी लागवडीची सक्ती केली. ज्याचा फायदा ना हुटु शेतकरी, ना रवांडाला होता. यातून फायदा फक्त बेल्जीयमला होता. त्यातच बेल्जीयमने एक ओळखपत्र प्रणाली आणली. यात, प्रत्येक व्यक्तीच्या ओळखपत्रात त्याच्या समुदायाच नाव टाकलं जाई.

ओळखपत्रांच्या या सिस्टीममुळे हुटु आणि तुस्ती समाजातली दरी आणखीनच वाढली.

दुसर्‍या महायुद्धानंतर रवांडामध्ये स्वातंत्र्याची मागणी वाढू लागली. शोषणाचा बळी ठरलेले हुटू लोक ही आता आपला अधिकार आणि स्वातंत्र्याची भाषा बोलू लागले. त्यांनी तुत्सी लोकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या बदलामुळे समाजातील राजकीय समीकरण बदलू लागली. बहुसंख्य हुटुंना आपल्या संख्येमुळे प्राधान्य दिले जाऊ लागले.

रवांडामध्ये तुत्सी राजेशाही संपवून रवांडा जुलै १९६२ मध्ये स्वतंत्र झाला. आता सत्ता हुटुंच्या हातात आली. हुटुंनी अनेक वर्षांपासून आपल्या शोषणाचा बदला घेण्यास सुरुवात केली.

त्या दरम्यान बरेच तुत्सी मारले गेले. अनेक तुस्तींना आपला देश सोडून पलायन करावे लागले. याचा परिणाम असा झाला की, तुस्तींचे अनेक बंडखोर गट समाजात तयार झाले. हे बंडखोर सातत्याने हल्ले करीत. त्यांचे हल्ले परतवून लावण्यासाठी हुटू सरकार सामान्य तुत्सी जनतेला लक्ष्य करीत असे.

६० च्या दशकाच्या शेवटी, रवांडातील हिंसाचार कमी होऊ लागला.

त्या दरम्यान काही तुरळक घटना घडल्या. उग्र परिस्थिती शांत झाली होती. पण ९० च्या दशकात तुत्सी अतिरेक्यांनी पुन्हा डोके वर काढले. त्यांनी स्वतःचा अतिरेकी गट तयार केला. त्याचे नाव रवांडन पेट्रिअटिक फ्रंट. शॉर्ट मध्ये, RPF. (आरपीएफ) लष्करी प्रशिक्षण व शस्त्रे घेऊन त्यांनी रवांडावर हल्ले करण्यास सुरवात केली. रवांडा जिंकणे आणि तेथे राज्य करणे हे RPF चे ध्येय होते.

१९९० ते १९९३ पर्यंत रवांडन सरकार आणि आरपीएफ यांच्यात अनेक युद्धे झाली. वर्ष होते १९९३ चे. बंडखोर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावाखाली रवांडाच्या सरकारला शांतता करार करावा लागला.

परंतु शांतता कराराच्या नावाखाली तुत्सी सत्ता काबीज करतील अशी हुटु बहुसंख्य सरकारला भीती होती. या भीतीपोटी सरकारने कराराच्या अटींची अंमलबजावणी केलीच नाही. याऊलट सरकारने हुटु समाजात तुस्तींविरोधात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हुटुंना पूर्वीच्या जुलूम जबरदस्तीची आठवण करून देण्यास सुरवात केली. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तणाव वाढू लागला.

हा तणाव असतानाच ६ एप्रिल १९९४ च्या संध्याकाळी रवांडाची राजधानी किगालीच्या बाहेरील भागात सैन्याचे विमान कोसळले.

या विमानात कोण होते? तर या विमानात रवांडाचे राष्ट्रपती जुवेनाल हाबियारिमाना होते.

ते आफ्रिकन नेत्यांच्या परिषदेला उपस्थित राहून टांझानियाहून किगालीला परतत होते. त्यांच्या समवेत विमानात शेजारचा देश बुरांडीचे राष्ट्राध्यक्ष साइप्रियन नटेरियामरा हेसुद्धा होते. या विमानावर रॉकेटने हल्ला करण्यात आला. विमान अपघातात दोन्ही राष्ट्रपती ठार झाले.

हा हल्ला कोणी केला, हे गूढ अद्याप ही आहे. यावर बरेच सिद्धांत मांडण्यात आले. काहीजण म्हणतात, आरपीएफने हल्ला केला.

तर काहीजण म्हणतात, यामागील हुटु अतिरेकी संघटना ‘इंटराहामवे’ या संस्थेचा हात होता. कारण आरपीएफला राष्ट्रपती जुवेनाल हाबियारिमाना यांनी सरकारमध्ये समाविष्ट करावे अशी हुटु अतिरेक्यांची इच्छा नव्हती. बेल्जियमनेही आपल्या तपासणीत हाच अँगल मांडला होता. ते काहीही असो, परंतु या विमान अपघातानंतर तुत्सी समुदायाची हत्या मोठ्या प्रमाणवर करण्यात आली.

हे हत्याकांड कसे पार पाडले ?

विमान अपघात झाल्याच्या काही तासांतच राजधानी किगाली येथे सैन्याने बॅरीकेट लावण्यास सुरुवात केली. तुस्तींना मारणे हे हुटु लोकांचे कर्तव्य असल्याचे सैन्याने हुटु समुदायाला सांगितले. एकुणातच काय तर सामान्य दिसणारे लोक क्षणार्धात खुनी बनले. हातात चाकू, हातोडे आणि कुऱ्हाडी घेऊन या लोकांनी तुत्सी अल्पसंख्यकांना निवडकपणे मारण्यास सुरवात केली.

हे हत्याकांड होण्यापूर्वी सरकारवर टीका करणाऱ्यांची नावे हुटु अतिरेक्यांना अत्यंत काळजीपूर्वक देण्यात आली होती. यानंतर सैनिकांनी तुत्सी कुटुंबीयांसह यादीतील लोकांना ठार मारण्यास सुरवात केली.

हुटुंनी तुत्सी शेजार्‍यांना ठार मारले. इतकेच नव्हे तर काही तरुणांनी त्यांच्या तुस्ती पत्नींना ठार मारले. त्या तरुणांच्या मते, जर त्यांनी तसे केले नसते तर लोकांनी त्यांना ठार मारले असते.

त्यावेळी रवांडामध्ये प्रत्येकाकडे असलेल्या ओळखपत्रात त्याच्या वंशाचा उल्लेख करण्यात आला होता. याचाच फायदा म्हणून सैनिकांनी रस्त्यावर नाकेबंदी केली, आणि शोधून शोधून धारदार शस्त्राने तुस्तींची हत्या केली.

बरेच इतिहासकार म्हणतात की या नरसंहारादरम्यान तुस्ती वंशाच्या हजारो महिलांना सेक्स स्लेव म्हणून ठेवण्यात आले. तर काही महिलांना जाणीवपूर्वक एचआयव्हीची लागण केली गेली. बऱ्याच महिलांनी आपल्या मुलांना त्यांचा जन्म बलात्काराने झाल्याचे सांगितले नाही. त्यांना भीती होती कि त्यांचे नवरे या बलात्काराच्या गोष्टी ऐकून त्यांना सोडून देतील.

न्यूज एजेंसी एएफपीशी बोलताना मुहंगा शहरातील एमिलीन मुकानसोरो म्हणते, ती एक थेरपिस्ट आहे जी अशा बलात्कारित महिलांसाठी कार्यशाळा घेते. मुकानसोरो ५३ वर्षांची आहे. या हत्याकांडात तिने तिचे वडील, आठ भावंडे आणि कुटुंबातील इतर सदस्य गमावले आहेत. गेली १८ वर्षे ती बलात्कार पीडितांबरोबर काम करत आहे.

तिने देशभरात अशा महिलांचे थेरपी गट तयार केले आहेत. या गटांमध्ये बर्‍याच स्त्रिया बलात्कारित आहेत. त्यांच्या कुटूंबासमोर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले. त्यांच्या लैंगिक अवयवांना इजा करण्यात आली. इतिहासकार हेलेन डूमस म्हणतात,

“बलात्काराचा वापर हा तुत्सी समाज आणि त्यांचा वंश नष्ट करण्यासाठी केला गेला. तुत्सी मुलांना जन्म देऊ नये म्हणून ही स्त्रियांचे गुप्तांग कापण्यात आले. बलात्काराचे षडयंत्र अत्यंत विचारपूर्वक आणि युक्तीने रचण्यात आले. बलात्कार हा एक हत्याकांड मोहिमेचाच भाग होता.”

रवांडाचे हत्याकांड म्हणजे उदारमतवादी विचारांचा बुरखा पांघरलेल्या जगाच्या तोंडावर बसलेली एक जोरदार चपराक होती.

अतिरेक्यांनी रवांडावर शेजारच्या युगांडाकडून शस्त्रे आणि प्रशिक्षण घेऊन हल्ला केला तेव्हा सीआयएला सर्व माहिती होती. जेव्हा हत्याकांड सुरु होते तेव्हा युगांडाची राजधानी असलेल्या कंपाला येथील अमेरिकेच्या दूतावासाला माहिती मिळत होती. अतिरेक्यांनी केलेल्या हिंसाचारामुळे रवांडामध्ये जातीय तणाव वाढत आहे हे त्यांना आधीपासूनच ठाऊक होतं.

पण तरीही अमेरिका गप्प राहिली. उलटपक्षी त्यांनी आरपीएफला मदत करणारे युगांडाचे अध्यक्ष योवेरी मॅसेवेनी यांना लष्करी मदत व इतर निधी देणे सुरूच ठेवले. या लष्करी मदतीनेच या हत्याकांडाची पटकथा रचली.

कोणी थांबवण्याचा प्रयत्न केलाच नाही का?

रवांडामध्ये युएन आणि बेल्जियम सैन्य होते पण त्यांना ही हत्या थांबविण्याची परवानगी नव्हती.

सोमालियात झालेल्या अमेरिकन सैनिकांच्या हत्येच्या एक वर्षानंतर अमेरिकेने निर्णय घेतला होता की ते आफ्रिकन वादात पडणार नाही.

हुटु सरकारचे सहयोगी फ्रान्सने नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि सुरक्षित क्षेत्र निर्माण करण्यासाठी एक विशेष सैन्य पथक पाठविले. परंतु या खूनांना रोखण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही असा त्यांच्यावर आरोप केला जातो. रवांडाचे विद्यमान अध्यक्ष पॉल कॅगमी यांनी फ्रान्सवर हत्याकांड करणाऱ्या लोकांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. पण फ्रान्सने हा आरोप फेटाळला आहे.

हत्याकांडाचा शेवट आणि हुकूमशाहीकडे वाटचाल

जेव्हा हत्याकांडानंतर तुत्सी सत्तेत परत आले तेव्हा हूटू लोकांना लक्ष्य केले जाऊ लागले. हुटु समाजातील लोक मारले गेले, हजारो बेघर झाले.

सध्या रवांडाचे अध्यक्ष पॉल कॅगमी आहेत. ते तुत्सी समाजातील आहे. ते तुत्सी मिलिशिया संघटना आरपीएफचा सेनापती होते. सन २००० पासून ते रवांडाचे अध्यक्ष आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखाली रवांडा आर्थिक प्रगती करीत आहे. पण पॉल केगमी यांच्यावर रवांडामध्ये लोकशाही संपविल्याचा आरोप आहे. त्यांचे बरेच विरोधक आणि समीक्षक रहस्यमयपणे गायब झाले आहेत.अनेकजण विचित्र अवस्थेतही मरण पावले. असे म्हटले जाते की या तुस्तींच्या हत्याकांडामुळे UN देशांनी पॉल कॅगमी यांना खूप सूट दिली आहे. रवांडाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय समुदाय सातत्याने चुका करत आहे. पूर्वीच्या चुकांमुळे हे हत्याकांड घडले. आणि आताच्या चुकांमुळे रवांडामध्ये हुकूमशाही आली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.