शंभूराजेंना वाचवण्यासाठी रायाप्पा महार लाखोंच्या मुघल सैन्यावर चालून गेला.

संभाजी महाराज. अगदी लहानपणीच आईच्या मायेपासून पारखं झालेलं मुल. शिवराय स्वराज्याच्या धामधुमीत मुघलांपासून इंग्रजांपर्यंत लढण्यात व्यस्त.  पण मांसाहेबांनी आपल्या नातवावर प्रेमाची झालर कमी होऊ दिली नाही.  त्यांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली. जिजाऊ मांसाहेबांच्या छत्रछायेखाली शंभूराजे मोठे झाले

लहानपणापासूनच शंभूराजेंना, रयतेची मावळ्यांची ओढ होती

पुरंदरगडाच्या पायथ्याला मावळ्यांच्या मुलांसोबत संभाजीराजाचं बालपण गेलं. बाल शंभूराजे रात्रंदिवस या मावळ्यांच्या मुलांसोबतच असायचे. त्यांच्याशी खेळायचे. एकदा मांसाहेबांकडे अमात्य अण्णाजी दत्तो नी तक्रार आणली की युवराज रायाप्पा महार नावाच्या सवंगड्याच्या घरी जेवायला ही जातात. शिवरायांनी हसून त्या कडे दुर्लक्ष केलं. जातपात पाहून मैत्री करायचे संस्कार मांसाहेबानी शिकवलेच नव्हते.

खुद्द महाराजांनी चौदा पंधराव्या वर्षी छोट्याशा जहागिरीतून स्वराज्य उभं केल ते बारा बलुतेदार सवंगड्याच्या सोबतीनेच. अठरापगड जातीला एकत्र आणलं म्हणूनच हे स्वराज्याच स्वप्न साकारलं. यात मुस्लीम सुद्धा होते.

शिवकाळात मानाची पदे कर्तबगारीला बघून दिली जात होती. माणसं जोडली.

हेच संस्कार शंभूराजांवरही झाले होते.

रायाप्पा यांच मुळ गाव तुळापुर(नागरवास) मोसे खोरे मधिल “तवं” नावाचं गाव. आज “तवं” हे गाव मुळशी तालूक्यातल्या वरसगाव धरणाच्या पाण्यात बुडालेले आहे. बालपणापासून रायाप्पा शंभूराजांच्या सावलीप्रमाणे सोबत असायचे. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नेमणूक शंभूराजांचे अंगरक्षक म्हणून झाली होती. अवघ्या तेराव्या वर्षी रायाप्पांचा शंभूराजांनी दरबारात सत्कार घडवून आणला होता.

इ.स. १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले.

१ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली.

मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. मुघलांनी संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

स्वराज्यात काहूर माजला.

पराक्रमी मराठा सेनापतीनी संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी आकाशपाताळ एक केल. पण मुघलांनी हा कट अत्यंत सुनियोजित रित्या आखला होता. त्यांनी संभाजीराजेना मराठ्यांच्या हाती लागू दिले नाही.

येसूबाई खंबीर पणे राजधानी रायगडाचा कारभार सांभाळत होत्या. संख्याबळाने आपली ताकद कमी पडतेय हे त्यांना दिसत होतं. महाराजांना सोडवण्यासाठी सबुरीने योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी आपल्या सैन्याला दिला.

पुढे शंभूराजेना आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे आणण्यात आले. आपल्या धन्याचा तिथे छळ सुरु करण्यात येत आहे हे कळल्यावर रायाप्पाच मस्तक खवळल. त्याच्या सबुरीचा अंत झाला.

मोजक्या सैन्यानिशी तो बहादूरगडाच्या दिशेने गेला. पाणी वाहणाऱ्या भिस्ती लोकांच्या मदतीने मुघल सैन्यात गुपचूप प्रवेश देखील मिळवला. बहादूरगडाच्या पायथ्याशी औरंगजेब बादशाहची पाच लाख सैनिकांची छावणी वसलेली होती.

अशाच एका दुपारी मुघल सैन्याला चामड्याच्या पिशवीतून पाणी पाजत असताना त्याच्या कानावर पडले की कोणाची तरी धिंड काढण्यात आली आहे. छावणीमध्ये गोंधळ सुरु झाला. लोक गडबडीने त्या दिशेने धावत होते. रायाप्पाने जेव्हा मरहठ्ठा संभा हे शब्द ऐकले तेव्हा त्याच्या कानात गरम तेल ओतल्याप्रमाणे झाले. रागाने लाल झालेला रायाप्पा देखील तिकडे धावला.

तेजस्वी शिवपुत्र संभाजी राजेना काटेरी साखळदंडात अडकवून त्यांची मानहानीकारक धिंड काढलेली आहे हे पाहून रायाप्पाचे भान सुटले. तो तसाच राजेना घेऊन येणाऱ्या सैनिकांच्या अंगावर धावून गेला.

लाखोंच मुघल सैन्य आणि त्यांच्यावर चालून गेलेला हा एकटा शूरवीर रायाप्पा. क्षणातच त्याने दोन अंमलदारांना कापून काढले. या हल्ल्याने औरंगजेब बादशाह सुद्धा हादरून गेला. गनीम गनीम असा हलकल्लोळ मोगलांच्यात पसरला. संभाजी महाराजांचे साखळदंड तोडण्याचा वेडा प्रयत्न करणाऱ्या रायाप्पाच्या अंगावर लाखो समशेरीचे वार झाले. रायाप्पा महाराला शंभूराजांना सोडवण्याच्या प्रयत्नात वीरमरण आले.

त्याचे रक्त शंभूराजांच्या पायाशी सांडले.

फक्त रायाप्पा महार एकच नाही औरंगजेबाशी लढा देणारा गोविंद गोपाळ महार, शिदनाक महार असे अनेक पददलित समाजातील योद्धे खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढत होते. शिवशाहीत तरी जातीपातीच्या विद्वेषाला स्थान नव्हते. पुढच्या पेशवाईच्या काळात मात्र याची कीड मराठी सैन्याला लागली आणि याचीच परिणीती मराठा साम्राज्याच्या ऱ्हासामध्ये झाली.

हे ही वाच भिडू.