भावड्या, आपण स्टाईल मारतो तो ‘रे बॅन गॉगल’ खरंतर एअरफोर्ससाठी बनवला होता

१९३० चा काळ होता. न्युयॉर्कमध्ये विल्यम बाॅश्च आणि लॉंब यांची ऑप्टिकल ग्लास तयार करणारी अमेरिकेतील पहिली कंपनी उभी राहिली. यापुर्वी विल्यमचे वडिल जॉन जॅकॉब बॉश्च यांनी जर्मनमधून अमेरिकेला स्थलांतरित झाल्यानंतर १८६३ मध्ये ऑप्टिकल्ससंबंधीत वस्तू विकण्याचे रिटेल दुकान सुरु केले होते.

त्याच धर्तीवर मुलगाही चष्म्याच्या व्यवसायातच उतरला.

अमेरिकेतील वैमानिकांना युद्ध सरावाच्या दरम्यान सुर्याच्या अतिनील किरणांचा त्रास होवून विमान चालवतना अडचणी निर्माण होत असत. यातुन कधी छोटे-मोठे अपघात देखील होत होते.

यावर प्रयोग म्हणून बाॅश्च आणि लॉंब या दोघांनी मिळून जगातील अॅन्टी ग्लेअर अशा पहिल्या हिरव्या रंगाच्या सनग्लासेसची निर्मीती केली.

याचा मुख्य उद्देश होता वैमानिकांच्या डोळ्यांना चकाकी आणि अतिनील किरणांपासून बचाव करणे.

त्यांचा हा प्रयोग पुर्ण यशस्वी झाला. वैमानिकांना अस्पष्ट दृश्य दिसण्यात येणारी अडचण दूर झाली. हळू हळू हा चष्मा हवाईलातील सर्वच वैमानिकांच्या गणवेशाचा एक भाग बनला.

यातुनच अमेरिकेच्या वैमानिकांनी याला ‘पायलट’ असे नाव ठेवले.

पुढे सहा वर्षांनी १९३७ मध्ये कंपनीने अधिकृतपणे आपला पहिला सनग्लास बाजारात आणला.

सुर्यापासून येणाऱ्या किरणांना थांबवणारा किंवा अडवणारा असलेला चष्मा यावरुन त्याचे नाव बदलून ‘रे-बॅन’ असे ठेवले.

दुसर्‍या महायुद्धादरम्यान ‘रे-बॅन’ लेन्सेससाठी वैमानिकांच्या दृष्टीने सरकारने आवश्यक असणारे काही स्टॅन्डर्ड सांगितले व आणखी सुधारणा करण्यास सुचविले.

अशा सनग्लासेसने अमेरिकन हवाई दलाला लढाऊ ऑपरेशन्स पार पाडण्यास मोठ्या प्रमाणात मदत केली.

महायुद्धादरम्यानच पेरिस्कोप आणि सर्चलाइट मिरर यासह ऑप्टिकल संबंधित साहित्यांची लष्कराकडून मोठी मागणी वाढत गेली. या गरजा भागविण्यासाठी कंपनीने आपले उत्पादनही वाढवले. यादरम्यान लष्करातील अधिकाऱ्यांनी असेही म्हटले की

‘रे-बॅनने’ आमच्यासोबत आमचे मित्र राष्ट्र म्हणून महायुद्ध लढले.

१९५० च्या दशकात रे-बॅनने वैमानिंकाच्या दुनियेसोबत फॅशनच्या जगतात देखील आपले पाऊल ठेवले.

त्यांनी फॅशनेबल सनग्लासेसह बहु-रंगीत लेन्स आणि मोठ्या फ्रेम्स बाजारात आणल्या.

सोबतच महिलांसाठी ही आणखी नवीन सनग्लासेस आणले. यातुनच ते तरुण वर्गासाठी हक्काचे फॅशन ब्रॅन्ड बनत गेले.

१९६० च्या दशकात, ‘रे-बॅन’कडून अँटी-स्प्लिट लेन्स सादर करण्यात आल्या. तसेच जगभर आपला विस्तार करण्यास त्यांनी सुरुवात केली.

या फॅशनच्या दुनियेत ‘रे-बॅन’ला ब्रॅन्ड म्हणून सेट करण्यास सर्वात जास्त कारणीभूत ठरला तो १९८५ मध्ये आलेला टॉम क्रूझच्या ‘टॉप गन’ हा चित्रपट.

आपल्याकडे जसे रजनीकांतने गॉगल घालण्याची एक स्टाईल सेट करुन दिली आहे अगदी तसेच या अॅक्शन चित्रपटामध्ये टॉमच्या ‘रे-बॅन’चे गॉगल्स घालण्याच्या शैलीने अमेरिकेत एका नव्या स्टाईलची सुरुवात करुन दिली.

यानंतर कंपनीने मागे वळून पाहिलेच नाही.

न्युयॉर्क टाईम्सच्या एका बातमीनुसार १९९९ पर्यंत जगभरातील सनग्लासेपैकी ४० सनग्लास हे ‘रे-बॅन’चे होते. पुढे अमेरिकन पॉप असोसिएशनला ‘रे-बॅन’च्या फॅशनची दखल घ्यावी लागली.

आणि या सनग्लासेसना अमेरिकेतील ‘अत्यंत मूल्यवान डिझाईन’ या पुरस्काराने गौरविले.

२० व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अमेरिकेत ‘रे-बॅन’चा गॉगल घालणे ही कलावंतासाठी प्रतिष्ठेची गोष्ट बनली होती.

मोठ्या फ्रेमचे गॉगल, तोंडात धूर फेकणारी सिगारेट असा सगळा लुक ९० च्या दशकातील जवळपास सगळ्याच हिरोंचा होता.

नायिका देखील यात मागे नव्हत्या. गॅरी ग्रँट आणि ऑड्रे हेपबर्न हे यात सगळ्यात पुढे होते.

‘रे-बॅन’ने पुढे आपल्या स्टाईलमध्ये वेफरर स्टाईलची पांढरी फ्रेम, रेड फ्रेम, ब्लॅक फ्रेम, प्रिंटेड फ्रेम्स अशा वेगवेगळ्या फ्रेम्स आणल्या. खरतर ते गॉगल्स युनायटेड स्टेट्स आर्मीच्या एअर कोर्प्ससाठी तयार केले होते. मात्र काळानुसार केलेले सुसंगत बदल, रचनेतील सुधारणा, उच्च गुणवत्ता आणि उच्चभ्रु वर्गाला आकर्षित करणारी शैली यामुळे आज जवळपास ८० वर्षांतरही ‘रे-बॅन’ची लोकप्रियता आणि स्टेटस टिकून आहे.

१९९९ मध्ये बॉश आणि लॉम्ब यांनी तत्कालिन ६४० दशलक्ष डॉलर्समध्ये इटालियन लक्सोटिका या ग्रुपला हा ब्रँड विकला. आज रोजी ‘रे-बॅन’ कंपनीची वार्षिक उलाढाल ११० बिलीयन डॉलर इतकी आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.