शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर छत्रपतींच्या मानसपुत्राने रायगडाला पुन्हा स्वराज्यात आणलं..

औरंगाबाद नजीक थोरल्या शाहू महाराजांचे तैनाती सैन्य होते. तेव्हा जवळ असणाऱ्या पारदगावच्या पाटलाने, सयाजी लोखंडे याने शाहू महाराजांच्या सैन्यावर हल्ला केला.. यामधे लोखंडे पाटलाचा मृत्यु झाला. त्याच्या बायकोने आपले मूल शाहू महाराजांच्या पायावर घातले. आपल्याला महाराष्ट्रात झालेल्या पहिल्याच युद्धात विजय मिळाला, याची आठवण म्हणून शाहू महाराज यांनी त्या मुलाचे नाव ठेवले ‘फत्तेसिंह’..

हेच ‘फत्तेसिंह’ थोरल्या शाहू छत्रपतींचे मानसपुत्र बनले.

फत्तेसिंह बाबांचे सर्व शिक्षण सातारला शाहू महाराजांच्या देखरेखीत झाले. राजवाडयामधे त्यांची स्वतंत्र व्यवस्था होती. विरुबाई यांनी फत्तेसिंहांचा पुत्रवत सांभाळ केला होता. शाहू महाराज यांनी पुढे चालून फत्तेसिंह बाबांच्या भावाला पारदगाव इनाम दिले आणि बाबांना जुन्नरपासून सासवडपर्यंतची 720 गावांची सरपाटीलकी दिली.

फत्तेसिंह राजेंनी तलवार चालवून आपला पराक्रम दाखवला होता. हुजूरातीच्या सैन्याचे ते प्रमुख होते. भागानगरचा सुभा फत्तेसिंहांना द्यावा, या हेतूने शाहू महाराजांनी त्यांना चित्रदुर्ग मोहीमेचे अधिपत्य दिले होते.

पिलाजीराव जाधव, थोरले बाजीराव यांची निजामावरील स्वारी, कर्नाटकातील चौथाई वसुली, रायगड स्वराज्यात आननारी कोकण स्वारी, रघुजी भोसले यांची प्रचंड यशस्वी झालेली दख्खन स्वारी या सर्वांमधे फत्तेसिंह बाबांचा सहभाग होता. प्रत्येक मोहीमेध्ये त्यांनी पराक्रम केला..

4 जानेवारी 1721 मधे निजामाच्या भेटीवेळी शाहू महाराजांनी बाजीरावांसोबत फत्तेसिंह बाबांनाही धाडले होते. तसेच, इ.स. 1737 च्या चंदवड येथे झालेल्या लढाईत फत्तेसिंहांना विजय मिळाला होता. इ.स. 1726 मधे कलबुर्गा भागातून त्यांनी चौथाईही वसूल केली होती….

फत्तेसिंह बाबांच्या पराक्रमाचे वर्णन खुद्द शाहू महाराजांनी केले आहे. जंजिरा स्वारीवेळी रायगड स्वराज्यात आला. रायगड जिंकणे हा शाहू छत्रपतींनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. इसवी सन १७३३ साली मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेची आखणी त्यांनी स्वतः केली.

मराठेशाहीची संपूर्ण ताकद त्यांनी रायगड जिंकण्यासाठी लावली. रायगड मोहिमे व्यतिरिक्त फक्त पानिपतातच इतके मोठे सरदार आणि सेनापती एकत्र उतरले असावेत.

खालील यादीच एकवार पहा..

राजपुत्र फत्तेसिंह भोसले, बाजीराव पेशवे, छत्रपतींची हुजुरातीची फौज, पिलाजी जाधवराव, सरखेल सेखोजी आंगरे, सरलष्कर दावलजी सोमवंशी, सेनापती दाभाडे, येसाजी गायकवाड, हिम्मतबहाद्दर उदाजी चव्हाण, श्रीपतराव पंतप्रतिनिधी, चिमाजी आप्पा, भुईंजकर जाधवराव, कृष्णाजी खटावकर, उदाजी पवार, महाडिक, घोरपडे असे दिग्गज सेनानी कोकणात उतरल्याने रायगड परिसराला रणांगणाचे रूप आले. १५-२० आघाड्यांवर युध्द सुरु झाले.

अखेरीस 6 जून रोजी म्हणजे शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर भगवा फडकला. हा सुद्धा एक योगायोगच..!!

छत्रीनिजामपूर, पाचाड येथून रेटत मराठ्यांनी सिद्दीला रायगड जवळ आणले. गडावरून खाशा फौज खाली उतरली. दोन्हीच्या मध्ये सापडून सिद्दी अंबर आणि त्याचे हजार भर सैन्य या युद्धात ठार झाले. शाहू छत्रपतींनी सिद्दी अंबर चे डोके कापून साताऱ्याला मागवले आणि जिवंत सापडेल त्या सिद्दी सैनिकांची डोकी कापावी, पाचाड व रायगड वाडी येथील सिद्धीचे वाडे तोफांनी उडवून टाकावे असे आदेश दिले.

तब्बल 44 वर्षांनी रायगड स्वराज्यात सामील झाला. या प्रतिष्ठेच्या मोहिमेत फत्तेसिंह राजेंनी पराक्रम गाजवला. याचे वर्णन करताना शाहू महाराज म्हणतात,

“रा.शिवाजी महाराज व रा.आबासाहेब व काकासाहेब कोणास न जाहले ते कार्य चि. फत्तेसिंह बाबा व रा.प्रधान यांनी केले. ही किर्ती जगत्रयी व निजाम उल्मुक व दिल्लीपावेतो जाहली. हा लौकिक जेनेकरुन कायम राहणे ते करने.”

कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांना सातारला घेऊन येण्याची महत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर शाहू महाराजांनी टाकली होती, त्यातील एक प्रमुख व्यक्ती म्हणजे फत्तेसिंह बाबा.

फत्तेसिंहराजे साताऱ्यात आले किंवा सातारा येथुन जात असतील तर गावाच्या पुढे येऊन प्रधान व प्रतिनिधी याना वर्दी द्यावी लागायची, एवढा मोठा शिरस्ता छत्रपती शाहु महाराज यानी घालुन दिला होता..

इ.स.1737 ला कर्नाटक स्वारीत मराठ्यांना विजय मिळाला. या लढाई मधे फत्तेसिंहांनी पराक्रम गाजवला. या पराक्रमाचे वर्णन नाना पुरंदरे आपल्या (पेशव्यांना लिहिलेल्या) पत्रातून करतात..

‘ऐसीयास फत्तेसिंहबाबांचा कारभार आहे, तो स्वामी जाणतात. त्यांचे सर्व साहित्य मन्सूब्याने आपन केले पाहीजे.’

फत्तेसिंह बाबांना अक्कलकोट बरोबरच बारामतीचीही जहागिरी मिळाली होती. शाहू छत्रपतींच्या मृत्युनंतर फत्तेसिंह बाबा आपल्या जहागिरी मधे, अक्कलकोटास राहन्यास आले.. गावाचा विकास केला. शहरीकरण केले. मृत्युपर्यंत त्यांचा मुक्काम अक्कलकोटलाच होता..
आज त्यांच्या मृत्युतारखेविषयी मतमतांतरे आहेत.. काही साधनांत ती तारीख 20 नोवेंबर 1760 आहे तर काही साधनांत ती 20 जानेवारी 1760..!!

श्री राजा शाहूचरणी तत्पर
फत्तेसिंह भोसले राजकूमर..!!

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.