हिंदू-मुस्लिम दंगलीत नेहमी पुढं असणारी, रझा अकादमी नेमकी काय आहे?
त्रिपुरातील हिंसेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण झालाय. अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, नाशिकमध्ये मुस्लिमांनी प्रचंड मोर्चे काढत जोरदार आंदोलन केलं आहे. अमरावती मध्ये तर जास्तच जोरदार आंदोलन पेटलंय. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली.
पण त्रिपुराच लोण महाराष्ट्रात कसं काय आलं ? महाराष्ट्रात ही दंगल कोणामुळे पेटली ? पेटलेल्या दंगलींचे कारण काय ?
कारण फक्त एकच दिल जातंय… ते म्हणजे रझा अकादमी.
आझाद मैदानात झालेली दंगल ते अमरावती दंगलीमध्ये रझा अकादमीचे नाव ठळकपणे समोर आलय. ही रझा अकादमी काही साधीसुधी संघटना नाही. २०१२ सालात आझाद मैदानात झालेली कुप्रसिद्ध दंगल सर्वांच्याच लक्षात आहे. एवढच नाही तर दंगलीत या संघटनेच्या लोकांनी आझाद मैदानावरच्या अमर जवान ज्योतीचीही नासधूस केली होती.
रझा अकादमीची स्थापना १९७८ मध्ये अलहाज मोहम्मद सईद नूरी यांनी केली होती. अकादमीची स्थापना सुन्नी विद्वानांची विशेषत: इमाम-ए-अहमद रझा खान कादरी आणि इतरांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी करण्यात आली होती. अकादमीने उर्दू, अरबी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये विद्वानांनी लिहिलेली विविध इस्लामिक विषयांची शेकडो पुस्तके प्रकाशित केली.
पण अकादमी प्रकाशझोतात आली २०१२ च्या आंदोलनाने.
तारीख होती ११ ऑगस्ट २०१२. म्यानमार आणि आसाममध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचाबातम्या सगळ्या जगभरात दाखवल्या जात होत्या. याचा निषेध भारतातल्या मुस्लिम संघटना ही करत होत्या. त्यामध्ये होती रझा अकादमी. अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर रझा अकादमीनं निषेध मोर्चाचं आयोजन केलं होत. यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम तरुण सहभागी झाले होते.
त्यावेळी जो पोलीस रिपोर्ट पब्लिश झाला होता त्यानुसार जवळपास १५ हजाराची गर्दी आझाद मैदानावर होती. सभास्थळी काही मुस्लिम नेत्यांनी भडकाऊ भाषणं केली. काही आक्षेपार्ह एसएमएस, फोटोज दाखवले गेल्याचं सांगितलं गेलं. त्यातून जमाव भडकला आणि त्यांनी नासधूस करायला सुरुवात केली. जमावाला कंट्रोल करणं अवघड झालं होता.
सरकारी गाड्यांची, रस्त्यावर दिसेल त्या गाडयांना आग लावण्यात आली. वाहनांची मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली गेली. जमावानं दिसेल ती गाडी फुकली. यातुन बातम्या कव्हर करायला गेलेल्या माध्यमांच्या ओबी व्हॅनही सुटल्या नाहीत. पोलीस गाड्याही जमावानं पेटवल्या. बसेस फोडल्या. जमाव पांगवायला गेलेल्या पोलीसांवर या जमावानं दगडफेक केली. काही महिला पोलीसांवर हात टाकल्याचेही आरोप त्यावेळी झाले.
एवढच नाही तर अमर जवान ज्योतीचीही नासधूस केली गेली.
पोलीसांच्या रिपोर्टनुसार २ कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रॉपर्टीचं डॅमेज झालं. दुपारी ३ वाजता सुरु झालेली दंगल संध्याकाळपर्यंत सुरूच होती. दोन जणांचा मृत्यू झाला होता. ६३ जण गंभीररीत्या जखमी झाले. एक नाही दोन नाही तर जवळजवळ ५८ पोलीस ज्यात अधिकाऱ्यांचा समावेश होता त्यांनाही गंभीर इजा पोहोचली.
महाराष्ट्राच्या मोठ्या अशा ४ शहरात दंगल उसळली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रझा अकादमी चर्चेत आली. ही तिच रझा अकादमी आहे जिच्यावर पुन्हा पुन्हा हिंसा भडकवल्याचा आरोप केला जातो. फक्त २०१२ आणि २०२१ नाही तर बऱ्याचदा या रझा अकादमीने आंदोलन भडकवली आहेत.
- फेब्रुवारी २०२१ मध्ये, मोहम्मदचे छायाचित्र प्रकाशित केल्याबद्दल या अकादमीने बीबीसीविरुद्ध आक्षेप घेतला आणि तक्रार दाखल केली. बीबीसीचे संपादक मुकेश शर्मा यांनी रझा अकादमीचे सरचिटणीस मौलाना सईद नूरी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की बीबीसीने आधीच व्हिडिओ सुधारित केला आहे आणि मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावणारी बाबी काढून टाकल्या आहेत.
- रझा अकादमीने मुंबईत तस्लिमा नसरीन आणि मुहम्मद ताहिर-उल-कादरी यांच्या कार्यक्रमांचा निषेध केला होता.
- २०१५ मध्ये रझा अकादमीने प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान आणि इराणी चित्रपट निर्माता माजिद माजिदी यांच्याविरुद्ध मुहम्मदवर चित्रपट बनवल्याबद्दल फतवा जारी केला.
- २०१८ मध्ये ओरु अदार लव्ह – माणिक्य मलाराया मुव्ही मधल्या एका व्हायरल गाण्याच्या सार्वजनिक प्रसारावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांचं म्हणणं होत या गाण्यात मोहम्मद आणि त्याच्या पत्नीचा अपमान केला आहे.
- तिहेरी तलाक हा फौजदारी गुन्हा म्हणून घोषित करणार्या मुस्लीम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) कायदा, २०१९ लागू केल्यानंतर, संस्थेने हे विधेयक भारतातील मुस्लिमांच्या धार्मिक अधिकारांचे उल्लंघन करणारे मानले आणि आंदोलन केलं होत.