रे बॅन, व्होग, अरमानी, ओकले कुठलाही भारीतला गॉगल घ्या, सगळ्यांचा मालक एकच आहे

कोणाला कशाचा नाद असेल सांगता येत नाही. चौकात बसणाऱ्या भाऊंना गॉगलचा नाद. फुटपाथ पासून ते शोरूम पर्यंत असं सगळं गॉगलच कलेक्शन त्याच्याकडे आहे.

भाऊंना विचारलं की, तुमच्या रे बॅनच्या गॉगल किंमत किती तर १० हजार, अरमानीचा गॉगलची किंमत १२ हजार.

यानंतर गॉगल इतके महाग का असतात असा शोध घेतला.

त्यावेळी समजले की, जगाभरातील कुठल्याही मोठ्या ब्रँडचा गॉगल विकत घेतला तरी त्याचे पैसे हे एकाच माणसाकडे जातात. जगभरातील आघाडीच्या गॉगल बनविणाऱ्या ८० टक्के कंपन्या त्यांच्याच मालकीच्या आहेत. यामुळे त्यांची हा क्षेत्रात मोनोपॉली आहे. बाजारात त्यांना दुसरा प्रतिस्पर्धी नसल्याने ते ज्या किमती ठरवतील ते मान्य करण्याशिवाय पर्याय नाही.

या कंपनीचे नाव आहे लक्झोटिका. हे नाव तुम्ही कधी ऐकलं पण नसेल.

लक्झोटिका कंपनीची स्थापना केली ते लिओनार्डो डेल वेचियो यांनी.

१९३५ मध्ये वेचियो यांचा जन्म इटलीत झाला. त्यांचे वडील हे भाजी विक्री करायचे. लिओनार्डो वेचियो ५ वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. घरात कमविणारे वडील एकटेच होते. त्यांच्या मृत्यूनंतर वेचियो यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अवघड झाली होती. यामुळे ७ वर्षांच्या वेचियो यांना अनाथालयात ठेवण्यात आले. निदान त्यांना जेवायला चांगलं मिळावं म्हणून त्याच्या आईने हा निर्णय घेतला होता.

पुढे १४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर वेचियो यांनी मिलान मधील एका स्टूल बनविणाऱ्या कंपनीत कामाला लागले. कामावरून परत आल्यावर ते रात्र शाळेत जात. तिथे त्यांनी इंडस्ट्रियल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी व्हिनस गाठण्याचा निर्णय घेतला. व्हिनसला लहान मोठ्या औद्योगिक कंपन्या होत्या. तिथे त्यांनी दुसऱ्या कंपनीत कामाला सुरवात केली.

व्हिनस मध्ये वेचियो यांना चांगला पगार मिळत होता. त्यानंतर त्यांनी जमा केलेल्या पैशातून स्वतःचा व्यवसाय सुरु करायचे ठरविले. भाड्याने एक खोली घेतली आणि तिथे चष्म्याच्या फ्रेम बनवायला सुरुवात केली. सलग तीन वर्ष वेचियो १८ ते २० तास काम करत होते.

एक-एक करत १४ कामगार त्यांनी आपल्या हाताखाली घेतले.

इटली मध्ये बेलुनो प्रांतातील अगोर्डो हे शहर गॉगल बनविण्यासाठी फेमस होते. विंची यांनी व्हिनस सोडून अगोर्डो गाठले आणि चष्म्याच्या फ्रेम बनवायला सुरुवात केली. १९६१ मध्ये कंपनीची स्थापना करण्यात आली आणि तिला लक्झोटिका S.A.S. असे नाव दिले गेले.

चांगले, टिकाऊ चष्माची फ्रेम बनविणारी कंपनी म्हणून लक्झोटिका नावं घेतले जाऊ लागले. कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या चष्म्याच्या फ्रेम्सला जर्मनी सारख्या देशातून मागणी वाढू लागली होती. त्यामुळे देश विदेशात फ्रेम विक्रीकरण्यासाठी लक्झोटिकाला एका वितरक कंपनीची गरज भासू लागली होती. १९७४ मध्ये वेचियो यांनी स्कारोन या बलाढ्य वितरक कंपनीला विकत घेतले.

त्यानंतर १९८१ मध्ये जर्मनीत लक्झोटिकाचे पहिले आउटलेट सुरु झाले.

तिथल्या लोकांना लक्झोटिकाच्या फ्रेमची भुरळ पडली होती. इथूनच लक्झोटिका कंपनी आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणून उदयास आली. १९८८ मध्ये लक्झोटिका ने अरमानी कंपनी सोबत एक करार केला. यात लक्झोटिका अरमानी कंपनीसाठी चष्माचे फ्रेम आणि डिझायनर गॉगल बनविण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर लक्जोटिका कंपनी अमेरिकन बाजारपेठेत उतरली.अमेरिकेतील चष्मे विक्री करणारी सर्वात मोठी कंपनी अवांत-गार्डे ऑप्टिक्स कंपनी विकत घेतली. एक-एक करत लक्झोटिकाने जभरात चष्मे वितरण करणाऱ्या कंपन्या विकत घेतल्या.

१९९० मध्ये लक्झोटिका अमेरिकेच्या शेअर मार्केट मध्ये लिस्टेड झाली.

१९७३ मध्ये स्थापन झालेल्या व्होग ही कंपनी फॅशन आणि लाईफ स्टाईलसाठी ओळखली जाते. १९९० मध्येच लक्झोटिका ही कंपनी विकत घेतली. यानंतर लक्झोटिकाशी फॅशन इंडस्ट्री मध्ये ऑफिशियल इंट्री झाली. १९९९ मध्ये आपल्याला आवडणारी रे बॅन विकत घेतली. रे बॅनला जगभर ओळख निर्माण झाली ती लक्झोटिकामुळे

गुगल ग्लास आयवेअर सुद्धा लक्झोटिकाने तयार केला आहे.

२०१९ मध्ये लक्झोटिकाने ९ बिलियन युरो म्हणजे ८१ हजार कोटींपेक्षा जास्त किमतींच्या गॉगलची विक्री केली आहे. कंपनीचे जगभरात ९ हजार पेक्षा जास्त आउटलेट आहेत.

रे बॅन, ओकले, अरमानी, प्राडा, बलगरी, व्होग यासह ४० ब्रँड एकट्या लक्झोटिका कंपनीच्या मालकीचे आहे. आज लक्झोटिका ७० बिलियन डॉलरची ही कंपनी बनली आहे. भारीतला म्हणून तुम्ही कुठलाही गॉगल घ्या त्याचे पैसे हे लक्झोटिका कंपनीलाच मिळतात.

फोर्ब्स कडून पण दखल .

फोर्ब्स मासिकाने लिओनार्डो डेल वेचियो हे जगातील ४० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची दाखल घेतली होती. त्याची  एकूण संपत्ती २४.२ अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. एका छोट्याशा दुकानात १४ लोकांसोबत सुरू झालेल्या कंपनीचा प्रवास  या लक्झोटिका जगातील नामांकित कंपनीच्या रूपाने समोर आहे. कंपनीत  ८० हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात.

 

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.