वाटणीत गेलेली गोष्ट कशी मिळवायची असते हे मुकेश अंबानींकडून शिकलं पाहीजे..

भावाभावांच्या वाटण्या झाल्या आणि आपली हक्काची गोष्ट वाटणीत भावाच्या वाट्याला गेल्यानंतर आपण काय करतो? दगड घेतो आणि भावाच्या डोक्यात घालतो, राडा भावा नुसता राडा करतो. सगळं गाव तमाशा बघायला आलं तरी चाललं पण भावाला आपल्या हक्काची गोष्ट पचून देत नसतो.

भावांनो, स्वत:ला आवरा. मोठ्या माणसांकडून मोठ्या गोष्टी शिका. वाटणी झाल्यानंतर आपल्या वाट्याला हक्काची गोष्ट आली नाही तर कसा गेम प्लॅन खेळायचा असतो हे मुकेश अंबानी यांच्याकडून शिका. कसय तर वेळी दगडानं काम होत नाही. तूम्ही पण आज जाता आणि गावभर थू थू पण होते.

सो कुल डाऊन बॉईज.

तर या गोष्टीची सुरवात होते, इसवी सन २००३ चा डिसेंबर रिलायन्सचे सर्वेसर्वा धिरूभाई जाऊन वर्ष दिड वर्ष झाले. दोन भावांमध्ये अजून बांध बांधला नव्हता.

पण आतल्या आत कुठंतरी ठिगणी पेटलेली होतीच.

तर या २००३ च्या डिसेंबरमध्ये काय झालं तर रिलायन्स इन्फोकॉमचं उद्धाटन झालं. या कार्यक्रमाला मोठा भाय मुकेस आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी उपस्थित होत्या. आतली बातमी म्हणजे अनिल अंबानी यांना बोलवण्यात पण आलं नव्हतं. आत्ता घरातल्या घरात कशाला आमंत्रण म्हणून राहिलं पण असेल पण मुद्दा तो नाही,

मुद्दा आहे स्वप्नाचा. 

नव्याने उभारणारं टेलिकॉम सेक्टर हे मुकेस भायचं स्वप्न होतं. त्यातूनच रिलायन्स टेलिकॉम उभारली होती. रिलायन्स टेलिकॉमची मालकी होती ती रिलायन्स कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडे. या कंपनीत मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी यांचे ५०.५० टक्के शेअर्स होते. उर्वरीत ४५ टक्के शेअर्स आरआईएल कडे होते. त्याच्या बोर्डावर पुर्णपणे मुकेश अंबानींची हुकूमत होती. 

थोडक्यात काय तर टेलिकॉम क्षेत्रावर पुर्णपणे अधिकार होता तो मोठा भायचा अर्थात मुकेश अंबानी यांचा. मुकेश अंबानी त्या दिशेने पाऊले टाकतं होते पण २००५ साली रितसर बांध पडला, वाटण्या झाल्या.. 

रिलायन्समध्ये वाटण्या झाल्या आणि मोठा भायला आपल्या स्वप्नांवर पाणी सोडायला लागलं. 

सगळे जूने उद्योग मुकेश अंबानीच्या वाटणीला आले तर नव्या भारताची स्वप्न रचायचं काम अनिल अंबानी यांच्याकडे आलं. रिलायन्स कम्युनिकेशनची जबाबदारी अनिक अंबानी यांच्याकडे आली. त्यांनी या कंपनीला आरकॉम नाव देऊन टाकलं. मोठ्या दूखी कष्टाने मुकेश भाईंनी काळजावर दगड ठेऊन आरकॉम आपल्या भावाला देऊन टाकली. 

अनिल आत्ता कुणाचं ऐकत नसतो. स्मार्टफोनचा जमाना आहे, रिलायन्स एकहाती डाव मारणार असा अंदाज मार्केटमध्ये लावला जात होता. थोडक्यात काय तर निसंकोचपणे अनिल अंबानी टेलिकॉमच्या जीवावर नव्या जगाचा बादशहा असेल अस लोकांच मत होतं. इथे आपले मुकेश भाय मात्र जीव घट्ट करुन बसले होते. 

वाटचाल पण तशीच चालू होती. २००८ साली आरकॉमचं मुल्य दिड लाख करोड रुपयांपेक्षा जास्त होतं पण पुढे अनिल अंबानी गंडेलशहा झाले. या गोष्टीच्या तपासात आपण टेलिकॉम सेक्टरचा जरा अभ्यास करायला पाहीजे. 

तर १९९० च्या दशकात भारतात दूरसंचार क्रांन्ती सुरू झाली. तेव्हा पुर्ण भारतात मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यासाठी मेट्रो, A,B,C सारख्या २३ सर्कलचे वर्गीकरण करण्यात आले. त्यापैकी मेट्रो आणि A सर्कलमध्ये उद्योग वाढण्याची शक्यता सर्वाधिक होती. २००८ साली प्रत्येक सर्कलमध्ये एकूण पाच ते सहा कंपन्या आपली सेवा देत होत्या.  

पण याच वर्षी म्हणजे २००८ साली केंद्र शासनाने अजून नव्या आठ कंपन्यांना लाइसन्स दिले त्यामुळे हा आकडा १३ ते १४ पर्यन्त पोहचला. २००८ साली मंदी आली. सर्व क्षेत्रात मंदी होती पण टेलिकॉम सेक्टर वरतीच जात राहिला. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या देखील या सेक्टरमध्ये येत गेल्या. हीच गोष्ट वाढत्या स्पर्धेची होती.पण अनिल अंबानी या सत्यापासून कोसो दूर होते. 

स्पर्धा वाढली आणि कॉलिंग रेट कमी होऊ लागले. वेगवेगळ्या ऑपरेटरनी आपले कॉलिंग रेट कमी केले. झक मारून का होईना पण आरकॉमला आपला कॉलिंग रेट ५० पैशांवर आणावा लागला. पण इथे एक घोळ करण्यात आला. ग्राहक तितकेच आणि कॉलिंग रेट निम्यावर. त्यामुळे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर ढासळतच राहिला. 

याचा तोटा फक्त आरकॉमलाच बसला असं नाही तर सोबत असणारं एअरटेल सहीत इतर कंपन्यांना देखील हा फटका बसत होता. GSM, CDMA या भानगडी तर सोबत होत्याचं त्यात कॉलिंग रेटचा देखील तोटा होता. स्मार्ट फोन आल्याने सर्व गडी GSM कडे शिफ्ट होत राहिले आणि आरकॉम हळुहळु डबऱ्यात जात राहिलं. कर्ज काढ आणि खड्डा बुजवं हे एकमेव धोरण कंपनीत अवलंबण्यात आलं. 

एकतर कॉलिंग रेट वाढवावेत वगैरे सारख्या आयडिया बाष्कळ होत्या. कारण लोकं अशा वेळी दूसरीकडे जात असत. एकामागून एक करत कर्जाचा डोंगर उभा राहिला. २०१८ सालचं सांगायचं तर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल समोर जेव्हा ही कर्जाची समस्या आली तेव्हा ५० हजार कोटींचे कर्ज आरकॉमवर होतं. 

आत्ता आपण जरा जुन्यात जाऊ म्हणजे २००८ साली आरकॉमला दक्षिण आफ्रिकेच्या बाप असणाऱ्या MTN कंपनीसोबत जोडण्याचा प्रयत्न चालू झालेला. हे शक्य झालं असतं तर ७० अब्ज कोटींची एक मोठी कंपनी म्हणून आरकॉम उभा असती. त्यासाठी आरकॉमला आपल्या शेअर्सचा हिस्सा MTN ला द्यायला लागणार होता. 

इथे मुकेशभाई आडवे आले. दोन्ही भावात जेव्हा वाटणी झाली तेव्हा दोन नियम कटाक्षाने पाळायचे होते. 

एकमेकांच्या क्षेत्रात पुढचे दहा वर्ष ढवळाढवळ करायची नाही 

आपल्या कंपनीचे शेअर्स विकायचे झाल्यास पहिला चान्स आपल्या भावाला द्यायचा.  

दूसऱ्या नियमावर बोट ठेऊन मुकेश अंबानी या करारात आडवे आले. असही सांगतात की आरकॉम आतून पोखरत आहे अशी आतली बातमी देखील त्यांनी MTN पर्यन्त पोहचवली होती. 

थोडक्यात अनिल अंबानींच्या हातातून ही संधी गेली. 

या दरम्यान मुकेश भाईंनी इंटाफेल नावाची कंपनी विकत घेतली. या कंपनीने देशातल्या सर्व सर्कलमधले ब्रॉडबेंड स्पेक्ट्रमचे हक्क विकत घेतले होते. २०१३ मध्ये मुकेश अंबानी यांनी एअरटेल सोबत एक करार केला. यानुसार दोन्ही कंपन्या ऑप्टिकल फायबर नेटवर्क सहित दूससंचार साठी असलेला आपला सेटअप एकमेकांसोबत शेअर करतील. 

सोबतच २०१३ साली मुकेश भाईंनी आपल्या लहान भावासोबत एक करार केला. आरकॉमचे चा फायबर ऑप्टिक नेटवर्क वापरण्यासंबधीत हा करार होता. त्यासाठी मुकेश भाई आरआयएल ला १२०० कोटी देणार होते. 

इकडे आरकॉम तोट्यात जात होती तर दूसरीकडे अनिल अंबानी स्पेक्ट्रम हातात घेत होते, इन्फ्रास्ट्रक्चर पण लावायला सुरवात झाली होती. आणि ती २०१० साली विकत घेतलेली इंटाफेल या कंपनीचं नाव देखील बदलण्यात येणार होतं, 

या कंपनीचं नवीन नाव होतं, रिलायन्स जिओ.. 

२००५ साली वाटण्या झाल्या होत्या. १० वर्ष एकमेकांच्या क्षेत्रात लुडबूड करायची नाही असा करार होता. रिलायन्स जिओचा पाया पाठीमागेच उभा राहिलेला पण रिलायन्स जिओची अधिकृत घोषणा करण्यात आली ती. 

२७ डिसेंबर २०१५ साली. 

फक्त आपल्या कर्मचारी व सहयोगी लोकांसाठी रिलायन्स जिओ होतं पण सप्टेंबर २०१६ साली क प्रत्येक भारतीयांसाठी जिओ ची सेवा देण्यास सुरवात कऱण्यात आली. 

जिओने मार्केटमध्ये येताच तीन महिन्यांसाठी मोफत सेवा देण्याची घोषणा केली. हे तारीख पुढचे तीन महिने वाढवण्यात आली. तेव्हाचं आरकॉमच्या उरल्यासुरल्या अपेक्षांना देखील फुल स्टॉप लागला. 

आज ३७ कोटी ग्राहक घेऊन रिलायन्स जिओ सर्वात मोठी कंपनी आहे. जगभरात हा क्रमांक तिसरा आहे तर एप्रिल २०२० साली ३३ टक्के हिस्सा विकून आरआईएल ने दिड लाख करोड गोळा केले आहेत. फेसबुकने ४५ हजार कोटी रुपये देऊन जिओत १० टक्के हिस्सा घेतला आहे. या सगळ्या सक्सेस होण्याच्या गोष्टी, खरी गोष्ट अनिल अंबानी यांनी हातात आलेली वाटणी घालवली आणि मुकेश अंबानी यांनी आपण पाहीलेलं स्वप्न दहा वर्षानंतर का होईना लेट पण थेट पूर्ण करुन दाखवलं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.