ईव्हीएम मशीनबद्दल काय बोलला भिडू..?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल काल लागले. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप ही ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ म्हणून समोर आली. पण या निकालांदरम्यान एक घटना अशी घडली की ‘हुबळी-धारवाड’ मतदारसंघातून भाजपचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना विजयी घोषित करण्यात आलं, परंतु मतदारसंघात झालेलं एकूण मतदान आणि ईव्हीएम मशीन यांवरील मतदानाची संख्या जुळून येत नसल्याने गोंधळ झाल्यामुळे शेवटी निवडणूक आयोगाने हा निकाल राखीव ठेवला होता. आज सकाळी परत जगदीश शेट्टर यांनाच विजयी घोषित करण्यात आलं.

या घटनेनंतर पुन्हा एकदा ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’ अर्थात ‘ईव्हीएम’च्या विश्वसनीयतेविषयी प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली. महाराष्ट्रात भाजप सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्रपक्षाचे म्हणजेच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपला, ‘एकदा बॅलेट पेपरवर मतदान घेऊन लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याचं आव्हान भाजपला दिलं’ तर विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांनी देखील ईव्हीएमबद्दल आपल्या शंका उपस्थित केल्या. या पार्श्वभूमीवर ‘बोल भिडू’च्या टीमने ईव्हीएमबाबतीत सामान्य जनतेला, मतदाराला काय वाटतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

sandipp and mohit

‘बोल भिडू’च्या अनेक वाचकांना असं वाटतं की ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड घोटाळा आहे आणि त्यामुळेच भाजप सातत्याने निवडणुका जिंकतोय, तर काही लोकांना हे पटत नाही. ईव्हीएममध्ये काही गडबड केली जाऊ शकत नाही, असं त्यांना वाटतं. ईव्हीएमला विरोध करताना संदीप कुराडे म्हणतात की, “ईव्हीएम हे इलेक्ट्रॉनिक मशीन असल्याने ते हॅक करणं सहजशक्य आहे” आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी ते बँकिंग प्रणालीतील हॅक झालेल्या डेटाचं उदाहरण देतात. मोहित शिर्के यांना मात्र हा युक्तिवाद मान्य नाही. ईव्हीएमवर होणारे आरोप त्यांना राजकीयदृष्ट्या प्रेरित वाटतात. ते उपरोधिकपणे लिहितात की, “२००३च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पोंटिंग याच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती, असं आम्ही म्हणायचो” एकूणच काय तर ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते, ही त्यांना अंधश्रद्धा वाटते.

kiran and amar

योगेश पुजारी, किरण गवते, अमर जगताप आणि वैभव पाटील हे सर्व एकत्रितपणे ईव्हीएम मशीनला आपला विरोध दर्शवतात. लोकांच्या बोलण्यातून सत्ताधारी भाजपविषयी रोष व्यक्त होत असतानाही त्याचं प्रतिबिंब मतदान निकालामध्ये का पडत नाही आणि सर्वच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप विजयी कसा होतो, हा प्रश्न त्यांना सतावतोय. लोकांचा जर खरंच भाजप सरकारवर विश्वास असेल तर एकदा बॅलेट पेपरवर मतदान घेऊन लोकांच्या ईव्हीएम मशीनबद्दल असणाऱ्या शंका दूर करायला काय हरकत आहे, असा सवाल ते उपस्थित करतात. योगेश पाटील यांना मात्र हे पटत नाही. ईव्हिएमवर शंका घेणाऱ्यांना उपरोधिकपणे उत्तर देताना ते दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अरविंद केजरीवाल, पंजाबमधील काँग्रेस, बंगालमधील तृणमूल काँग्रेस या पक्षांनी निवडणुकीत मिळवलेल्या विजयाचा दाखला देतात.

yogesh

ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित करताना पुरुषोत्तम म्हेत्रे हे जगभरातील अनेक प्रगत देशांत अजून देखील बॅलेट पेपरवरच  मतदान होत असल्याचे सांगतात. या देशांना ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल खात्री नसल्यानेच तिथे ईव्हिएम वापरात नाही, याकडे ते लक्ष वेधू इच्छितात, तर  याउलट बॅलेट पेपरवर मतदान घेतल्याने परत बूथ कॅप्चरिंग सारख्या घटना घडतील आणि निवडणूक प्रक्रियेतील हिंसाचार वाढेल अशी भीती जीत बोडींगे यांना वाटते. सागर घाग हे तर ईव्हीएम मशीन बंद केल्यानंतर महारष्ट्रात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘मनसे’ची सत्ता येईल याबाबतीत संपूर्णपणे आश्वस्त आहेत.

एकूण काय तर निवडणुकींमध्ये ईव्हीएमचाच वापर व्हावा की परत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, यासंदर्भात ‘बोल भिडू’च्या वाचकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.