खऱ्या आयुष्यातील ‘हिरा ठाकूर’ सापडलाय !

हिरा ठाकूर माहित नसणारा माणूस दुर्मिळ. सुर्यवंशमचं लोकशाहीकरण करण्याचा मान अर्थात सेट मॅक्सचा. मोठ्या कुटूंबात राहणारा. मनासारखं जगणारा आणि बापाच्या प्रेमाला मुकणारा हिरा ठाकूर. तसही सुर्यवंशमची स्टोरी सांगण्यात अर्थ नाही कारण तो तुम्हाला तोंडपाठच असेल. मुद्दा असा आहे की यात हिरा ठाकूरला कादरखान मदत करतो. त्यातून तो ट्रान्सपोर्टचा बिझनेस सुरू करतो. एका बसमुळे तो पुढे करोडपती बनतो वगैरे वगैरे. 

आत्ता हि कथा अशाच एका हिरा ठाकूरची. ज्याने उधारीच्या पैशावर ट्रक घेतला. आज त्याच्याकडे काय आहे तर एकूण ५००० च्या दरम्यान ट्रक आहेत. हजारो कोटींचा कंपनीचा टर्नओव्हर आहे आणि सुर्यवंशम इतकच तुम्ही त्यांच्या कंपनीच नाव ऐकलं देखील आहे. 

हि कथा VRL कंपनीच्या हिरा ठाकूर अर्थात विजय संकेश्वर यांची  ! 

विजय संकेश्वर कर्नाटकचे. बेळगाव पासून जवळ असणाऱ्या उत्तर कर्नाटकातल्या गदग गावचे.  सधन आणि भल्या मोठ्या कुटूंबात त्यांचा जन्म झाला. एकूण सात जणांच्या बहिणभावडांच्या ते चौथ्या नंबरचे होते. माणसानं एकतर थोरलं असावं नाहीतर धाकटं असावं. अधल्यामधल्यांच नक्की काय होत असतं वेगळं सांगण्याची गरज नाही. विजय संकेश्वर यांच्याबरोबर देखील काहीस तसच झालं असावं. म्हणून १९ वर्षांचे असताना त्यांना आपल्या भावंडाप्रमाणे वडिलांच्या व्यवसायाचा कारभार पाहणं क्रमप्राप्त झालं होतं. त्यांचे वडिल प्रकाशन व्यवसायात होते. त्याप्रमाणेच हा व्यवसाय करणं त्यांना गरजेचं होतं. 

त्या काळात वडिलांकडून काही पैसे मिळवणं आणि त्यातून बाहेर पडून एखादा व्यवसाय उभा करणं विजय यांच्यासाठी अशक्य असचं होतं. मग मार्ग उभा राहतो तो बंडखोरीचा ! 

त्यांनी मित्रांकडून पैसे उधार घेतले व त्यातून एक ट्रक विकत घेतला. किती एक ट्रक ! तो ट्रान्सपोर्टला लावला. एकट्याच्या हिंमत्तीने  आणि एकाच ट्रकावर त्यांचा बिझनेस सुरू झाला अगदी सुर्यवंशम मधल्या हिरा ठाकूर सारखा. 

गदक पासून हुबळी, धारवाड, बेळगाव अशी ट्रकची सेवा सुरू झाली. याच जोरावर त्यांनी VRL कंपनीची स्थापना करण्याचं ठरवलं. कंपनीच्या स्थापनेवेळी त्यांच्याकडे एकच ट्रक होता आणि ते साल होतं १९७६ चं. 

एका ट्रकच्या जिवावर त्यांनी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात आपले पाय पसरवायला सुरवात केले. काही वर्षातच एकाचे आठ ट्रक झाले होते. १९८३ साली विजयानंद रोडलाईन्स नावाने त्यांनी आपल्या कंपनीला PVT Ltd चं स्वरुप दिलं. आत्ता ट्रक देखील वाढू लागले आणि बिझनेस देखील. ट्रक सोबत ट्रॅव्हल्स आणि इतर क्षेत्रातदेखील विजयानंद रोडनाईन्स आपले पाय पसरू लागली होती ! 

साल १९९० विजयानंद यांच्या कंपनीचा वर्षाचा एकुण टर्नओव्हर होता चार हजार कोटींचा ! 

आत्ता विजयानंद खऱ्या अर्थाने ट्रान्सपोर्ट क्षेत्रातले बादशहा झाले होते.  त्यानंतर काय होतं तर हिरो राजकारणात येतो. विजयानंद देखील राजकारणात आले. १९९३ साली ते भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले.  काही काळ त्यांनी स्वत:चा कन्नड नाडू पार्टी नावाचा पक्ष काढून वेगळी चुल मांडण्याचा प्रयत्न देखील केला पण ते शक्य झालं नाही. नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचाच रस्ता पसंद केला. 

या दरम्यान त्यांच्या कंपनीची ग्रोथ चालूच होती. सध्या कंपनीची नोंद लिंम्का बुक ऑफ रेकार्डसने घेतली आहे. PVT LTD असणाऱ्या सर्वात जास्त गाड्या या कंपनीकडे आहेत अशी ती नोंद. सध्या VRL च्या बसेस 8 राज्यातील ७५ रस्त्यांवरुन धावत असतात तर त्यांची कुरियर सेवा तुम्हाला जेट प्लेनने कुरियर करण्याची सुद्धा सुविधा देते. 

थोडक्यात काय तर आज बऱ्यापैकी मोठ्ठ प्रस्थ विजयानंद यांनी निर्माण केलं आहे आणि त्यांची सुरवात कोठून होते तर एका ट्रकपासून ! 

जसा हिरा ठाकून ट्रान्सपोर्ट मध्ये घुसला तसेच हे घुसले एकाने बस घेतली एकाने ट्रक पण उधारीवर ! 

हे ही वाचा. – 

1 Comment
  1. सिध्दाराम वाघ says

    प्रचंड कष्टाळू व वक्तशीरपणा असणारा माणूस यांनी उभी केलेल्या विजय कर्नाटक या दैनिकाचे काम करताना यांना जवळून पाहता आले

Leave A Reply

Your email address will not be published.