खऱ्या आयुष्यातील कालीन भैय्या ज्याचं कार्पेट ८५ देशात निर्यात होतय..

मिर्झापूर, कालीन भैय्या…. काही आठवलं? तोच मिर्झापूरचा डॉन. ज्यानं केवळ कालीन अर्थात कार्पेट सारख्या वस्तूमधून आपलं साम्राज्य उभं केलं. या कार्पेटच्या आतून तो गावठी बंदुका आणि डेडबॉड्या पाठवायचा ही गोष्ट वेगळी. पण मेन व्यवसाय त्यानं कार्पेटचाच दाखवला होता, आणि त्यातून मोठा झाला.

पण भिडूनों, आम्ही एका अशा रिअल लाईफ कालीन भैय्याला आणलयं, जो याच कार्पेटवरच मोठा झालायं, श्रीमंत झालायं. पण मिर्झापूरमधल्या कालीन भैय्या आणि या खऱ्या कालीन भैय्यामध्ये फरक फक्त एव्हढाच की हा कालीन भैय्या सगळं १ नंबरमध्ये करून मोठा झाला आहे.

साल होतं १९८३. ठिकाण, उत्तर प्रदेशमधील मेरठ शहर.

तिथं एका आदित्य गुप्ता नावाच्या आठवीत शिकणाऱ्या मुलाच्या आई वडिलांनी आपल्या २ खोल्यांच्या घरातचं पोट भरण्यासाठी कार्पेट उद्योगास सुरुवात केली. नाव दिलं शारदा एक्सपोर्ट्स. पुढचे काही वर्ष व्यवसाय जेमतेमच व्हायचा.

इकडे पोरगं मोठं होऊ लागलं होतं. हुशार होतं त्यामुळे IIT सारख्या संस्थेत प्रवेश मिळवला. सर्वसामान्यपणे पोरं IIT मध्ये शिकल्यानंतर अमेरिकेत ४ – ५ लाख रुपये महिना पॅकेजची नोकरी धरतेत. पण हा आदित्य मात्र वेगळा निघाला. त्यांन शिक्षण झाल्यावर आपला फॅमेली बिझनेस हातात घेतला, आणि तो नावारूपाला आणायला सुरुवात केली.

आपले कार्पेट आधी मेरठच्या बाहेर, मग उत्तर प्रदेशच्या बाहेर असं न्यायला सुरुवात केली. आणि एक दिवस आदित्यनं भारताबाहेर झेप घेतली. १९९१ साली त्यांना जर्मनीतल्या एका प्रदर्शनामध्ये आपल्या कार्पेट उद्योगाची झलक दाखवण्याची संधी मिळाली. या संधीच सोन करतं आदित्यने भारताबाहेर आपल्या आपल्या कार्पेट उद्योगाच जाळं पसरवायला प्रारंभ केला.

पहिला ग्राहक मिळवला तो थेट स्वीडनमधून. स्वीडिश फ़र्निचरची कंपनी IKEA चा आणि ब्रिटनची Habitat अशा बड्या कंपन्यांनी आदित्य यांना मालाची ऑर्डर दिली. सुरुवातीलाच अशा नामवंत कंपन्यांचा विश्वास संपादित केल्यामुळे आदित्य गुप्ता हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चर्चेला आलं, मग पुढे आणखी काम मिळत गेली.

आता स्थिरस्थावर झाल्यावर ब्रँड सेट करण्याची वेळ आली होती. पण ही जरा रिस्क होती. कारण हा नवीन ब्रँड नव्हता तर, जुनाच शारदा एक्स्पोर्टच नाव बदलून नवीन कंपनी ब्रँड उभा करण्याचं आदित्य यांनी ठरवलं.

सामान्यपणे समजूत काय असते तर एखाद्या यशस्वी कंपनीच नाव बदलण्याची रिस्क घेत नाहीत. पण आदित्य यांनी ते ही आव्हान पेलले. तीस वर्षांपासून चालत आलेल्या शारदा एक्सपोर्ट्सच २०१३ मध्ये नाव बदलून ‘द रग रिपब्लिक’ असं ठेवलं.

ब्रँडवरून व्यवसायाचं मूल्य टिकून राहतं. तसचं व्यवसायाचं मॉडेल सुरक्षित राहतं, असं  त्यांचं मत होतं.

नाव बदलून देखील आदित्य याची व्यावसायिक घौददोड चालूच राहिली. हेच कसब आदित्य गुप्ता यांचे वेगळेपण दाखवून देत होतं. भारतात कार्पेट निर्मिती करणाऱ्या लाखो कंपन्या आहेत. पण आदित्य यांनी सातासमुद्रापार जावून आपल्या व्यवसाय स्थापन केलायं, तो या वेगळेपणामुळेच.

हल्लीच्या ऑनलाइन युगात आपला व्यवसाय पण मागं राहायला नको म्हणून आदित्य यांनी इ कॉमर्स क्षेत्रात पाउल ठेवलं. त्यांचे पुत्र राघव गुप्ता हा व्यवसाय चालवत आहेत. इ कॉमर्समुळे या क्षेत्रात आणखी पण बदल होईल, असं आदित्य गुप्ता याचं मत आहे.

भारतीय कार्पेट उद्योग सर्वोत्कृष्ट नक्षीकामासाठी ओळखला जातो. कार्पेट उद्योगामुळे जगभरातून भारतात बराच पैसा येतोय. याचं कारण आदित्य यांच्या कार्पेट बनवण्याच्या स्टाईलकडे बघितल्यावर कळतं. 

सुरुवातीला या कार्पेटसाठी आधी स्थानिक शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला जातो. आणि त्याच धाग्यात रुपांतर केल जातं. त्यानंतर सिल्क साड्यांचा पुनर्वापर करून त्याच्यापासून कार्पेट बनवलं जातं. सगळं बेसिक काम झाल्यानंतर त्यावर रंगकाम आणि नक्षीकाम केल जातं. या कार्पेटमधील पारंपरिकता टिकवण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया शक्य तितकी हातानं करण्याचा प्रयत्न केला जातो.

अशा या वेगळेपणा मुळेच ८० च्या दशकात २ खोल्यांच्या घरातून सुरु झालेला व्यवसाय आज ८५ देशांमध्ये निर्यात करण्याइतका मोठा झालायं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.