केजीएफमधला रॉकी खऱ्या आयुष्यात कर्नाटकमधला ‘थंगम’ होता, पण…

गॅंग लेकर आने वाले होते है गॅंगस्टर, वो अकेला आता था… मॉन्स्टर.

केजीएफच्या पहिल्या पार्टमध्ये हा डायलॉग आपल्या कानावर पडला आणि सगळ्या थिएटरमध्ये चिल्लापुकार झाला. हातात गन, तोंडात सिगरेट, रात्रीच्या वेळीही डोळ्यांवर असलेला गॉगल आणि पावलोपावली जाणवणारा स्वॅग बघून सगळी दुनिया रॉकीची म्हणजेच यशची फॅन झाली. जितकी हवा केजीएफच्या पहिल्या पार्टनं केली, त्याच्या दुप्पट हवा केजीएफच्या दुसऱ्या पार्टनं केली आणि आता टिझर आलाय तिसऱ्या पार्टचा…

केजीएफच्या पहिल्या पार्टची जाहिरात सुरू होती, तेव्हा एक गोष्ट सारखी समोर येत होती, बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी.

मग केजीएफ आला, सुपरहिट झाला. आता दुसरा पार्टही आलाय. पण ही ट्रू स्टोरी कुणाच्या आयुष्यावर आधारित आहे? खऱ्या आयुष्यातला रॉकी कोण होता?

तर लोकांच्या म्हणण्यानुसार एकच नाव येतं.. रावडी थंगम.

कोण होता हा थंगम आणि त्याच्यात आणि रॉकीमध्ये काय साम्य आहे..?

एक जमाना होता, जेव्हा भारतातला सगळ्यात मोठा डॉन होता… चंदनतस्कर वीरप्पन. वीरप्पनच्या दहशतीचा केंद्रबिंदू होता, तमिळनाडू. त्याच काळात कर्नाटकमध्ये एका नावाची दहशत पसरली होती, तोच हा रावडी थंगम.

वीरप्पन चंदनतस्करी करायचा, अपहरण करुन खंडणी घेऊन माणसं मारायचा. पण थंगमच्या साम्राज्याचा आधार होता चोरी.

कोल्लार गोल्ड फिल्डमध्ये थंगमचं साम्राज्य होतं. तो तिथून आपल्या कारभाराची सगळी सूत्रं हलवायचा. थंगम चोरायचा सोनं आणि पैशे. गुन्हेगारी विश्वात एंट्री केल्यावर फक्त चार वर्षांत त्यानं ४२ चोऱ्या केल्या. पण एक चोरी मात्र जबरदस्त गाजली, त्यानं एका ज्वेलरीच्या दुकानातून दीड लाख रुपयांची चोरी केली आणि त्याच्यामुळं आधीच टेन्शनमध्ये आलेले पोलिस आता जरा जास्तच खवळले.

मग पुढं थंगमचं काय झालं? सांगतो… त्याआधी थंगम आणि कोल्लार गोल्ड फिल्डचं कनेक्शन बघू.

माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार, थंगमची फॅमिली तमिळनाडूमधून मजूर म्हणून केजीएफमध्ये आली होती. जसं पिक्चरमध्ये दाखवलंय तसाच त्रास त्यांनाही भोगावा लागला होता. पिक्चरमधल्या रॉकीची सगळ्यात मोठी प्रेरणा असते, त्याची आई.

थंगमच्या आयुष्यातही त्याचं शक्तीस्थान त्याची आई ‘पौली’ हीच होती. इतकंच नाही, तर केजीएफ आणि आजूबाजूच्या परिसरात चोऱ्या करणाऱ्या थंगमच्या गॅंगचं नाव त्याच्या आईच्या नावावरुन ‘पौली गॅंग’ असं ठेवण्यात आलं होतं.

आता पुन्हा थंगमच्या स्टोरीकडे येऊ. 

चोऱ्या केलेल्या थंगमच्या मागावर पोलिस होते, पण त्याला सगळ्यात मोठा सपोर्ट होता केजीएफमधल्या मजुरांचा. कारण थंगम चोरलेल्या पैशातला वाटा त्यांना मदत म्हणून द्यायचा. त्यामुळं या मजुरांसाठी थंगम हा रॉबिनहूड होता. त्याच्या चोरीच्या घटना वाढत असल्या, तरी तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यानं ज्वेलरीच्या दुकानातून चोरी केल्यानंतर मात्र पोलिस खवळले आणि थंगमच्या विरोधात शूट ॲट साईटच्या ऑर्डर निघाल्या. 

२७ डिसेंबर १९९७ ला आंध्रप्रदेशच्या कुप्पममध्ये झालेल्या चकमकीत केजीएफ पोलिसांनी थंगमचा एन्काउंटर केला.

पण स्टोरी इथंच संपली नाही. थंगमची पौली गॅंग त्याचे तीन भाऊ गोपी, जयकुमार आणि सागायम चालवत होते. पोलिसांनी २००३ च्या जुलै महिन्यात गोपी आणि जयकुमारला चकमकीत मारलं, तर त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये सागायमचाही एन्काऊंटर झाला. पण गोष्ट इथंही संपली नाही.

या घटनेला जवळपास ९ वर्ष उलटली आणि पौलीनं सागायमचं एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे चौकशीमध्ये हे एन्काऊंटर फेक असल्याचं समोर आलं. 

२०१९ मध्ये केजीएफच्या दुसऱ्या पार्टचं शूटिंग सुरू असल्याच्या बातम्या पुढे आल्या, तेव्हा पौलीनं केजीएफचे डायरेक्टर प्रशांत नील यांच्याविरोधात याचिका दाखल केली. तिचं म्हणणं होतं की या पिक्चरमध्ये थंगमला चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलंय. 

मॅटर कोर्टात गेला. पण प्रशांत नील यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की केजीएफ पिक्चरचा आणि थंगमच्या आयुष्याचा काहीच संबंध नाही.

थोडं डोकं लाऊन विचार केला, तर थंगमच्या आयुष्यात आणि केजीएफ पिक्चरच्या स्टोरीत थोडं का होईना पण साम्य आहेच. दोघांच्या आयुष्यात एक फॅक्टर कॉमन होता, थंगमचं शक्तीस्थान त्याची आई होती आणि पिक्चरमधल्या रॉकीचीही. 

थंगमच्या कथेवर हक्क सांगणं असेल किंवा सागायमच्या फेक एन्काऊंटरसाठी लढणं… पौलीच्या आयुष्यासाठी एक डायलॉग फिक्स बसतो… 

इस दुनिया मे सबसे बडा योद्धा माँ होती है.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.