हा सीन सैनिकासाठी नाही तर सेनापतीसाठी..

मारला का नाय तुमच्या भीष्माचार्याला बगलेत, खरं सांगू हे परमेश्वराला सुद्धा खिश्यात घालतील… 

पत्रकार असणाऱ्या दिगू अर्थात निळू फुले सांगतो फ्रंन्ट पेजवर फोटो टाका. फोटो असतो मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे भीष्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तात्या जोशींच्या उपोषणाला गुंडाळण्याचा. सिंहासन सिनेमातला हा सीन लोकांना इतका भावला की कालच्या आंदोलनावर परफेक्ट बसणारा सीन म्हणून लोकांनी तो शेअर केला. मराठी सिनेमात आज जे राजकारण होतय ते य़ाअगोदरच दाखवण्यात आलं होतं अस सांगण्यात आलं,

त्यापुर्वी हा सीन नेमका काय आहे ते सांगतो. 

सीन असा आहे महाराष्ट्राचे पितामह भीष्म म्हणून ओळखले जाणारे तात्या जोशी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर प्राणांतिक उपोषणाला बसलेले असतात. मुद्दा असतो संयुक्त महाराष्ट्राचा. रात्रीच्या वेळी खुद्द मुख्यमंत्री बाहेर येतात. तात्या जोशींच्या पायावर आपले डोके टेकवतात. तुम्ही उन्हातान्हात बसलात तर मलाही इथेच बसावे लागेल म्हणून सांगतात. तुमच्या मागण्या त्या माझ्या मागण्या असा शब्द देवून ते तात्या जोशी यांना घरी घेवून जातात. पाहूणचाराने तात्या जोशींना आनंद वाटतो. पेपरमध्ये बातमी लागते उपोषण मिटले !! 

हा सीन मात्र आजच्या सैनिकासाठी नव्हता तर पुर्वीच्या सेनापतींसाठी होता. अण्णा हजारे सैन्यात होते पण सेनापती बापटांनी मात्र सेनापती हि पदवी लोकांनी त्यांच्या लढ्याबद्दल दिली होती. 

सिंहासन सिनेमाचे डायरेक्टर होते जब्बार पटेल आणि स्क्रिनप्ले लिहले होते विजय तेंडुलकर यांनी. हा सिनेमा १९७९ साली रिलीज झाला होता. सिनेमातले बरेच प्रसंग त्या वेळेच्या राजकारणावर बेतलेले होते. त्यातीलच एक सीन म्हणजे हे “उपोषण मिटले” प्रकरण. 

वास्तविक हा सीन आधारलेला होता तो सेनापती बापट आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यावर. 

सेनापती बापट यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता, व त्यासाठी ते थेट मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या घरासमोरच ठाण मांडून बसले होते. 

२० मे १९६६ ते २५ मे १९६६ दरम्यान सेनापती बापट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपोषणाबद्दल बसलेले होते.

याप्रसंगाबद्दल सांगायचे झाल्यास खुद्द विजय तेंडुलकर यांनीच वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावर लेख लिहला होता. त्या लेखात विजय तेंडुलकर लिहतात, 

“सेनापती बापट एकदा वसंतरावांच्या निवास-स्थानाबाहेर उपोषणाला बसले. म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना बसवले. मुख्यमंत्री वसंतराव सेनापतींशी इतक्या लीनतेने आणि आर्जवाने वागले की सेनापतींना वसंतरावांची विनंती मान्य करून निवास-स्थानाबाहेरचे आपले आसन निवास-स्थानात हलविण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. सेनापतींनीच ही हकिकत मला ऐकवली होती आणि आदराने उद्गारले होते, 

‘हुशार माणूस!’

याच प्रसंगावर सुरेश द्वादशीवार यांनी आपल्या लेखामध्ये लिहलं आहे की, 

सेनापती बापटांनी त्याच काळात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर सीमाप्रश्नावर आपले बेमुदत उपोषण मांडले. सेनापतींना सारा महाराष्ट्र भीष्माचार्य म्हणून शिरावर घेणारा होता. स्वाभाविकच सारे राजकारण त्यांच्या उपोषणाने ढवळून निघाले. सेनापतींचा निग्रह आणि राज्य सरकारचा नाईलाज यातून मार्ग कसा निघतो या चिंतेने सार्‍यांना ग्रासले असतानाच वसंतरावांनी सेनापतींची त्यांच्या उपोषणात मंडपात जाऊनच भेट घेतली. ते ज्या प्रश्नासाठी लढत आहेत त्यासाठी केंद्राकडे स्वतर्‍ मध्यस्थी करण्याची त्यांनी तयारी दाखविली. वसंतरावांच्या आर्जवातील प्रामाणिकपणाने सेनापतीच विरघळले. त्यांनी उपोषण तर सोडलेच आणि तेवढय़ावर न थांबता मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्यांचे एक दिवसाचे आतिथ्यही ‘वर्षा’वर जाऊन त्यांनी अनुभवले..

अर्थात तो सीन होता सेनापती बापट यांच्या उपोषणावर, पण आज राजकारण बदललं का ? तर नाही. आजही तेच चालू आहे. पण मुख्य मुद्दा म्हणजे आज चर्चा आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांचे उपोषण सोडण्यासाठी सहा तास उपाशी राहिले याची. पण दुर्देव अस आहे की, जितक्या चाणाक्षपणे विजय तेंडुलकरांनी सिनेमात हा सीन वापरला तसे राजकारण ओळखणारे विजय तेंडुलकर आज नाहीत..

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.