सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या आयुष्याची सत्यकथा म्हणजेच RRR सिनेमाची स्टोरी

सध्या थिएटरमध्ये RRR ची हवाय. हवा कसली तुफान राडा सुरूय. साऊथमध्ये दिड ते साडेतीन हजारपर्यन्त तिकीटांनी मार्केट मारलय. कोटींच्या कोटी उड्डाणे चालू आहेत. कुठे जागतिक पातळीवर अडीचशे कोटी कमावल्याचं सांगण्यात येतय तर कुठे हिंदी व्हर्जनने तीन दिवसात ४० कोटींचा आकडा पार केल्याचं सांगण्यात येतय.

थोडक्यात पैशाचा हिशोब मिडीयापण लावता येईना. रामचरण आणि ज्युनियर NTR यांची एक्टिंग आणि राजामौली साहेबांचं डायरेक्शन. त्यात ५०० कोटी खर्च करुन बनवलेला पिक्चर. सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत.

तशीच परफेक्ट स्टोरी आहे पिक्चरची.

हा पिक्चर “सिताराम राजू” आणि “कोमाराम भीम”  यांच्या आयुष्यावर आधारीत आहेत. कोण होते सिताराम आणि कोण होते कोमाराम भीम..

अल्लुरी सीताराम राजू

 अल्लुरी सीताराम राजू’ यांचा जन्म १८५७ सालचा विशाखापट्टणम भागातला. वयाच्या १८ व्या वर्षीचं ते संन्यासी झाले. यादरम्यान त्यांनी देशातील मुंबई, वडोदरा, बनारस, ऋषिकेश अशा अनेक शहरांचा प्रवास केला. त्यावेळी देशातल्या बऱ्याच देशातील सर्व तरुणांप्रमाणे अल्लुरी सीताराम राजू यांच्यावरही महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता.

१९२० च्या सुमारास अल्लुरी सीताराम राजू यांनी आदिवासींना दारू सोडण्याचा आणि पंचायतीमध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला. अर्थातच त्यावेळी देशात इंग्रजांच्या अत्याचाराची सत्ता होती.

अल्लुरी सीताराम राजू यांच्या जीवनावर त्याचा खोल परिणाम झाला. यानंतर महात्मा गांधींच्या अहिंसेचे विचार सोडून त्यांनी धनयुष्यबाण हातात घेऊन इंग्रजांविरुद्ध लढायला सुरुवात केली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना अल्लुरी सीताराम राजू यांनासुद्धा इंग्रजांच्या जाचाला समोर जावं लागलं. पण तरीही इंग्रजांच्या जाचक धोरणांसमोर ते कधीही झुकले नाही. १९२४ मध्ये ब्रिटीश सैनिकांनी क्रांतिकारक अल्लुरी यांना झाडाला बांधून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. अल्लुरी सीताराम राजू  यांनी देशासाठी जे केले ते विसरणं अवघड आहे.

दुसरे क्रांतिकारक म्हणजे कोमाराम भीम

तर या गोष्टीतले दुसरे क्रांन्तीकारक कोमाराम भीम जन्म १९०१ मध्ये हैद्राबादच्या संकेपल्ली इथला. ते गोंड समाजाचे होते. कोमाराम भीमांच्या जीवनात एकच टार्गेट होतं, गुलामगिरीच्या साखळीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं.

भीम फक्त १९ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना निजाम सैनिकांनी मारले. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे संतापलेल्या भीम यांना ‘निजामाच्या राजवटीला धडा शिकवायचा होता. याच दरम्यान त्यांच्यावर तेलंगणाचे वीर क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू यांचा खूप प्रभाव पडला.

भीमाने इंग्रजांच्या पाठीराख्या निजामांना हैदराबादमधून हाकलून देण्याची योजना आखली आणि निजामाच्या राजवटीविरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले. या दरम्यान भीम यांनी हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी ‘असफ जही घराण्या’ विरुद्ध बंड केले. ‘निजामाच्या राजवटीने’ कोमाराम भीमाला पकडण्यासाठी ३०० सैनिकांची फौज पाठवली, पण भीम यांनी आपल्या शौर्याने निजाम सैनिकांचा फडशा पाडला.

यादरम्यान त्यांनी निजामाच्या न्यायालयीन आदेश, कायदे आणि त्याच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान दिले. १९२८ ते १९४० या काळात त्यांनी हैदराबादच्या निजाम सरकारच्या विरोधात ‘गछापामार अभियान’ सुरू ठेवलं.

या काळात भीमाने शौर्याने युद्ध केले आणि जंगलातील प्रत्येक लढाई जिंकली. भीमाच्या शौर्याने निजामाचे सैनिक चळाचळा कापायचे.

अखेर निजाम आणि इंग्रजांविरुद्ध शेवटच्या क्षणापर्यंत लढणाऱ्या या योद्ध्याचा मृत्यू २७ ऑक्टोबर १९४० रोजी झाला.

अशा या दोन क्रांतिकारकांचा स्वतंत्रलढा फक्त त्या त्या भागापुरताचं मर्यादित होता, जो आता राजामौली यांनी पिक्चरच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आणलाय.

या पिक्चरमध्ये राम चरण यांनी स्वातंत्र्यसैनिक ‘अल्लुरी सीताराम राजू’ची भूमिका साकारली आहे तर साऊथचा ॲक्शन स्टार ज्युनियर एनटीआर ‘कोमाराम भीम’च्या भूमिकेत आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.