KGF चा दुसरा पार्ट येतोय, पण खऱ्या कोल्लार गोल्ड फिल्डचा इतिहास पिक्चरपेक्षा कमी नाही…
ज्याची लय चर्चा होती, त्या केजीएफ पिक्चरच्या दुसऱ्या पार्टचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. टिपिकल मसालापट असलेल्या या पिक्चरच्या पहिल्या पार्टनं प्रचंड यश मिळवलं होतं. दुसऱ्या पार्टच्या ट्रेलरमधल्या फ्रेम्स, सुपरस्टार यश, संजय दत्त आणि रवीना टंडन यांचे लुक्सही जोरदार व्हायरल झाले. सोबतच एक डायलॉग मात्र ट्रेलर आधीच प्रचंड हिट झाला,
तो म्हणजे ‘पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल”….
आता या पिक्चरमधल्या रॉकीची स्टोरी खरी नसली, तरी भारतातल्या खऱ्या केजीएफची स्टोरी मात्र खूप भारीये आणि तितकीच पॉवरफुलही देखील…पिच्चरमध्ये दाखवलेल्या गोष्टी या अर्थातच तडका चढवून दाखवल्या आहेत पण खरोखरच KGF खाण भारताची सोने कि चिडिया होती? असा प्रश्न आपल्याला पहिला पार्ट बघूनच पडतो. दुसरा पार्ट बघायला जाण्याआधी सगळ्यात एक गोष्ट वाचणं महत्त्वाचं आहे
KGF ची रियल स्टोरी
भारत एकेकाळी सोने की चिडिया होता पण आपलं सोनं यायचं कुठून? तर ऐतिहासिक कोल्लार गोल्ड फिल्ड म्हणजेच KGF मधून. १९ व्या शतकात इथे सोन्याची खाण सापडली होती. KGF मधली सोन्याची खाण जगातली दुसरी सगळ्यात खोल खाण आहे. १९०२ साली भारतात तयार झालेल्या ९५% सोन्याचा वाटा हा कोल्लार गोल्ड फिल्डमधून येत होता. पण याचा इतिहास तसा खूप जुना आहे..
१७९९ मध्ये टिपू सुलतान श्रीरंगपट्टणच्या लढाईत मारला गेला. तेव्हा विरोधी ब्रिटिश सैन्यात लेफ्टनंट जॉन वॉरन याला तेथील सोन्याच्या खाणींची माहिती मिळाली. या लढाईत मिळालेला सर्व भूभाग हा श्रीरंगपट्टणच्या संस्थानकडे विलीन करण्याचा ब्रिटिशांचा प्लॅन होता.
पण त्याआधी सर्व्हे खात्याकडून सर्वेक्षण अहवाल घेऊन नोंद केली जाणार होती. लेफ्टनंट जॉन वॉरन याला या कामासाठी कोल्लारला पाठवण्यात आलं.
चोल राजाची सत्ता असताना लोक हाताने उकरून सोने काढत असल्याची अफवा लेफ्टनंट जॉन वॉरन ऐकून होता…पण ते खरं कि खोटं हे माहिती करण्यासाठी त्याने तिथल्या गावकऱ्यांना आवाहन केले आणि जो कुणी त्याला सोन्याचा साठा कुठं आहे हे सांगेल त्याला इनाम जाहीर केला जाईल.
मग काय गावकऱ्यांनी बक्षीस मिळेल म्हणून बैलगाड्या भरून चिखल आणला. आणि त्या चिखल भरून आणलेल्या बैलगाड्या लेफ्टनंट जॉन वॉरनच्या समोर खाली करून धुतल्या जात होत्या. ५६ किलो चिखल धुतल्यानंतर सोन्याचे लहानलहान कण मिळत असायचे.
मग या लेफ्टनंट जॉन वॉरनची ट्यूब पेटली आणि त्याने तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर यातून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे मिळतील म्हणून त्यानं या भागात खोदकाम करण्यात यावं यासाठी काही पत्रव्यवहारही केला होता. पण त्याचं काय झालं नाही.
त्यानंतर १८०४ ते १८६० या काळात कित्येक लोकांनी इथं सोनं शोधायला सुरुवात केली होती. मात्र हे सगळे प्रयत्न अपयशी ठरले. पण १८७१ मध्ये ब्रिटिशांच्या फौजेत असलेला सैनिक मायकल लावेल याने ६७ वर्षे एका जुन्या लेखावर भरवसा ठेवुन सोनं शोधायला सुरुवात केली.
सोनं कुठं मिळेल असे खोदकाम करण्याजोगे साठे शोधून काढले त्यासाठी त्याला २ वर्षे लागली. १८७३ साली त्याने खोदकामासाठी परवानगी मागितली. ब्रिटिश सरकारला इथं सोनं नाही यावर ठाम विश्वास होता. त्यामुळं त्याला कोळसा खोदकामासाठी परवानगी देण्यात आली. २ फेब्रुवारी १८७५ ला खोदकामाला सुरुवात झाली. पण त्याच्या खोदकामावर बरीच बंधनं होती. हे खोदकाम २० वर्ष चाललं.
१८७७ मध्ये कोल्लारच्या वाढत्या लोकप्रियतेमुळं आर्मीच्या काही अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन “कोलार कमिशनरीज कंपनी लिमिटेड” ची स्थापना केली. जगभरातील खाणकाम क्षेत्रातील तज्ञ माणसं आणि इंग्लंडमधून अनेक कंपन्या कोल्लार गोल्ड फिल्डमध्ये उतरल्या. खाणकामाचा चेरामोहराच बदलून गेला.
केजीएफ मध्ये जसजसं सोनं सापडू लागलं, ब्रिटिशांचं कोल्लारवरचं प्रेम वाढू लागलं.
केजीएफ हे आशियातील दुसरं आणि भारतातील पहिलं शहर बनलं जिथं वीज आली होती. बंगलोर आणि म्हैसूर शहराच्या आधी इथं वीज आली होती.
सुरुवातीला मेणबत्त्या, मशाली आणि रॉकेलच्या चिमण्यांनी होणारं उत्खनन आता झगझगत्या बल्ब्सच्या उजेडात होऊ लागले. यावरूनच हा सरकारच्या किती जिव्हाळ्याचा विषय होता हे समजतं.
या भागाची एवढी भरभराट झाली कि या केजीएफला ‘लिटिल इंग्लंड’ म्हणलं जाऊ लागलं.जगभरातील इंजिनियर्स इथं येत होते. त्यामुळे गोल्फ क्लब आणि स्वीमिंग पूल, सोशल क्लब, थिएटर, हॉस्पिटल, शाळा या त्याकाळी तिथं होत्या.
पण दुसरीकडे खोदकाम करणाऱ्या मजुरांची अवस्था अतिशय बिकट होती. ‘कुली लाईन्स’ म्हणून ओळखला जाणारा हा भाग अस्वच्छतेसाठी प्रसिद्ध होता. यातील बहुसंख्य मजूर हे तमिळनाडूमधून पोट भरण्यासाठी आलेले होते. त्यांचं इथलं जीवन अतिशय खडतर होतं. इथं उंदरांचा एवढा सुळसुळाट होता कि एका वर्षात मजुरांनी तब्बल ५०,००० उंदीर मारले होते.
खाणीतही परिस्थिती अत्यंत बिकट होती. ५५ अंश सेल्सियस तापमानात काम करायला लागायचं. अपघात आणि कामगारांचे मृत्यू ही रोजचीच गोष्ट होती.
केजीएफमधले सोन्याचे साठे हळूहळू संपत आले. आणि मग लोकांनी तिथून काढता पाय घ्यायला सुरुवात केली. तरीही देश स्वतंत्र होईपर्यंत त्याचा ताबा इंग्रजांकडे राहिला. १९४७ ते १९५६ काळात या खाणींचा ताबा राज्य सरकारकडे होता. १९५६ साली भारत सरकारने जवळपास सर्व खाणींचा ताबा स्वतःकडे घेतला. अँग्लो इंडियन लोकांनी आपल्या हिस्स्यातील वाटा विकून आफ्रिकन देशांमध्ये खाणी घेतल्या.
२००१ साली इथून सगळ्या प्रकारच्या खाणकामाला बंदी करण्यात आली. याविरुद्ध लोकांनी मोठ्या प्रमाणात उठाव केले होते.
आता या सगळ्या खाणी पाण्याने भरल्या आहेत. त्यामुळेच कोल्लारच्या खाणींमध्ये अजून सोने असूनही हे सोने उपसता येणार नाही. कारण काढलेल्या सोन्याची किंमत ही खाणकामाच्या खर्चापेक्षाही कमी असेल.
कोल्लार गोल्ड फिल्ड ही खाण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता पण त्याचं पुढं काही झालं नाही.
पण दंतकथा आणि KGF सारख्या पिक्चरमधून ही सुवर्णकथा भारतीयांच्या मनात सतत झळाळत राहील, हे मात्र नक्की.
हे ही वाच भिडू:
- केजीएफमध्ये दाखवलाय तसलाच स्ट्रगल रॉकीनं खऱ्या आयुष्यातही केलाय…
- ना मराठी, ना बॉलिवूड बॉक्स ऑफिसचं गणित फक्त तेलगू पिक्चरानांच कळलंय
- अल्लू अर्जुनच्या पप्पांनी बॉलिवूडला सगळयात आधी 100 करोडचा हिट सिनेमा दिला होता…