सातारा जिल्हा बँकेचं अध्यक्षपद शिवेंद्रराजेंना न देण्याचं उत्तर सोपंय..!

१. सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपद पटकावण्याचा भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा डाव अखेर फसला.

२. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव आणि आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधामुळं शिवेंद्रराजेंचं अध्यक्षपद हुकल.

३. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेऊन शिवेंद्रराजे केलेली मोर्चेबांधणी निष्फळ ठरली.

या चर्चा जर तुमच्या कानावर येत असतील तर थांबा. या नुसत्या खुमासदार चर्चाच आहेत. यात काही तथ्य वाटत नाहीये. खरी चर्चा कशी घडली पाहिजे ? साताऱ्याच्या राजकारणातल्या बेसिक्सला धरून…आणि ती चर्चा काय आहे हे सांगणार बोल भिडू.

मग साताऱ्याच्या राजकारणातलं बेसिक्स काय आहे ?

तर जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच होते. जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार यावर बरेच दिवस खलबतं सुरू होती. अध्यक्षपदासाठी अनेकांनी फिल्डिंग सुद्धा लावली होती. या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीत असं ठरलं की,

अध्यक्षपद नितीन पाटील यांना द्यावं तर उपाध्यक्षपासाठी अनिल देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावा.

मग बातम्या आल्या की,

सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाला विरोध होत होता. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, शशिकांत शिंदेंचा एका मतानं झालेला पराभव आणि आमदार मकरंद पाटील यांच्या विरोध शिवेंद्रराजेंसाठी अडचणी ठरल्या.

पण असं काही नव्हतं. खुद्द शरद पवार म्हंटले होते की,

शशिकांत शिंदेंनी ही निवडणूक सिरियसली घेतली नव्हती.

शशिकांत शिंदेंचा मुद्दा बघायचा झाला तर यात एक जावळी फॅक्टर सांगितला जातो.

तर जावळी विधानसभेचं नेतृत्व अभयसिंह राजे भोसले यांनी केलं. अभयसिंहराजे भोसले हे सहा वेळा त्या मतदारसंघातून निवडून आले. शशिकांत शिंदे १९९९ ते २००९ पर्यंत जावळी मधून आमदार म्हणून निवडून आले. पुढे शिवेंद्र राजे या मतदारसंघातून आमदार व्हायला लागले.

शशिकांत शिंदे हे यापूर्वी जावळीतून बँकेवर निवडून जात होते. अलीकडच्या तीन निवडणुका कोरेगावमधून लढल्यामुळे त्यांनी आता जावळीवरचा दावा सोडला पाहिजे, असा एक मतप्रवाह होता. पण शशिकांत शिंदे यांची त्यासाठी तयारी नव्हती. हक्काची काही मते आहेत ती आपल्याला मिळतीलच, असा त्यांना विश्वास होता.

शिवाय सहकार पॅनेल अडचणी आल्या तर मदत करील अशीही त्यांची अपेक्षा होती. आणि विरोधात उभे असलेले ज्ञानदेव रांजणे कधीकाळी शशिकांत शिंदेंच कट्टर समर्थक मानले जायचे. त्यामुळे आपला विजय पक्का अशा शेवटच्या दिवसापर्यंत ते गोड गैरसमजात राहिले. थोडे काम केले, पण आकडेवारीत थोडे कमी पडले. जावळीवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे कोरेगावमध्ये लक्ष देता आले नाही. त्या ठिकाणीही बरेच राजकारण झाले. टप्प्यातील जागा हातातून गेली.

राष्ट्रवादीच्या किंवा सहकार पॅनेलच्या इतर कोणत्याही नेत्यांनी कोरेगावात फार लक्ष घातले नाही. काही जागा बिनविरोध झाल्यानंतर नेते निवांत झाले होते.

त्यामुळे शशिकांत शिंदेंच्या विषयामुळे शिवेंद्र राजेंना बँकेचं अध्यक्षपद मिळालं नाही असं अजिबात नाही. मग मुद्दा नक्की काय आहे ?

तर आता अध्यक्ष झालेले नितीन पाटील हे राष्ट्रवादीचे आहेत. तर उपाध्यक्ष अनिल देसाई हे शिवेंद्र राजेंच्या गटाचे आहेत.

जर राष्ट्रवादीला शिवेंद्रराजेंना साईडलाईनचं करायचं होतं तर त्यांनी शिवेंद्र राजेंच्या गटाचा उपाध्यक्ष का केला असता ?

मग उत्तर सोप्पय.

या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोरेगाव, खटाव, माण जावळी या चार सीट पडल्या. आता जर अध्यक्षपदी शिवेंद्र महाराज आले असते तर भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये ही असंच सुरू राहिलं असतं. आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता होती. म्हणूनच राष्ट्रवादीने पक्षाचा कट्टर माणूस अध्यक्ष करायचं ठरवलं.

नितीन पाटील हे लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत.

शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर साताऱ्याच्या पहिल्या फळीत लक्ष्मणराव पाटील होते. ते राष्ट्रवादीचे पहिले जिल्हाध्यक्ष झाले. नंतर ते 2 टर्म राष्ट्रवादीचे खासदार झाले. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सातारा जिल्हा बँक पूर्णपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात आली. राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख तर आहेच. पण सोबतच मकरंद पाटील हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. म्हणून नितीन पाटील यांचा चेहरा अध्यक्षपदासाठी पुढे करण्यात आला.

आणि दुसरीकडे शिवेंद्र महाराजांना न डावलता त्यांच्या गटाचे अनिल देसाई यांना उपाध्यक्ष करण्यात आलं.

इतकं सोप्पय ते….

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.