मस्क ट्विटरचा मालक झाल्या झाल्या ब्लू टिक काढून टाकण्याची मागणी होतीये, ती यामुळे…

इलॉन मस्क एकदम शानमध्ये एक मोठ्ठच्या मोठ्ठ वॉश बेसिन घेऊन ट्विटरच्या हेडक्वार्टरमध्ये शिरला. म्हणजे जगातल्या एखाद्या श्रीमंत माणसाने ट्विटरसारखा मंच विकत घेतल्यावर कसं ऐटीत यायला पाहिजे, पण तो आहे इलॉन मस्क.

तो ओळखला जातो मुळातच त्याच्या मिश्किलपणासाठी. आपल्या विनोदी अंदाजात मस्क ट्विटरच्या ऑफिसमध्ये शिरला. क्लासिक काळ्या रंगाचा आऊटफिट आणि हातात पांढरं सिरॅमिक बेसिन.

त्याच्याच ट्विटर अकाउंटवर त्याने हा विडिओ शेअर केला ज्यात हसतहसत तो असं म्हणतो, “you can’t help but let that sink in”.

इथेही आपली हुशारी त्याने दाखवली आणि लगेचच आपल्या ट्विटर अकाउंटची बायो बदलून त्याने ‘Chief Twit’ असं सुद्धा लिहिलं. आणि अखेर इलॉन मस्कने ४४ बिलियन डॉलरमध्ये ट्विटर विकत घेतलं.

इलॉन मस्कला एक सुरक्षित मंच म्हणून ट्विटरची उभारणी करायची आहे आणि त्याने ट्विटर विकत घेऊन त्या दिशेने एक पाऊल टाकलंय असं म्हणता येईल. मस्क कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना दिसून आलाय. त्यात दिवसभर #RemoveBlueTick असा हॅशटॅग ट्रेंडही झाला.

हे #RemoveBlueTick का आणि कशाला आहे हे आधी पाहुयात.

हा हॅशटॅग तुफान ट्रेंड झाला. प्रोफेसर दिलीप मंडल यांच्या व्हेरिफाइड अकाउंटवरून आज एक ट्विट करण्यात आलं.

त्यात ते असं म्हणाले, “ट्विटरमध्ये नवे मालक आले आहेत. जास्तीत जास्त रिट्विट करून हा व्हेरिफिकेशन आणि ब्लू टिकचा धंदा बंद करायला सांगितलं पाहिजे. हे सगळं वशिले आणि ओळखीतून होतंय. कसल्या कसल्या चिंटू लोकांना मिळालंय. आयकार्ड दाखवून सगळ्यांना द्या किंवा सगळ्यांचं काढून टाका. येऊ दे त्यांना समानतेच्या मैदानात.”

याआधी सुद्धा २०१९ मध्ये दिलीप मंडल यांनी ट्विटर व्हेरिफिकेशन आणि ब्लू टिकबद्दल आपलं मत मांडलं होतं. एका पोर्टलमध्ये त्यांनी याविषयी एक लेख लिहिला आहे.

त्यानुसार त्यांची बरेच दिवस अशी इच्छा होती की त्यांचं अकाउंट व्हेरीफाईड असावं. त्यांच्या अकाउंटला ब्लू टिक मिळावी यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये त्यांच्या अकाऊंटची ट्विटरने पडताळणी करून त्यांना ब्लू टिक द्यायला नकार दिला असं ते म्हणतात. ट्विटरच्या आंतरराष्ट्रीय संघाने त्यांना हा किताब देऊ नये असं ठरवलं असं ते म्हणतात.

बरं एवढंच नाही तर त्यांचं अकाउंट एका शुल्लक कारणावरून प्रतिबंधित करण्यात आलं. त्यानंतर हा वाद बराच वाढला आणि अनेक युजरनी होणारा जातीय भेदभाव समोर आणला. 

ट्विटरवर ब्लू टिक असणं ही मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या युजरचं नाव सर्च करता तेव्हा जर त्याच्या अकाउंट पुढे निळ्या रंगाचं चिन्ह असेल तर ते अकाउंट अधिकृत आहे, असं समजलं जातं. सोशल शेपर्ड या वेबसाईटच्या मते भारतात २४.४५ मिलियन ट्विटर युजर आहेत. या एवढ्या युजरपैकी मोजके अकाउंट हे ब्लू टिकवाले असतात म्हणजे विश्वासार्ह असतात.

२०१९ मध्ये हा जातीय वादाचा मुद्दा बराच पेटून उठला होता. ट्विटरमध्ये VIP कल्चर सुरु आहे असे आरोप युजरकडून झालेले. म्हणजे काय तर फुकट वाटप व्हावं तसं ट्विटर फक्त मोठ्या VIP लोकांचे अकाउंट अधिकृत करतंय असं सांगितलं जात होतं.

यामध्ये दिलीप मंडल यांनी ब्लू टिकच्या बाबतीत खालच्या जातीच्या लोकांना डावललं जातंय असं म्हटलं होतं. म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या महत्त्वाच्या लोकांना व्हेरिफाय होण्यापासून मुद्दाम लांब ठेवलं जातंय असं त्यांचं म्हणणं होतं.

दिलीप मंडल यांनी स्वतःची ब्लू टिक ट्विटरला परत केली होती आणि इथल्या प्रत्येकाला जेव्हा ती दिली जाईल तेव्हा ते आनंदाने परत घेतील असं म्हटलं होतं. 

त्यांनी एका लेखात ही ब्लू टिक कशी इंटरनेट समानतेच्या विरोधात आहे असं म्हटलं होतं.

त्यांच्यामते ब्लू टिक ही निव्वळ फसवणूक आहे. म्हणजे ब्लू टिक असलेले आणि नसलेले यांच्यातल नातं फक्त एका टिक मुळे बदलतं. हा सगळा पावर डायनॅमिक्सचा खेळ असल्याचं ते म्हणतात. जर ब्लू टिक हे युजरची ओळख अधिकृत आहे हे सिद्ध करण्यासाठी आहे तर ती करू शकणाऱ्या प्रत्येकाला तो हक्क दिला पाहिजे. ब्लू टिक असलेले आणि नसलेले यांच्यात सध्या दोन गट झालेत एक आहेत अशी लोकं जी मत तयार करू शकतात, लोकांच्या विचारांना मतांना दिशा देऊ शकतात ज्यांना ओपिनियन शेपर्स म्हणतात आणि दुसरे असतात अनुयायी म्हणजे फॉलोअर्स.

आता ज्यांच्या अकाउंटला ब्लू टिक नाहीये ते संभाषण सुरु करू शकत नाहीत असं नाहीये. पण त्यांच्याकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही जेवढं व्हेरीफाईड झालेल्या खात्यांकडे दिलं जातं. अशा युजरना जर ट्रेंड सुरु करायचा असेल तरी त्याला गती मिळायला वेळ लागतो.

इलॉन मस्कने ट्विटर का विकत घेतलं याबद्दल एक ट्विट केलं होतं.

त्या ट्विटमध्ये त्याने असं म्हटलं की येत्या काळात उजव्या आणि डाव्या विचारांचा पूर येऊ शकतो जो आपल्याला दोन गटात विभाजित करायला पुरेसा आहे. अशात असा एक मंच असला पाहिजे जिथे कुठल्याही हिंसाचाराशिवाय वेगवेगळ्या मतांची लोकं एकत्र येऊन सभ्यता जपत समजूतदार पद्धतीने वादविवाद करू शकतात, संवाद साधू शकतात.

येत्या काळात सभ्य समाज उभारायच्या उद्देशाने त्याने ट्विटर विकत घेतल्याचं सांगितलं. त्याने माणुसकीच्या नात्याने ट्विटर खरेदी केलं असं तो सांगतो. 

आता जर हा मंच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, समानता आणि माणुसकीचा पुरस्कार करणारा असेल तर प्रत्येक युजरसोबत समान वागणूक असावी या अर्थाने हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. त्यातच कंगना रनौत सुद्धा ट्विटरवर पुन्हा यावी याची मागणी केली जातेय.

२०२१ मध्ये मे महिन्यात कंगनाचं अकाउंट कायमस्वरूपी निलंबित केलं होतं. लागोपाठ झालेल्या नियमांच्या उल्लंघनामुळे तिचं अकाउंट काढून टाकल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलेलं. तिच्या अकाऊंटवरून द्वेषपूर्ण भाषा वापरली गेली असल्याचं सांगितलं गेलेलं, ज्यामुळे तिचं अकाउंट काढून टाकलं.

आता जिकडे प्रत्येक युजरला समान आरशातून बघितलं जावं असं सांगण्यात येतंय त्याच पार्श्वभूमीवर कंगनाचं अकाउंट सुद्धा रिस्टोर केलं जावं अशी मागणी समोर येतेय. 

आता जर ट्विटरला ब्लू टिक काढून टाकायची असेल तर ते कोणत्या आधारावर काढून टाकता येईल हे सुद्धा समजून घेऊ.

याबद्दल ट्विटरच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिलेली आहे. या सपोर्ट पेजवरच्या माहितीनुसार ट्विटर सूचना न देता तुमचं व्हेरिफिकेशन आणि ब्लु टिक काढून टाकू शकतं. पण त्यामागे काही मार्गदर्शक तत्त्व आहेत.

१. जर व्हेरीफाईड युजरने त्यांचं युजरनेम बदललं तर ब्लू टिक गायब होऊ शकते. तुमच्या व्हेरीफाईड अकाउंटसाठी दिलेलं तुमचं नाव तुम्ही नक्कीच बदलू शकता पण ट्विटर हॅन्डल ज्याला युजरनेम म्हणतात त्या नावात तुम्ही बदल करू शकत नाही.

२. तुम्ही ट्विटरची बायो आणि तुमचं नाव सहज बदलू शकता पण त्यात जर ट्विटरला असं लक्षात आलं की तुम्ही मुद्दाम दिशाभूल करायला बायो बदलत आहात तर अकाउंटवरून ब्लू टिक जाऊ शकते.

३. तुम्ही ब्लू टिक अकाउंट धारक असाल पण तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह नसेल तरी तुमच्या अकाउंटवर असलेला अधिकृतपणाचा शिक्का गायब होऊ शकतो. ट्विटर पॉलिसीच्या मते ६ महिने किंवा काही महिने जर अकाउंटवरून काही हालचाल झाली नाही तर अकाउंट जिवंत नसल्याचं ग्राह्य धरलं जातं आणि अशा युजरची ब्लू टिक निघून जाते.

२०२१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्या अकाउंटची ब्लू टिक याच कारणांनी नाहीशी झाली होती. 

४. ट्विटरच्या पडताळणीत असं लक्षात आलं की ट्विटरच्या सेवा नियमांपैकी कोणत्या नियमाचं उल्लंघन झालं आहे तरी तुमचं अकाउंट निलंबित होऊ शकतं तसंच ब्लू टिक सुद्धा निघून जाऊ शकते.

५. जर तुमच्या अकाउंटकडून ट्विट करण्याबाबत असलेल्या काही पॉलिसीचं उल्लंघन होत असेल तरी तुमची ब्लू टिक जाऊ शकते. यामध्ये द्वेषपूर्ण आचरण, अपमानास्पद भाषा, हिंसाचाराचं धोरण अशी अनेक धोरणं समाविष्ट आहेत.

६. जर तुम्हाला ठराविक काळापुरतं एखादं स्थान मिळालं असेल, ज्यामुळे तुमचं अकाउंट अधिकृत आणि व्हेरीफाईड आहे आणि जर ते स्थान, पद तुमच्याकडे नसेल तर ट्विटरला योग्य वाटल्यास तुमची ब्लू टिक काढून टाकली जाऊ शकते.

आता चाललेल्या या राड्यामध्ये युजर्सची ही मागणी इलॉन मस्कपर्यंत पोहोचते का ? आणि यावर नेमकी काय ऍक्शन घेतली जाते, हे येणाऱ्या काळात समजेलच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.