शरद पवार पंतप्रधान होवू शकतात का ? वाचा काय असतील यामागची कारणे.

राष्ट्रीय राजकारणातील सध्याचं वातावरण हे संभ्रमाच आणि त्यातच गोंधळाच आहे. गेली ६ दशके राजकारणात सक्रीय असणारे शरद पवार हे देशाचे पंतप्रधान होतील का? असा प्रश्न नेहमी तोंड वर काढत असतो. असाच एक मॅसेज बोलभिडूला आला. हा मॅसेज पाठवला होता मयुरेश जामदार मित्र परिवार या अकाऊंटवरुन.

त्यांनी विचारलं होतं,

शरद पवार पंतप्रधान होवू शकतात का? हो तर कसे आणि नाही तर कसे ?

देशाच्या राजकारणात सगळ्यात जास्त काळ काम केलेले नेते म्हणून सध्या शरद पवारांच नाव घेतलं जात. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पिढी पासून आजपर्यंत ते सक्रीय राजकारणात आहेत.

भारताचा इंडिया कडे होणारा प्रवास जर कोणी “ह्याची देही ह्याची डोळा” पहिला असेल तर ते शरद पवार आहेत.

इतके असतांना देखील आज पर्यंत ते पंतप्रधान पदाला गवसणी का घालू शकले नसतील? नेमक त्यांना या पदापासून दूर का राहावं लागलं? शरद पवारांच्यात ही कुवत आहे का? असे अनेक प्रश्न लोकांना नेहमीच पडतात. या प्रश्नांची उत्तर साहजिकच त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीवर अवलंबलेली आहेत.

या सगळ्या प्रश्नांकडे जाताना एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे ती म्हणजे शरद पवार यांना आज पर्यंत तीन वेळा पंतप्रधान पदाने हुलकावणी दिली आहे.

१९९१ साली राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव, अर्जुन सिंग, आणि शरद पवार यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते पण त्यावेळी देखील पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांचे अल्पमतातले सरकार पडले,

तेव्हा शरद पवार हे प्रमुख विरोधी पक्ष नेते असतांना देखील त्यांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली.

त्यानंतर निर्माण झालेली संधी होती २००९ साली, कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही असे दिसत असतांना समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी करून तिसरी आघडी स्थापन करण्याची हालचाल पवार यांनी चालू केली होती आणि तेच पंतप्रधान पदाचे उमेदवार होते, पण तेव्हा कॉंग्रेस ने २०० चा टप्पा पार केला आणि पुन्हा एकदा शरद पवारांना पंतप्रधान पदाचा वारा फक्त शिवून गेला. आता पुन्हा एकदा विरोधी पक्षांची मुठ बांधताना शरद पवार दिसत आहेत, अशा वेळी शरद पवारांच्या पंतप्रधानपदाबाबत चर्चा होणे स्वाभाविक आहे. सुरवातीला आपण पाहूया की शरद पवारांना पंतप्रधान होण्याबाबत कोणत्या गोष्टी अनुकूल ठरू शकतात.

 

शरद पवार पंतप्रधान होण्यासाठी हे घटक कारणीभूत ठरतील. 

  • राजकीय कारकीर्दीचा अनुभव.

या पार्श्वभूमीवर विचार करता शरद पवार यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांच्या पाठीमागे असणारा भक्कम अनुभव हे सगळ्यात महत्वाचे कारण ठरू शकते, कारण त्यांच्या अनुभवाच्या तोडीस तोड असा दुसरा राजकीय नेता सध्या तरी दिसत नाही.

  • शरद पवार यांच्यात असणारे नेतृत्व कौशल्य.

शरद पवार यांच्यात असणारे नेतृत्व कौशल्य ज्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या सारख्या मात्तबर राजकारणी माणसाने पवारांना राजकारणात आणले. हाच गुण सध्य स्थितीतला त्यांना पंतप्रधान होण्याच्या आशेचा केंद्रस्थान आहे. सर्व पक्षीय मित्र आणि तितकेच नैतिक दडपण पवारच निर्माण करू शकतात आणि हेच दडपण दुसऱ्याबाजूला असणाऱ्या स्वत:ची राष्ट्रभक्त आणि सात्विक राजकारणी अशी प्रतिमा तयार करून घेतलेल्या नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकेल (जर ते पंतप्रधान पदाचे उमेदवार राहिले तर).

  • तडजोडीच्या राजकारणातील निर्णायक भूमिका.

राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेल्या एकंदरीत अंदाजाप्रमाणे कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही अशी शक्यता  आहे. अशावेळी सर्व विरोधी पक्षांची ताकद एकत्र करून ती टिकवण्याची ताकद फक्त शरद पवारांच्यात आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रीय पातळीवर सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार यांच्या तडजोडीच्या राजकारणाचा आतापर्यंतचा अनुभव कामाला येईल. याचे उदाहरण घायचे झालेच तर १९९० सालची निवडणूक पाहता येईल. कॉंग्रेसला महाराष्ट्रात बहुमत मिळाले नसतांना देखील अपक्ष १२ आमदारांचा पाठींबा घेऊन पवार मुख्यमंत्री झाले होते.

  • जनसंपर्क आणि “नेता” म्हणून असणारा दबाव.

पवार यांचा जनसंपर्क आणि त्यांची असणारी राष्ट्रीय प्रतिमा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. यातला एक महत्वाचा दुवा म्हणजे त्यांनी केंद्रात असतांना कृषी मंत्री, संरक्षण मंत्री ते विरोधी पक्ष नेता म्हणून बजावलेली भूमिका भारतीय राजकारणावर प्रभाव टाकणारी आणि यशस्वी अशीच आहे. याच प्रतिमेच्या जोरावर नुकतेच बंगाल प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांचे सर्व नेते पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत उपस्थित होते आणि चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीने ने आज सकाळी सध्या दिल्ली येथे चालू असणाऱ्या उपोषणाला शरद पवार यांनी भेट दिल्याचा फोटो त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डेल वर शेर करून, शरद पवारांचा “आधाराचा खांब” असा उल्लेख केला आहे.

राहुल गांधी आणि शरद पवार हे दोन्ही नेते त्या व्यासपीठावर उपस्थित असतांना फक्त शरद पवारांचा केलेला हा उल्लेख त्यांची राष्ट्रीय राजकारणातील प्रतिमा अधोरेखित करणारा आहे.

 

शरद पवार या कारणांमुळे पुन्हा पंतप्रधान पदापासून लांब राहू शकतात. 

  • अविश्वासू प्रतिमा.

प्रत्येक मनुष्यात कितीही वैशिष्ट्ये असली तरी त्याचे काही दुर्गुण त्याला नेहमीच आव्हान देत राहतात. पवारांच्यात असाच एक दुर्गुण असल्याचे मत बहुतावंशी रूढ आहे. शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे आणि ते कधी विश्वासघात करतील याचा नेम नाही, हेच त्यांचे आज पर्यंतचे राजकारण सांगते.

स्वताच्या गुरूला अर्थात वसंतदादा पाटील यांना देखील असा धोका त्यांनी दिला होता आणि १२ आमदार फोडून पवारांनी मुख्यमंत्री पदावरून वसंतदादांना पायउतार केले होते. असा आरोप त्यांच्यावर होतो. असेच त्यांनी राष्ट्रीय राजकारणात देखील केले आहे त्यामुळे सगळेच प्रादेशिक पक्ष जरी त्यांच्या शब्दावर एकवटले तरी त्यापूर्वी हा इतिहास पाहून त्यांचे पाय अडखळू शकतात.

  • काँग्रेसी पक्षात त्यांची असणारी प्रतिमा.

भारतीय जनता पक्षाने जरी “कॉंग्रेस मुक्त भारत” वैगेरे घोषणा दिली असली तरी देखील आज ही कॉंग्रेसचं वलय टिकून आहे हे नाकारता येत नाही. शरद पवार यांनी १९७८ साली कॉंग्रेस पक्ष सोडला आणि महाराष्ट्रात जनता दल आणि कॉंग्रेस (एस) या दोन पक्षांची आघाडी करून त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवले. नंतर पुन्हा त्यांनी १९८७ मध्ये कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर १९९९ साली त्यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन केला.

हा सगळाच प्रवास काँग्रेसी लोकांना बोचणारा आणि पवारांवर अविश्वास निर्माण करायला लावणारा आहे. हा प्रवास त्यांना पंतप्रधान पदापासून लांब ठेवण्याचे कारण देखील ठरू शकते. कारण कितीही प्रादेशिक पक्ष एकवटले तरी एका राष्ट्रीय पक्षाच्या अर्थात कॉंग्रेसच्या बळाशिवाय शरद पवार पंतप्रधान होण्याची शक्यता तशी कमीच आहे.

  • अतीमहत्वकांक्षी वृत्ती.

शरद पवार यांना आज पर्यंत सगळ्यात जास्त काय नडले असेल तर ते म्हणजे त्यांची अतीमहत्वकांक्षी वृत्ती. सत्ता काबीज करण्यासाठी कुणाच्या ही मुंडक्यावर पवार पाय ठेवू शकतात अशी त्यांची प्रतिमा आहे. हीच प्रतिमा त्यांच्यासाठी मारक ठरू शकते. याचे उदाहरण द्यायचे झालेच तर शरद पवार यांनी २००९ साली तिसरी आघाडी स्थापन करण्याचा केलेला प्रयत्न या प्रयत्नाने जरी कॉंग्रेस पक्षाला घाम फोडला असला तरी देखील, मुंडक्यावर पाय देण्याच्या नादात पवारांची अवस्था मात्र ‘तेल बी गेले आणि तूप बी गेले हाती आले धोपटणे’ अशी झाली होती हे विसरता येणार नाही.

  • देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाची संकुचित प्रादेशिक ताकद.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जर एकंदरीत सध्याचे संख्याबळ पहिले तर ते इतर प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत कमजोर दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाला अनेक आव्हाने प्राप्त झाली आहेत ती झेलण्यात त्यांचा पक्ष अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्यांच्या नैतिक दडपणाबरोबरच त्यांच्या पक्षाचे संख्याबळ जर ताकद सिद्ध करू शकले नाही तर पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधान पदापासून लांब राहावं लागेल याची शक्यता नाकारता येत नाही.

या सगळ्या शक्यता आहते म्हणजेच “ये तो बसं ट्रेलर हे पिक्चर तो अभी बाकी हे दोस्तो”. या राजकीय चित्रपटाची वाट आपण पाहूच….

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.