आठ दिवसात ९ किलो कमी ; शहाजीबापूंनी केलेली सुदर्शन क्रिया काय आहे..

काय झाडी काय डोंगार फेम शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेत. यावेळी चर्चा होण्याचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी कमी केलेलं वजन. फक्त आठ दिवसात ९ किलो वजन घटवल्याने त्यांची चर्चा सुरू आहे.

२४ डिसेंबर पासून शहाजी पाटील अधिवेशनातून गायब झालेले होते. शहाजीबापू हे श्री श्री रवीशंकर यांच्या बंगलुरू येथील हॅपीनेस कार्यक्रमात सुदर्शन क्रिया करण्यासाठी गेले होते अस सांगण्यात येत होतं. श्री श्री रवीशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंगलुर येथील आश्रमात पंचकर्म व सुदर्शन क्रिया होते. यामध्ये हॅप्पीनेस मनाचा आनंद यासोबतच आरोग्याबाबचे प्रश्न सोडवण्यात येतात. इथेच जावून शहाजीबापूंनी आठवड्याभरातच नऊ किलो वजन घडवल्याने चर्चा सुरू आहेत…

काय असते सुदर्शन क्रिया?

सुदर्शन क्रिया ही श्वासावर आधारित असणारी प्रक्रिया आहे. जी तणावापासून मुक्त करण्यासाठी भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी केली जाते. सुदर्शन क्रिया ही एकदाच न करता रोज घरच्याघरी देखील केली जाते.

सुदर्शन क्रिया कशी काम करते?

सुदर्शन क्रिया श्वासांना नियंत्रित करते. मुळात आपले श्वास हे आपल्या भावनांशी जोडलेले असतात. म्हणजे तुम्ही कधी लक्ष दिलं असेल तर, जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपण लहान आणि जलद श्वास घेतो. तर, नाराज असताना आपण मोठे श्वास घेतो.

जश्याप्रकारे भावनांनुसार श्वास घेण्याची पद्धत बदलते तश्याच प्रकारे श्वास घेण्याची पद्धत बदलल्याने भावनांवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. नेमकं हेच करण्यावर सुदर्शन क्रियेत भर दिला जातो. राग, लोभ, इर्शा, काळजी, दुख: या भावनांना दूर ठेवण्यासाठी विविध श्वास चक्रांचा वापर सुदर्शन क्रियेत केला जातो. जास्तीत जास्त आनंदी भावना आपल्या मनात राहाव्या यासाठी श्वास चक्रांचा वापर केला जातो.

मन आणि शरीर यांच्यात  सुसंवाद आणणारा दुवा म्हणजे सुदर्शन क्रिया:

आपलं मन आणि शरीर यांच्यामध्ये एक लय असते. उदाहरण द्यायचं झालं तर, वेगवेगळ्या वेळेला आपल्याला भूक लागते आणि झोप येते. मन आणि शरीरात जशी लय असते तशीच लय श्वास, भावना आणि विचारांमध्ये असते. जेव्हा मन आणि शरीरात असलेल्या लयीत ताळमेळ नसतो तेव्हा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. मानसिक दृष्ट्या आपण विचलीत होऊ शकतो. सुदर्शन क्रिया नेमकं हेच होऊ नये हे पाहते. म्हणजे मन आणि शरीरात जी लय असते त्यात दुवा बनण्याचं काम सुदर्शन क्रिया करते.

सुदर्शन क्रियेची सुरूवात कशी झाली?

श्री श्री रविशंकर यांनी भद्रा नदीच्या काठावर १० दिवस उपवास आणि मौन पाळलं होतं. हे मौन संपलं तो दिवस म्हणजे, १७ सप्टेंबर १९८१. त्याच दिवशी श्री श्री रविशंकर यांनी सुदर्शन क्रिया म्हणजे काय हे मांडलं होतं. याविषयी श्री श्री रवि शंकर यांनी सांगितलेली माहिती,

“मी आधीच ध्यान आणि योग शिकवत होतो. पण काहीतरी चुकतंय असं वाटलं. लोक त्यांची अध्यात्मिक साधना करतात, पण त्यांचं जीवन डब्यांमध्ये असल्यासारखं वाटतं. ते त्यांची प्रार्थना, ध्यान आणि आध्यात्मिक साधना करतात, पण त्यानंतर जेव्हा ते जीवनात बाहेर पडतात तेव्हा ते खूप वेगळे लोक असतात.

म्हणून, ही आंतरिक शांतता आणि जीवनाची बाह्य अभिव्यक्ती यातील अंतर आपण कसे भरून काढू शकतो याचा विचार करत होतो.

शांततेच्या काळात, सुदर्शन क्रिया एक प्रेरणा म्हणून आली. मी शांततेतून बाहेर आल्यानंतर, मला माहित असलेल्या सर्व गोष्टी मी शिकवू लागलो आणि मी पाहिले की लोकांना खूप चांगले अनुभव आले आहेत.”

सुदर्शन क्रिया केल्याचे फायदे काय आहेत?

सध्या तरुणांमध्ये एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस थोडक्यात काय तर, मानसिकतेशी संबंधित सर्व त्रासांवर सुदर्शन क्रिया हा एक उपाय आहे.

याशिवाय व्यसनाधीनता सोडवणं, एकाग्रता, चांगली झोप येणं, रक्तदाब कमी करणं, श्वसन क्रियेत सुधारणा, दोन आठवड्यात ५६ टक्के तणाव हार्मोन्स कमी होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे बरेच फायदे सुदर्शन क्रियेमुळे होतात.

खरंतर ही सुदर्शन क्रिया आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांवरचा इलाज आहे.

आजची परिस्थिती बघितली कर, अनेक जण हे मानसिक तणावाखाली असल्याचं दिसतं. त्यामागचं कारणही तसंच आहे. आताची लाईफस्टाईल, वर्क कल्चर, असंतुलित आहार या सगळ्या गोष्टींमुळे या समस्या जवळपास प्रत्येकालाच भेडसावतात. सुदर्शन क्रियेसारखी गोष्ट ही आजच्या घडीला अनेकांच्या जीवनातल्या बऱ्याच समस्या सोडवू शकते.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.