राम-सीतेच्या मुर्तीसाठी नेपाळहून दगड आणण्यामागे फक्त अध्यात्मिक नाही भौगोलिक कारणही आहे

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या भव्य दिव्य अशा अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम सुरु आहे. २०२४ पर्यंत राम मंदिर आपणा सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राम मंदिरांच्या गर्भगृहामध्ये प्रभू राम आणि सीता मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. पण या पवित्र मूर्ती कोणत्या योग्य दगडापासून बनवायच्या याचा शोध सुरू झाला आणि या शोधकार्यात एक पथक गेल्या महिनाभरापासून गुंतलं होतं.

अखेर हा शोध येऊन थांबला तो नेपाळच्या पवित्र शाळीग्राम दगडापर्यंत.

तब्बल ६ कोटी वर्षे जुने असलेले हे दोन्ही शाळिग्राम दगड नेपाळहून अयोध्ये आलेत, याच दगडांपासून भगवान राम आणि सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत त्यामुळे जिथून या दोन्ही शिळा येत होत्या तिथे-तिथे लोकं दर्शनासाठी गर्दी करत होते.

पण नेपाळहुन उत्तर प्रदेशपर्यंत हा दगड आणला गेला त्याचं कारण म्हणजे हा शाळिग्राम दगड फक्त नेपाळमध्येच आढळतो.

राम जन्‍मभूमि मंदिर बांधकाम ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, प्रभू राम आणि सीत मातेची मूर्ती पवित्र शाळीग्राम दगडापासून बनवली जाणार असल्याचं ठरवण्यात आलं तेंव्हा काही लोकं बनावट शाळीग्राम दगडही घेऊन आले होते. पण या दगडांची योग्य पारख झाल्यांनतर शेवटी नेपाळमधल्या गंडकी नावाच्या नदीत खरा शाळीग्राम सापडला.

या नदीच्या पात्रातून दोन मोठ्या शाळीग्राम शिळा बाहेर काढण्यात आल्या, त्यापूर्वी धार्मिक विधी करण्यात आले. नदीची माफी मागितली गेली. विशेष पूजा करण्यात आली.

यामध्ये नेपाळ सरकारनेही सहभाग घेतला. नेपाळ सरकारच्या परवानगीनंतरच नदीतील शिळा काढण्यात आल्यात. दोन्ही शाळीग्रामचे वजन २६ आणि १४ टन आहे तर सात फूट लांब आणि पाच फूट रुंद असल्याची माहिती मिळतेय. या दोन्ही शिळा तब्बल ६ कोटी वर्षे जुन्या असल्याचा दावा राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी केलाय. याच दगडांवर कोरीव काम करून रामसीतेची मूर्ती तयार करण्यात येणार आहे.

पण रामसीतेची मूर्ती तयार करण्यासाठी शाळीग्राम दगडच का निवडला असावा ?

त्यामागे असणारं धार्मिक महत्व पाहूया. हिंदू धर्मात अनेक दगड शुभ मानले जातात. त्यातलाच एक म्हणजे शाळीग्राम. नेपाळच्या गंडकी नदीमध्ये विशेष प्रकारचे शाळीग्राम आढळतात. या दगडावर चक्र, गदा असे चिन्ह दिसतात.

हिंदू धर्मानुसार, शाळीग्राम दगड भगवान विष्णूचे स्वरूप आहे.

त्यामागं सांगितली जाणारी पौराणिक कथा अशी कि, जालंदर नावाचा एक असुर होता ज्याची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे जालंदर देवांनाही अजिंक्य झाला होता. म्हणून वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव शक्य नाही हे देवांना कळलं. म्हणून श्रीविष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून, त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले. म्हणून वृंदेने देहत्याग केला आणि देहत्याग करताना श्रीविष्णूंना दगड म्हणजेच शाळिग्राम होण्याचा शाप दिला. विष्णूनेही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला.

पण वृंदेच्या पतिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला की, तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शालिग्रामाशी, म्हणजेच विष्णूशी, तुळशीचे लग्न लावले जाईल. म्हणून तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडाशी लावलं जातं. विष्णूंना शालिग्राम स्वरूप मानले जाते आणि पूजले जाते.

पण हा शाळीग्राम दगड नेपाळमध्येच कसं काय सापडतो?

धार्मिक मान्यतेनुसार, शिवपुराणात असं सांगितलंय कि, वृंदा शापातून मुक्त झाल्यावर भगवान विष्णूनेही वृंदा देवीला वरदान दिले की तू सदैव गंडकी नदीच्या रूपाने पृथ्वीवर वाहत राहशील. तुझे एक नाव नारायणी असेल. मी तुझ्या जलप्रवाहात शालिग्राम शिलेच्या रूपात निवास करीन. नदीमध्ये राहणारे असंख्य कीटक त्यांच्या तीष्ण दातांनी माझ्यावर माझ्या चक्राचे चिन्ह बनवतील. या दगडांना माझे स्वरूप मानून यांची पूजा केली जाईल.

भगवान विष्णूने दिलेल्या या वरदानामुळे शालिग्राम शिला गंडकी नदीमध्ये वास करते आणि म्हणूनच हा दगड कायमच गंडकी नदीतच मिळतो आणि या दगडावर किड्याच्या आकारासारख्या ज्या खुणा दिसतात त्या खुणा सुदर्शन चक्रासारख्या दिसतात. असे म्हटले जाते की, शालिग्रामचे ३३ प्रकार आहेत, त्यापैकी २४ प्रकार भगवान विष्णूच्या २४ अवतारांशी संबंधित आहेत अशी धार्मिक मान्यता आहे.

हे झालं धार्मिक पण भौगोलिक स्थान पाहायचं तर नेपाळची शालिग्रामी नदी भारतात प्रवेश करते तेंव्हा अधिकृत कागदपत्रांनुसार या नदीचं नाव बुढी गंडकी नदी असं होतं.

नेपाळमधील मयगडी आणि मुस्तांग जिल्ह्यातील मुक्तिनाथ इथेच या काली गंडकी नदीच्या काठी, दामोदर कुंडात आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात शाळीग्राम दगड आढळतो. या नदीत आढळणाऱ्या शिळांना जगभरात पवित्र मानलं जातं. पण पुरातत्वशास्त्रज्ञ आणि जीवाश्मशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे कि, या दगडावर किड्याच्या आकारासारख्या खुणा दिसतात त्यावरून शाळीग्राम दगड हा अमोनाईट्स नावाचा जीवाश्म होता.

४०० दशलक्ष वर्षांपूर्वी जेंव्हा डायनासोरसह अनेक जिवाश्म अस्तित्वात होते त्यातलाच एक होता अमोनाईट्स. अमोनाईट्स हे सागरी प्राणी होता. ऑक्टोपस, कटलफिश आणि नॉटिलसच्या प्रजातींमधलाच एक. शेल्सच्या आकाराचा. डायनासोरच्या सोबत अनेक प्रजाती नामशेष झाल्या त्यात अमोनाईट्सही लुप्त झाला.

जेव्हा एखादा जीव मरतो तेंव्हा तो नष्ट होण्याच्या प्रक्रियेत त्याच्या हाडांचे जे अवशेष असतं त्यावर वर्षांनुवर्षे गाळ, वाळूचे कण, मातीचे थर तयार होत जातात आणि हळूहळू त्या अवशेषांचं रूपांतर एका टणक दगडात किंव्हा खडकात होतं.

आजही जसे डायनोसॉरचे, त्याच्या अंड्याचे दगडी अवशेष सापडतात तसेच अमोनाईट्सचे अवशेषही आढळून येतात ते शिळाग्राम दगडाच्या स्वरूपात.

शिळाग्राममध्ये जो आकार दिसतोय तोच अमोनाईट्सचा आकार होता थोडक्यात शेल्स सारखा. असे अवशेष किंव्हा दगड मादागास्कर, अल्बर्टा ऑफ कॅनडा आणि भारताच्या शेजारी नेपाळमध्ये आढळतात.

पण मग शिळाग्राम दगड नेपाळमध्येच का आढळतो?

तर, ६-७ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या भूमंडलात बदल झाले. इंडियन प्लेट्स आणि युरेशियन प्लेट्स एकमेकांवर आदळल्या आणि हिमालयाची निर्मिती झाली. पृथ्वीच्या टेकनॉटिक्स प्लेट्स सरकल्या तेंव्हा पृथ्वीवरच्या समुद्री भागातले जीवाश्म हिमालयाच्या पायथ्याशी जमा झाले आणि गंडकी नदी ही हिमालयाच्या पायथ्याशीच आहे म्हणून हे शिळाग्राम दगड नेपाळच्या गंडकी नदीतच आढळतात.

वर्षनुवर्षे तयार होते गेलेले हे शिलग्राम दगड मुळातच खूप मजबूत असतात, त्यामुळे कारागीर बारीकसारीक गोष्टी त्यावर कोरू शकतो. म्हणून याआधीची अयोध्येतील रामाची धूसर मूर्ती शाळीग्राम शिळेवरच कोरलेली आहे. रामजन्मभूमीच्या जुन्या मंदिरातले बरेचसे खांबही शाळीग्रामपासूनच बनवलेले आहेत. हेच नाही भारतातल्या, महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरातल्या पवित्र मूर्ती देखील याच दगडापासून कोरलेल्या आहेत. म्हणून अयोध्येतील प्रभू श्रीराम आणि सीतामातेची मूर्ती देखील याच दगडापासून बनवली जाणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.