आपला सेहवाग एवढा डेंजर झाला, त्यामागं मर्डरचा इतिहास आहे…

भारतीय खेळाडूंचं क्रिकेट म्हणजे तंत्रशुद्धता, हे पार जुन्या काळापासून चालत आलेलं चित्र. सुनील गावसकर, विजय मर्चंट हे खेळाडू तर या तंत्र घोटवून घडलेल्या मुर्त्या. इस्त्री केलेल्या शर्टला तरी सुरकुती दिसेल पण या भिडूंच्या बॅटिंग टेक्निकमध्ये चूक सापडली, तर शप्पथ. हेच तंत्र हा भारतीय क्रिकेटचा पाया बनला होता. फुटवर्क, रेषेत पुढं येणारी बॅट म्हणजेच क्रिकेट… या डोक्यात पक्कं बसलेल्या समजाला कुणी छेद दिला असेल, तर तो विरेंद्र सेहवागने.

समोर जगातला कुठलाही बॉलर असो, तो वेगवान असो किंवा फिरकी, सेहवागला भीती नावाचा शब्दच माहीत नव्हता. त्यानं मारायचं ठरवलं की ठरवलं. कसोटीत सुरुवातीलाच सलग छकडे मारायची डेरिंग सेहवागमध्ये होती. २०११ च्या वर्ल्डकपमध्ये तर जवळपास पाच मॅचेसची सुरुवात त्यानं पहिल्या बॉलवर बाऊंड्री मारुन केली. 

जगातले कित्येक बॅटर्स शतक जवळ आलं की, जरा बिचकून खेळतात, पण ९४ असो, १९४ असो किंवा २९४ सेहवाग सिक्स मारायला अजिबात पुढं मागं बघायचा नाही. कुणी क्रिकेट पंडितानं त्याच्या फुटवर्कमधल्या चुका काढल्या असत्या, तर या गड्यानं त्याला स्कोअरबोर्डचे आणि आपल्या विक्रमांचे दाखले दिले असते.

बरं, ही बेडर बॅटिंग करताना चेहऱ्यावर, वागण्यात टेन्शन-बिन्शन अजिबात नसायचं. ‘कैसे बतायें क्यों तुझको चाहे’ गाणं म्हणत साहेब बॉल आपल्यापाशी येण्याची वाट पाहायचे आणि त्याच बॉलवर किरकोळीत सिक्स मारायचे. आपण बॅटिंग करतोय आणि समोरुन शोएब अख्तर दात ओठ खाऊन बॉलिंग करतोय, असा नुसता विचार केला तरी आपल्याला घाम फुटेल. पण सेहवाग बॅटिंगला असला, की कदाचित अख्तरच घामाघूम होत असेल.

सगळ्या जगाला एका प्रश्नानं चांगलंच सतावलं, ते म्हणजे सेहवागला भीती कशी काय वाटत नाही? जगातल्या कुठल्याही बॉलरला फोडायची, सेंच्युरीच्या जवळ असताना सिक्स मारायची डेरिंग त्याच्यात आली कुठून?

या प्रश्नाचं उत्तर स्वतः सेहवागनंच दिलंय.

सेहवाग वाढला नजफगढमध्ये. दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर असलेलं नजफगढ सेहवागमुळे जितकं प्रसिद्ध आहे, तितकंच कधीकाळी गुन्हेगारीमुळे कुप्रसिद्ध होतं. सेहवागच्या बालपणी इथं ना क्रिकेटच्या सुविधा होत्या, ना चांगले रस्ते. सेहवाग जिथं वाढला तिथलं वातावरणही खुंखार होतं. तिकडं टोळीयुद्ध रंगायचं त्यामुळे मारामाऱ्या, खून या किरकोळ गोष्टी होत्या. सेहवागच्या घरासमोरच दोन व्यापाऱ्यांचा मर्डर झाला. लहानग्या सेहवागनं हे आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्यामुळं त्याच्या मनातली भीती ही गोष्टच निघून गेली.

सेहवाग एका ठिकाणी सांगतो, ‘एक बार मर्डर होते देख लिया, तो फिर फास्ट बॉलर्ससे क्या डरना?’

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.