कॅप्टन बदलला, प्लेअर्स बदलले, तरी आरसीबी प्रत्येकवेळी माती का खाते..?

जगातला सगळ्यात मोठा आशेवर बसलेला माणूस म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा फॅन. २००८ ते २०२२ या काळात आयपीएलचे पंधरा सिझन झाले, तरी आरसीबीचे हात काही ट्रॉफीपर्यंत पोहोचले नाहीत. दुसऱ्या सिझनमध्ये त्यांनी फायनल गाठली, नंतर परत फॉर्म गंडला. आधी आरसीबीचं गणित होतं, की त्यांचा नंबर कायम तळात असायचा. नंतर त्यांचा पॅटर्न बदलला.

हे गडी वरच्या नंबर्सपर्यंत पोहोचू लागले. प्लेऑफ गाठू लागले आणि मग इथं माती खाऊ लागले.

यंदाच्या सिझनलाही असंच झालं, एबी डिव्हलियर्सची अनुपस्थिती, विराट कोहलीनं सोडलेलं नेतृत्व यामुळं आरसीबी गणित कसं जमवणार हा मुद्दा होताच. पण दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस आणि वनिंदू हंसरंगानं त्यांची नौका बुडू दिली नाही.

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मॅच मुंबईनं मारली आणि आरसीबीला प्लेऑफचा रस्ता मोकळा झाला. एलिमिनेटरमध्येच त्यांचं बाहेरचं तिकीट पक्कं झालं असतं, पण लखनौची टीम त्यांच्यापेक्षा खराब खेळली.

राजस्थान रॉयल्सचं आव्हान तगडं होतं आणि इथं मात्र आरसीबीनं पहिले पाढे पंचावन्न केले.

आता कॅप्टन बदलून झाला, जुने जाऊन नवे प्लेअर्स आले,

तरी आरसीबीनं माती नेमकी कुठं खाल्ली..?

सगळ्यात पहिला मुद्दा येतो, चोकर्सचा

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिकेच्या टीमला चोकर्स म्हणून चिडवतात. यामागं लॉजिक असं असतं, की सगळ्या टूर्नामेंटमध्ये आफ्रिकन प्लेअर्स कडक खेळतात, त्यांचा आत्मविश्वास आणि फॉर्म बघून असं वाटत असतं, की यंदा कप यांचाच. पण सेमीफायनल किंवा फायनलमध्ये छोट्या छोट्या चुकांची माळ लाऊन आफ्रिका हारते.

अगदी हाच पॅटर्न आरसीबीचा आहे. ते प्लेऑफपर्यंत पद्धतशीर मजल मारतात, मग महत्त्वाच्या मॅचमध्ये त्यांचा मेन बॅट्समन फेल जातो. ज्या बॉलरकडून त्यांना सर्वाधिक अपेक्षा असतात, तोच खवून फटके खातो. मिडल ऑर्डर गंडत जाते आणि पदरी पराभवच येतो. हे सगळं होतं कधी? तर जेव्हा संघाला सगळ्यात जास्त गरज असते तेव्हाच. तिथं यांचा आत्मविश्वास गंटागळ्या खातो.

गेली तीन वर्ष प्लेऑफ गाठूनही आरसीबीला फायनल गाठता आली नाहीये, ही गोष्ट या चोकर्सच्या शिक्क्याला आणखीन अधोरेखित करते.  

दुसरा पॉईंट असतोय, डिपेन्डन्सीचा

क्रिकेट हा खेळ असतोय ११ जणांचा. फक्त एकाच जीवावर टीमनं मॅच मारलीये असं हजारातून एकदा होतं. त्यामुळं ११ मधल्या किमान ५-६ प्लेअर्सनं चांगली कामगिरी केली की टीमचं स्थान मजबूत होतं. पण आरसीबी यात गल्लत करत आलीये. त्यांच्या टीमचा डोलारा कायम दोन-तीन कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो. आधी हे कार्यकतें विराट कोहली आणि एबी डिव्हिलिअर्स होते आणि बॉलिंगमध्ये युझवेंद्र चहल.

समजा बॅटिंगमधले हे दोन एक्के चेस करताना फेल गेले, तर बाकीच्यांनी टीमला सावरुन घेतलंय असं फार कमी वेळा व्हायचं. त्यात यावर्षी एबीडीही नव्हता आणि कोहलीचा फॉर्मही.

 साहजिकच फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक यांच्यावर दडपण वाढलेलं. त्यामुळं एक दोघांवर डिपेंड असणाऱ्या आरसीबीचा पाय एक-दोघांच्या अपयशानंतर आणखीन खोलात जातो.

तिसरं कारण म्हणजे ऑलराउंडर्सची कमतरता

आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबईच्या यशाचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे ऑलराऊंडर्स. हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्ड कुठूनही मॅच फिरवू शकायचे. हीच मुंबई इंडियन्सची मुख्य ताकद होती. हे आरसीबीनं २०१६ मध्ये ट्राय करुन पाहिलं, पण वॉटसन आणि स्टुअर्ट बिन्नीनं फायनलला मोक्याच्या क्षणी कच खाल्ली.

त्यानंतर आरसीबीनं तगड्या ऑलराउंडर्ससाठी जोर लावलाच नाही. त्याचं प्रेशर कायम त्यांच्या लोअर ऑर्डरवर येत गेलं आणि काही मॅचेस सोडल्या तर विजयाची रम्मी काही लागली नाही.

चौथं कारण येतं, कोहली फॅक्टर

राजाचा जीव पोपटात असतोय, तसा आरसीबीचा कोहलीत. कोहलीचा फॉर्म हा त्यांची ताकदही आहे आणि कमजोरीही. २०१६ ला कोहलीनं ९७३ रन्स मारले, त्यावर्षी आरसीबी फायनलला होती. यंदा कोहलीचा फॉर्म गंडला आणि आरसीबीची गाडी फायनल गाठू शकली नाही. शेवटच्या लीग मॅच मध्ये करो या मरो स्थिती असताना, कोहलीच्या ७३ रन्समुळं आरसीबी जिंकली होती.

चेन्नई, मुंबई आणि बँगलोर या तीन टीम अशा आहेत, ज्या त्यांच्या कॅप्टनभोवती फिरतात. चेन्नईत धोनीला सपोर्ट करायला जड्डू आहे, ऋतुराज आहे. मुंबईकडेही रोहितच्या जोडीला बुमराह, पोलार्ड, ईशान आहेत. पण कॅप्टन कोहलीला एकमेव आधार होता, तो म्हणजे एबीडी.

थोडक्यात बाकीच्या टीमनं मोट्या कॅप्टनसोबत आपली कोअरही डेव्हलप केली, हीच गोष्ट आरसीबीला काय जमली नाही.

पाचवा मुद्दा असाय, ज्याच्यावर आरसीबी काहीच करु शकत नाही… नशीब!

केएल राहुल, शेन वॉटसन आणि लिस्ट काढायला गेलं तर असे बरेच प्लेअर्स आहेत, जे बँगलोरनं रिलीझ केल्यानंतर भारी खेळले. आरसीबीमध्ये त्यांना संधी मिळाली पण त्यांची बॅट बोलली नाही. कित्येक मॅचेसमध्ये टॉस जिंकणं महत्त्वाचं असताना, आरसीबीचं नशीब दगा देतं, मोक्याच्या क्षणी कॅचेस सुटतात आणि मॅचचा रिझल्ट नकोसा वाटतो.

यावेळी पर्पल कॅपच्या रेसमध्ये आरसीबीचा बॉलर टॉपला आहे, गेल्यावर्षीही पर्पल कॅप त्यांनीच जिंकलेली. फाफ डू प्लेसिसही ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये टॉप फोरला आहे. मात्र तरीही आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडली, तेही विजयाची चांगली संधी असताना. 

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये कोहली चांगला खेळला असता तर, मॅक्सवेलनं थोडे जास्त रन्स केले असते तर, सुरुवातीपासून चालत आलाय तसा दिनेश कार्तिक चालला असता तर, सिराजला फटके पडले नसते तर… तर कदाचित आरसीबी फायनलमध्ये असती. पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं.

पुढच्या वर्षी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायचीये, टीम बांधायचीये, कोअर बांधण्यात केलेल्या चुका टाळायच्यात आणि सगळ्यात मेन म्हणजे मोक्याच्या मॅचेसला माती खायची नाहीये, तर कुठं आरसीबीचे चाहते म्हणू शकतात, “ई साला कप नामदे.”

नाहीतर ‘On to the next one’ आहेच…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.