म्हणून डिसेंबर महिन्यात गोवा ट्रिप करणं मस्ट असतंय भिडू…

प्रत्येक भिडूच्या आयुष्यात एक तरी गोवा ट्रीप कॅन्सल झालेली असते. अशा टाइपचे अनेक मीम्स आपण वर्षभर शेअर करत असतो. चला गोव्याला जाऊया, असं वर्षभर म्हटल्यावर शेवटी डिसेंबरमध्ये मात्र एकदाचा गोवा प्लॅन फिक्स होतो. तर डिसेंबर आणि गोवा प्लॅन यांचं नेमकं कनेक्शन काय आहे?

गोवा म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो, तो नजरेला पुरत नाही असा अथांग पसरलेला फेसाळलेला समुद्र. नंतर समोर येते ती समुद्रकिनाऱ्यावरची हिरवळ आणि बरंच काही. भिडू ती वाईबच वेगळी असते. बरं एक नाही, गोव्यात असे अनेक बीच आहेत.

बागा, कँडोलिम, वेगेटर, अंजुना, कलंगुट. यातल्या कोणत्याही बीच वर जायचं, खायचं-प्यायचं, लोळायचं, पसरायचं आणि धमाल मजा करायची. झालंच तर स्कूबा डायविंग, पॅरासेलिंग, विंड सर्फिंग अशाही गोष्टी तिथे करता येतातच. त्यात डिसेंबरची थंडी म्हणजे तर सोने पे सुहागाच. उन्हाचा त्रास नाही, पावसाची कटकट नाही पण थंडीची धुंद करणारी नशा मात्र असते.

नंतर तिकडला हॉट एयर बलून आपल्याला खुणावतो आणि सातवे आसमान पे घेऊन जातो. आकाशातून गोवा दर्शन घडवतो. मग आकाशातून खाली उतरायचं ते डायरेक्ट सायकलवर स्वार व्हायचं. सायकलवरुन दोन्ही बाजूनी थंडगार वारा घेत, अख्ख गोवा पालथं घालण्याची मजा काही औरच असते भिडू.

क्लबिंगला किंवा समुद्रावर जाण्याव्यतिरिक्त ‘Silent Noise Party’ नावाची एक भन्नाट गोष्ट सुद्धा तुम्हाला गोव्यात करता येते. या पार्टीत कोणालाच मोठ्या आवाजाची, रात्रीच्या १० वाजण्याची आणि पोलिसांची काहीच चिंता नसते. कारण इथे लोक आपापले हेडफोन्स कानाला लावूनच रात्रभर दंगा करत असतात. गोव्याला जाणार असाल तर ह्या ‘Silent Noise Party’ चा अनुभव घेतल्याशिवाय परत येऊ नका.

हे झालं ठिकाणांचं, पण गोवा ट्रीप डिसेंबरमध्येच का बरं करायची. तर आता दारू स्वस्त मिळते यापालिकडेही त्याची काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे, डिसेंबर महिन्यातली हवा. निसर्ग ह्या महिन्यात भलताच खुश असतो. आणि त्यामुळे तो आपल्यालाही खुश ठेवतो.

दूसरं म्हणजे डिसेंबर महिना आणि थंडीचं जसं समीकरण आहे तसंच डिसेंबर म्हणजे वेडिंग सीझन असंही एक समीकरण आहे. आणि गोव्यातल्या चर्चमध्ये लागणारी लग्न पाहायला गेलात तर तुम्हाला पण लग्न करू वाटेल इतकी ती बघायला सुंदर असतात आणि दिसतात. आणि फक्त चर्चमधली लग्नच नाहीत तर destination wedding नामक संकल्पना सुद्धा गोव्यामुळेच अस्तित्वात आली असंही आपल्याला म्हणता येईल.

डिसेंबर महिन्यात गोवा एक्सप्लोर करण्याचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे तिथला दूधसागर धबधबा. याच महिन्यात हा धबधबा सगळ्यात जास्त वाहतो. भर थंडीत धबधब्याखाली भिजायचं आणि नंतर गरमागरम वाफाळलेला चहा प्यायचा यांसारखं दुसरं सुख नाही.

यानंतर चौथं कारण म्हणजे डिसेंबर महिन्यात गोव्यात होणारं ‘Mando’ फेस्टिवल. हा गोव्याचा पारंपारिक उत्सव म्हणून साजरा होतो. या फेस्टिवलमध्ये, आपल्याला तिथल्या पारंपरिक लोकसंगीत आणि लोकनृत्याचा आस्वाद घेता येतो.

आणि आता डिसेंबर महिन्यातच गोव्याला जायचं पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या महिन्यातले २ मोठे सण. एक म्हणजे ख्रिसमस आणि दुसरं म्हणजे न्यू ईयर. ख्रिसमसच्या बाबतीत गोव्याचा नाद नाही. २५ डिसेंबर जवळ आला की गोव्यातल्या रात्री अधिक सुंदर दिसायला लागतात. गल्ल्या गल्ल्यांमधलं प्रत्येक घर आणि घराबाहेरची सजावट पाहतच राहावी अशी असते. गोव्याला गेलं की आपल्या नवीन वर्षाची सुरवात आल्हाददायी होणार हे ही फिक्स असतं.

आता हे तुम्ही गोव्यात बसून वाचत असाल, तर स्वतःच स्वतःची पाठ थोपटा आणि प्लॅन हुकला असेल, तर मन छोटं करु नका. डिसेंबर पुढच्या वर्षी पुन्हा येणारे आणि गोवा काय कुठं जात नसतोय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.