धोनीअण्णाची चेन्नई सारखीच कशी बरं जिंकत्या?

सकाळ सकाळ व्हॉट्सअप पाहिलं, तर जेजुरीत आल्यागत वाटत होतं. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल जिंकली आणि कार्यकर्त्यांनी स्टेस्टसचा नुसता धुरळा उठवला.

ज्याच्यामागं आपण उभं राहणार तो किंग आणि आपण किंगमेकर असणार

असलं खतरनाक वाक्य आणि धोनीचा फ्लेक्स टाईप फोटो… असलं स्टेटस तर लय हिट झालं.

आता चेन्नईनं चौथ्यांदा आयपीएल जिंकल्या म्हणल्यावर चर्चा तर होणारच. तुम्हा भिडू लोकांना प्रश्न पडतात तसं इकडं कार्यकर्त्यांना पण पडतात. आम्हाला लय आधीपासून एक प्रश्न पडलेला की, या धोनीअण्णाची टीम सारखीच कशी जिंकत्या? आता चेन्नई कप जिंकली म्हटल्यावर आम्ही ठरवलं, तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावं.

लय कार्यकर्ते म्हणले का मॅच फिक्स असतात. आता ते एवढं सोपं नसतंय भिडू. आयसीसी, बीसीसीआय बत्त्या लावून सगळं बघत असत्या. धोनीची टीम जिंकत्या ते दमदार कामगिरी आणि डोकेबाजीमुळं.

आता जरा विस्कटून सांगतो-

राडा परफॉर्मन्स

आतापर्यंत चेन्नई जिंकत आल्या ते सातत्यपूर्ण कामगिरीमुळे. एक सिझन सोडला तर प्रत्येकवेळी त्यांच्या पोरांनी समोरच्या टीमचा बाजार उठवलाय. बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा फिल्डींग असो, सुट्टी नाय म्हणजे नाय. भले ही गॅंग सुरुवातीच्या मॅचेसमध्ये फेल जाईल, पण फायनल-सेमीफायनल म्हणल्याव त्यांना एक वेगळाच जोश येतो. मग या पिवळ्या वादळात टिकून राहणं भल्याभल्यांना अवघड जातं.

टीमबांधणी

भावकी लांब राहिली आपल्याकडं घरातल्या घरात पण भांडणं होतात. हा त्याच्याशी बोलत नाय, तो याच्यासोबत जेवायला बसत नाय असे लय किस्से असतात. मग कुणी वेगळं होतंय किंवा कुणी रुसून बसतंय. आयपीएलमध्ये पण प्लेअर टीमासोडून दुसऱ्या टीममध्ये जातात की. पण घर चालवायला लागणारी चार पाच मेन माणसं जपणं जसं गरजेचं असतं, तसंच धोनीनं केल्या. धोनी, रैना तर सुरुवातीपासून आहेतच, पण रायुडू, डूप्लेसि, ठाकूर, जडेजा असली वाढीव पोरं पण धोनीअण्णानी जपून ठेवली.

लय पावसाळे पाहिलेत

आता अण्णाच्या टीमला २०१८ मध्ये सगळे जण काय म्हणायचे, तर ‘डॅडीज आर्मी.’ कारण टीमचं सरासरी वय तीसच्या पुढे होतं. आता आपण असतो तर भांडणं काढत बसलो असतो. अण्णाच्या टीमनं काय केलं? तर डायरेक्ट ट्रॉफी जिंकल्या. विरोधकांचा आवाज बंद. आता वयामुळं फिटनेस जरा वरखाली होतो, पण टेन्शनमध्ये असताना कसं खेळायचं याचा अनुभव पक्का असतो. याच अनुभवाच्या जोरावर मॅच फिरत असते आणि आम्ही लय पावसाळे पाहिलेत म्हणत चेन्नईची टीम थाट्टात जिंकते.

चुकायचं आणि शिकायचं

भिडू लोक तुम्हाला जरा हार्ड ज्ञान देतो. ॲडम गिलख्रिस्ट नावाचा ऑस्ट्रेलियाचा प्लेअर तुम्हाला माहित असंल. पॉन्टिंग, वॉर्न, सायमंड्स असल्या खडूस टीममध्ये हाच कार्यकर्ता जरा शांत होता. आता गिलख्रिस्टचं एक वाक्यय, ‘A wise man learns by the mistakes of others, a fool by his own.’ थोडक्यात शहाणी माणसं लोकांच्या चुका बघूनच शहाणी होतात, ते चुका करून मग शिकत बसत नाही. आता धोनीअण्णाची टीम नऊ वेळा फायनल खेळलीये, त्यात चारदा जिंकलीये. या सगळ्यात त्यांनी समोरच्या टीम काय चुका करते हे लय जवळून पाहिलं आणि आपण कुठं माती खातोय याचा पण अभ्यास केला. त्याच त्याच चुका ते करत बसले नाहीत आणि फुल सक्सेस मिळवला.

विश्वास

एखाद्या प्लेअरचा स्वतःवर नसल तितका विश्वास सीएसके त्याच्यावर ठेवत्या. आता बाबा तू एक-दोन मॅचेस फेल गेलायस, उद्यापासनं गुमान पाणी वाटायचं असला गाढवपणा सीएसके करत नाय. ते म्हणतात, बाबा आमचा तुझ्यावर विश्वास आहे, तू आज नाय खेळला तरी उद्या फिक्स खेळणार. आणि तसं होतं पण. म्हणजे बघा- गेल्यावर्षी ऋतुराज गायकवाड पहिल्या तीन मॅचेसमध्ये फेल गेला. धोनीअण्णा म्हणले, ‘काय वाद नाही मर्दा, तूला ओपनिंग आवडत्या तू तिकडं खेळ.’ पोरानं सलग तीन पन्नास केले, यावर्षी ऑरेंज कॅप जिंकली आणि डायरेक्ट किंग झाला. रॉबिनभाऊ उथप्पाचा पण असाच विषय. सगळा सिझन भाऊ डगआऊटमध्ये होता. सोशल मीडियावर सुरू झालं, बसवायचा होता तर घेतला कशाला? आता धोनीअण्णा म्हणले, रुको जरा सबर करो. शेवटच्या आणि महत्वाच्या दोन मॅचेसमध्ये रॉबिनभाऊ खेळले आणि चमकले. आपला कॅप्टन आणि टीम आपल्या पाठीशी आहे हा विश्वास प्लेअर्सला ताकद देतो आणि कपाटात ट्रॉफ्या आणि मेडलं येतात.

आमचा नेता लई पॉवरफुल

धोनीची बॅट काय आता आधीसारखी घुमत नाय. पण डोकं? अहं, नाद नाहीच! समोरच्या टीममधला प्लेअर काय विचार करतो, त्याच्या दोन पावलं पुढचा विचार हे साहेब करून बसलेले असतात. कुठल्या पिचवर कोणता प्लेअर चालणार, कुणाला आणलं की विकेटी पडणार याचं करेक्ट नियोजन करण्यात धोनी वस्ताद आहे. टीम अडचणीत सापडलीच, तर हा बाकी कुणी भारी खेळायची वाट बघत बसत नाही, डायरेक्ट खेळून मोकळा होता. बॅट चालत नसली, तरी समोरची टीम काय निवांत होऊ शकत नाही. कारण माही मार रहा है म्हणलं की विषय खोल होत असतोय.

तर असा सगळा विषय आहे. सीएसके एकट्या धोनीमुळं नाय तर टीम एफर्ट्समुळं जिंकत्या. धोनी त्यांचं प्रेरणास्थान आहे आणि आधारस्तंभही. त्याच्या अंडर प्रत्येकजण चांगलं खेळतो आणि सीएसकेचे हात ट्रॉफीपर्यंत पोहोचतात.

बाकी टीम्सच्या फॅन्सनी पण लय मनाला लावून घेऊ नका. खेळ म्हणल्यावर हार-जीत व्हायचीच. निवांत लोडाला टेकून बसा आणि आनंद लूटा, उगा भांडणं, ट्रोलिंग करू नका. सगळीच पोरं आपली आहेत आणि सगळ्या टीमाही.

आणि शेवटी सगळ्यात जास्त काय ओरडण्यात मजा येत्या…

             इंडिया… इंडिया…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.