फक्त एक सुटलेला कॅच नाही, तर ही आहेत भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाची कारणं…

हार कर जितने वालो को बाजीगर कहते है, तुम्हारी जिद से ज्यादा चर्चे हमारे हार के है. हे सगळं स्टेटसला टाकायला बरं वाटत असलं, तरी भारत मॅच हरला की प्रचंड दुःख होतं. एशिया कपच्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमनं पाकिस्तानविरुद्ध खतरनाक कामगिरी केली होती, नंतर हॉंगकॉंगलाही हरवलं.

पंड्या, कोहली, भुवी यांचा फॉर्म बघून सुपर फोरच्या मॅचमध्येही भारत पाकिस्तानचा पेपर किरकोळीत सोडवणार असं वाटत होतं, मॅच पार शेवटच्या 2 बॉलपर्यंत गेली पण यावेळी सेलिब्रेट पकिस्तानच्या चाहत्यांनी केलं.

एवढी तगडी टीम, फॉर्ममधले प्लेयर्स असूनही आपण मॅच कुठं हरलो, भारताचं नेमकं गंडलं कुठं ?

भारतानं दिलेलं १८२ रन्सचं आव्हान पाकिस्ताननं ५ विकेट्स आणि एक बॉल बाकी ठेऊन पार केलं. भारताचा विषय गंडायला सुरुवात झाली ती टॉसपासून. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर चेस करणाऱ्या टीमला कायम फायदा होतो. कारण ग्राउंडवर दव असतं, पिच स्लो होतं, त्यामुळं टॉस जिंकून पाकिस्ताननं बॉलिंग घेतली आणि पहिली लढाई जिंकली. 

टॉसचा निर्णय हातात नव्हता त्यामुळे ती कमी भरून काढण्याची जबाबदारी भारताच्या ओपनर्सची होती. केएल राहुल आणि रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल चर्चा सुरु होत्याच. या दोघांनी भारताला चांगला स्टार्ट मिळवून दिला. 

गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या बदलत्या बॅटिंग अप्रोचबद्दल सारखं बोललं जातं. त्याच अप्रोचला साजेशी सुरुवात या जोडीनं केली होती, स्कोअरबोर्ड पळत होता. मात्र या दोघांच्या एकाच ओव्हरच्या अंतरात गेलेल्या विकेट्सनंतर भारत बॅकफूटवर गेला.

सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंतनं याच ऍप्रोचमध्ये खेळायला सुरुवात केली होती. त्यांनी रिस्क घेऊन एक आशा तर दाखवली होती, पण दोघांनाही अपयशच आलं. साहजिकच चांगल्या ओपनिंगनंतर मिडल ऑर्डरमधले दोन महत्त्वाचे बॅट्समन भारताला किरकोळीत गमवावे लागले. मात्र त्याहीपेक्षा मोठा धक्का होता हार्दिक पंड्याचा. एका बाजूनं विकेट्स जात असताना हार्दिक ३०-३५ रन्सचा बोनस देईल असं वाटत होतं, मात्र तो शून्यावर गेला.

आता विषय राहिला कोहलीचा.

रविवारच्या मॅचनंतर दोन मतप्रवाह आहेत, पहिला म्हणजे कोहली पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये आलाय आणि दुसरा म्हणजे कोहली खूप स्लो खेळला. ४४ बॉलमध्ये ६० रन्स, ४ फोर आणि १ सिक्स असा कोहलीचा स्कोअर. बघायला गेलं तर कोहलीनं आपल्या इनिंगची सुरुवात हाणामारी करुन केली होती. त्याची बॅट मस्त बोलत होती, इन्टेन्ट आणि कॉन्फिडन्सही दिसून येत होता. मात्र दुसऱ्या बाजूला जशा विकेट्स जायला लागल्या, तसा कोहली स्लो झाला.

मोठे शॉट्स खेळण्यात रिस्क होती, जी त्यानं घ्यायला हवी होती पण दुसरा एन्ड सांभाळायला हुड्डा सोडला तर कुणीच बॅट्समन उरला नव्हता. त्यामुळं कोहलीच्या इनिंगमध्ये फक्त ४ बाउंड्री आणि १ सिक्स आला याचा फटका कुठंतरी बसलाच, त्यात हॅरिस रॉफनं कोहलीला शेवटच्या ओव्हरला पहिले तिन्ही बॉल डॉट टाकले.

त्याजागी थोडे रन्स आले असते, तरी मॅचचा रिझल्ट बदललेला दिसला असता.

या सगळ्यात पाकिस्तानच्या बॉलिंगचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या बॉलिंग युनिटची मुख्य ताकद पेस बॉलिंगमध्ये आहे. हीच पेस बॉलिंग रविवारच्या मॅचमध्ये फेल गेली, मात्र हा बॅकलॉग स्पिनर्सनं भरुन काढला.

पाकिस्ताननं या मॅचमध्येही पाचच बॉलर्स खेळवले. मात्र मोहम्मद नवाझ आणि शादाब खाननं जवळपास ७ च्या इकॉनॉमीनं बॉलिंग केली. पाकिस्तानच्या स्पिनर्सनं कोहलीलाही मोठे शॉट्स खेळायची संधी दिली नाही, हे विशेष. मिडल ओव्हर्समध्ये स्पिनर्स आणि डेथ ओव्हर्समध्ये नसीम आणि हॅरिस रौफनं केलेल्या शिस्तशीर बॉलिंगमुळं भारताची गाडी १८१ रन्सवर अडकली आणि भारताला २०-२१ रन्स कमी पडले.

दीपक हुड्डानं प्रयत्न तर केले, दिनेश कार्तिकच्या जागी त्याला टीममध्ये यायचं असेल, तर हे १४ बॉल १६ रन्स नक्कीच पुरेसे नाहीत.

पाकिस्तानच्या इनिंगबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्याच बॉलला फॉर मारत रिझवाननं मोमेंटम आपल्याकडे झुकवला होता. कॅप्टन रोहित शर्मानं पॉवरप्लेमध्येच स्पिनर आणला, बिष्णोईनं बाबर आझमची विकेट काढत यशही मिळवलं.

पाकिस्तानसाठी गेमचेन्जर ठरली ती, रिझवान आणि मोहम्मद नवाझची पार्टनरशिप.

रिझवान आपला फॉर्म कायम ठेऊन खेळला, पण मोहम्मद नवाझ हे भारतासाठी सरप्राईज पॅकेज ठरलं. नवाझला ४ नंबरला पाठवण्यात रिस्क होती, त्याची विकेट गेली असती तरी पाकिस्तानला गम नव्हता. मात्र त्यानं हाणामारी करत २५-३० रन्स करणं त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. नवाझनं हा विश्वास पूर्णपणे सार्थ ठरवला आणि २० बॉलमध्ये ४२ रन्स मारले.

रिझवानच्या ७१ रन्सपेक्षा नवाझचे ४२ रन्स हा पाकिस्तानसाठी टर्निंग पॉईंट ठरला. 

नवाझ आणि रिझवान आऊट झाल्यावरही भारताकडे मॅच काढायचा चान्स होता. पण भारतानं ३ मोठ्या चुका केल्या. १८ व्या ओव्हरला रवी बिष्णोईनं फक्त ८ रन्स दिले, पण अर्शदीप सिंगनं असिफ अलीचा सोपा कॅच सोडला आणि पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलण्याचा सोपा चान्स गेला. शेवटच्या २ ओव्हर्समध्येही पाकिस्तानला २६ रन्स मारायचे होते, पण भरवशाच्या भुवनेश्वर कुमारला १९ व्या ओव्हरमध्ये १९ रन्स पडले. मोमेंटम पूर्णपणे पाकिस्तानकडे शिफ्ट झाला.

तिसरी आणि महत्त्वाची चूक ठरली, ओव्हर रेट. 

भारतानं ठरलेल्या वेळेत ओव्हर्स पूर्ण केल्या नाहीत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ३० यार्ड्सच्या बाहेर एक फिल्डर कमी लावता आला. अर्शदीपनं कॅच सुटल्यानंतरचं प्रेशर झुगारत चांगली बॉलिंग केली होती, मात्र इफ्तिकार अहमदनं मॅच खेचून आणलीच. इफ्तिकारनं विनिंग रन्स काढल्या तो बॉल लॉन्ग ऑनला गेला, जर तिथंच फिल्डर लावता आला असता, तर कदाचित रिझल्ट वेगळा लागला असता.

थोडक्यात काय तर ओपनर्सला चांगल्या सुरुवातीचं मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतर करण्यात आलेलं अपयश, कोहलीची स्लो झालेली इनिंग, तोंडावर पडलेली मिडल ऑर्डर, अर्शदीपकडून सुटलेला कॅच, हार्दिकला पाचवा बॉलर म्हणून वापरण्याचा फसलेला प्लॅन, भुवनेश्वरची महागडी ओव्हर आणि स्लो ओव्हर रेट या सगळ्या गोष्टींचा फटका भारताला बसला.

क्रिकेटमध्ये जरतरला महत्त्व नसतं, त्यामुळं पुढच्या दोन मॅचेसमध्ये भारताला सगळी कसूर भरुन काढावी लागणार आहे. या रविवारचा दिवस पाकिस्तानचा होता, पण फायनल अजून बाकी आहे… त्यामुळं हरलो असलो तरी, बॉईज प्लेड वेल एवढं नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.