बंडखोर आमदारांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ ; ही आहेत ५ कारणं

बंडखोरील जळवपास एक आठवडा होत आलाय. या अचानक झालेल्या बंडाने सुरूवातीला गोंधळून गेलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी, आता मात्र सावध पवित्र घेतलेला दिसतोय. तिकडे भाजप कडून देखील सत्तास्थापनेसाठी कुठल्याच हालचाली दिसत नाहीयेत.

महाविकास आघाडीतले घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी सुद्धा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खंबीर पाठिंबा दिलाय. स्वत: शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सोबत असल्याची ग्वाही दिलेली पाहायला मिळतंय.

अशा परिस्थितीत बंड केलेले आमदार सध्या सगळ्या बाजूने कोंडीत सापडलेले दिसतायेत. जसा जसा एक-एक  दिवस पुढे जातोय, तशी या आमदारांमध्ये अस्वस्थता वाढत चाललीये. हे आमदार कशाप्रकारे कोंडीत सापडत चाललेत याचा आढावा घेऊयात. 

१) विधानसभा उपाध्यक्षांमार्फत बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी होत असलेले कायदेशीर प्रयत्न:

“मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा अद्याप दिलेला नसल्याने, विधिमंडळातील सर्व सूत्रे अजूनही आमच्याचकडे आहेत”. असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय. त्यांच्या या दाव्याला बंडखोर आमदारांचा आक्षेप आहे, आणि तो दावा संख्याबळाच्या आधारे खोडून काढण्याचा प्रयत्न ते करतायेत.

मुख्यमंत्र्यांनी बंडात सामील असलेल्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठीचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष असलेले परंतु आता सध्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिलेलं आहे.

महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्या कडून जोरदार प्रयत्न होताना दिसतायेत.

रविवारी सकाळी पवारांनी त्यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवास स्थानी तिन्ही पक्षातल्या नेत्यांची एक बैठक घेतली. बैठकीत शरद पवार यांनी १६ बंडखोरांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर चर्चा केली असून कायदेशीररित्या लढू असं स्पष्ट केल्याचं सांगण्यात येतंय.

ही अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असं जरी शिंदे गटाकडून बोललं जात असलं, तरीही महाविकास आघाडीकडून नरहरी झिरवाळ यांच्याकरवी ही प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. कुठल्याही क्षणी हा निर्णय होऊ शकतो आणि आमदारांवर कारवाई होऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

असं झालं तर शिंदेगटाकडचा आमदारांचा आकडा झटक्यात खाली येऊ शकतो आणि त्यांनी ज्या संख्याबळाच्या आधारावर बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय ते संख्याबळच धोक्यात येऊ शकतं, साहजिकच ते अडचणीत येऊ शकतात.

२) शिवसैनिकांकडून बंडखोरांविरुद्ध रस्त्यावर उतरून होत असलेला निषेध आणि तोडफोड :

शिंदे गटात सहभागी होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड केलेल्या आमदारांच्या विरोधात आता महाराष्ट्रातल्या बहुतांश भागातून शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागलेत.

शिंदे गटात सामील झालेले भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातल्या ‘भैरवनाथ शुगर्स’ या कार्यालया मध्ये शिरून शिवसैनिकांनी तोडफोड केलीये. सावंत यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत ही तोडफोड करण्यात आलीये. 

“या गद्दारांचं करायचं काय.. खाली डोकं वर पाय..”अशा घोषणा देत एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचं पुण्यातलं कार्यालय शिवसैनिकांमार्फत शनिवारी फोडण्यात आलं. बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांच्या औरंगाबादमधल्या गारखेडा इथल्या कार्यालयाबाहेरच्या पोस्टरवर शिवसैनिकांनी काळं फासलंय.

पनवेलमध्ये एकनाथ शिंदे, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, भारत गोगावले या आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आलेत. शिवसेनेच्या नाशिक मध्यवर्ती कार्यालयाच्या बोर्डावरच्या सुहास कांदे आणि दादा भुसे यांच्या नावाला शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी काळं फासलंय.

या आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात शिवसैनिक रस्त्यावर उतरून आपला राग व्यक्त करतायेत. त्यामुळे बंडखोर आमदारांची कोंडी आणखीन वाढत चाललीये. 

३) भाजप कडून सत्ता स्थापनेसाठी पुढाकार न घेतला जाणं  :

आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर जी पहिली अट ठेवली ती अशी होती की, महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडावं आणि भाजप सोबत युती करावी. यातून बंडखोर आमदारांची भाजप सोबत जाण्याची प्रबळ इच्छा आहे असं दिसून येतं.

त्यातच शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक, आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव,  अशा आमदारांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मागे सध्या ईडीची कारवाई लागलेली दिसतीये, सरनाईक यांनी याधीही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जाण्यासाठी विनंती केली होती.

असं असताना भाजपने सध्या फक्त ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतलेली दिसतिये. या आमदारांसोबत त्यांनी अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकृत बोलणी केलेली नाहीये किंवा कसलाही पाठिंबा जाहीर केलेला नाहीये. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रक काढून, भाजपचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलय.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट केलं होतं त्यात ते म्हणतात ..

भाजप ने बंडखोर आमदारांसमोर ‘भाजप पक्ष प्रवेशाची’ अट ठेवलेली दिसतीये.

पण खरंच असं असेल तर, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कमजोर ठरवून शिवसेना पक्ष ताब्यात घेण्याचा शिंदेंचा विचार आहे असं बोललं जातंय. त्यामुळे जाहीरपणे भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्याने त्यांचा बंड करण्याचा उद्धेश सफल होणार नाही आणि शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल. हा निर्णय सुद्धा त्यांच्या अडचणीत वाढ करणाराच आहे. त्यामुळे ह्या बाजुने देखील त्यांची कोंडी होणार हे स्पष्ट दिसतय.

४) उद्धव ठाकरेंकडून बिनशर्त वाटाघाटी करण्यास नकार :

बंडाच्या सुरूवातीला उद्धव ठाकरे यांनी घेतलेली मवाळ भूमिका आणि २४ तासात आमदारांना माघारी येऊन चर्चा करण्याच्या प्रस्तावाला आता ६ दिवस उलटून गेले आहेत. त्या प्रस्तावावर आमदारांकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे, उद्धव ठाकरे यांनी आपली मवाळ भूमिका बदलली आहे आणि आता ते आक्रमक पवित्र्यात गेले आहेत.

त्यांनी बैठका घेऊन शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना साद घालून येणार्‍या प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी कठोरपणे उभं राहण्याचं आवाहन केलंय. 

त्यातूनच महाराष्ट्रभरातून शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पाठिंबा देताना दिसतायेत आणि ही सुद्धा एक मोठी डोकेदुखी शिंदे समर्थक आमदारांसमोर निर्माण झालीये, यातून सुद्धा त्यांची कोंडी वाढताना दिसतीये.

५) शिंदे यांच्या ‘शिवसेना’ पक्षावर दावा करण्यातल्या आणि नवीन पक्ष स्थापन करण्यातल्या अडचणी:

शिंदे गट आपल्याकडे असणार्‍या आमदारांच्या जोरावर ‘शिवसेना’ पक्षावरच दावा करायला सुरुवात केलीये.

पक्षाचे दोन तृतीयांश आमदार आपल्यासोबत आहेत. त्यामुळे आपल्या सोबत असलेला आमदारांचा गट, हाच शिवसेना पक्ष आहे असा दावा शिंदे समर्थक करतायेत. त्यासाठी ते विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवणार आहेत अशी चर्चाही होत आहे. 

फक्त आमदारांचं संख्याबळ असल्यामुळे संपूर्ण शिवसेना पक्षच जर शिंदेंना आपल्या ताब्यात घ्यायचा असेल, तर त्यांना शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार २५० सदस्यांना सोबत घेऊन, प्रतिनिधी सभेतून निवडून यावं लागेल. तरच त्यांना निवडणूक आयोग मान्यता देईल आणि मगच ते शिवसेनेवर दावा करू शकतील.  त्यातही शिवसेना पक्षप्रमुखांचा निर्णयच अंतिम असल्यामुळे इच्छा असूनही शिंदे शिवसेना पक्ष आपल्या ताब्यात घेऊ शकणार नाहीत.

त्यामुळे आता जसेजसे दिवस वाढत जातील तसतशी या आमदारांची कोंडी आणखी वाढत जाणार आहे त्यामुळे सध्यातरी या आमदारांची अवस्था ‘ना घर के, ना घाट के’ अशीच झालेली दिसतीये.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.