रिसेप्शनिस्ट म्हणून सुरवात करणारी इंद्रा पेप्सिको कंपनीच्या सीइओपर्यंत पोहचली
एकविसावं शतक हे भारतासाठी कॉर्पोरेट क्रांतीची पहाट घेऊन आलं असं म्हणायला हरकत नाही.
या देशात काही हजारात पगार असणे नशीब मानलं जायचं तिथे लाखांमध्ये असणारी पॅकेजेस मिळायला लागली. अगदी परवापर्यंत ज्यांनी आपला पासपोर्ट असावा असा विचारही मनात आणला नव्हता ते आता महिन्याला चार-चार परदेश वाऱ्या करायला लागले.
या कॉर्पोरेट क्षेत्रात कित्येक कंपन्या आल्या आणि गेल्या , कित्येक बॉस आले गेले, पण त्यातली काही नावं अजूनही स्वतःचे वजन कायम राखून आहेत त्यापैकी एक म्हणजे इंद्रा नूयी !
पेप्सिको कंपनीच्या यशामागच्या खऱ्या किंगमेकर !
ज्यांनी सलग १२ वर्षे पेप्सिको कंपनीची सीईओ म्हणून धुरा सांभाळली, इतकेच त्यांची खासियत नाही तर फोर्ब्स मासिकाच्या जगातील १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नूयी यांनी आपले नाव कायम ठेवले हि फार मोठी गोष्ट होती तसेच २००८ साली तेराव्या क्रमांकावर स्थान मिळवले होते.
तर फॉर्चून मॅगझीनने त्यांना २००६ सालच्या सर्वात शक्तिशाली महिला व्यावसायिक म्हणून जाहीर केले होते.
त्या मुळच्या चेन्नई येथील एका पारंपरिक कुटुंबातल्या. घरात संगीताची विशेष आवड असल्यामुळे इंद्रा यांनाही ही संगीताची ओढ लागली. मद्रास ख्रिश्चन कॉलेज बी.एस्सी पूर्ण केले, कॉलेजमध्ये असतांना त्यांना गिटार चांगली वाजवता यायची त्यामुळे त्या रॉक म्यूजिक बँडमध्ये असायच्या. शिवाय स्पोर्ट्स मध्येही ऍक्टिव्ह असायच्या.
तल्लख बुद्धीच्या इंद्रा यांनी आयआयएम कलकत्ता येथून एमबीए पूर्ण केले आणि टूटल टेक्सटाइल या कंपनीत पहिल्यांदा नोकरीला लागल्या. त्यानंतर जाॅन्सन ॲन्ड जाॅन्सन या कंपनीत स्टेफ्रीच्या डिपार्टमेंटमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून रुजू झाल्या. थोडक्यात त्यांच्यावर सेनेटरी नैपकिन हि देशभरात पोहचवण्याची जबाबदारी होती.
परंतु हि जबाबदारी तितकी सोपीही नव्हती कारण, त्या दरम्यान भारतात महिलांच्या संबंधातील स्वच्छतेच्या बाबतीतील जाहिराती करायला परवानगी नव्हती अशा परीस्थितीत वेगवेगळे उपक्रम करून त्यांनी सॅनिटरी पॅड कॉलेजवयीन मुली आणि महिलांपर्यंत पोहचवण्यात त्या यशस्वी झाल्या.
याच दरम्यान त्यांना १९७८मध्ये येल स्कूल ऑफ़ मैनेजमेंट मध्ये पब्लिक मॅनेजमेंट ॲन्ड प्रायव्हेट मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. येथे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इंदिरा विविध गोष्टी शिकल्या. त्यातून व्यवसायात लागणारी इच्छाशक्ती, कार्यक्षमता, निर्णयक्षमता हे गुण त्यांनी तिथे जाऊन आत्मसात केल्या,
हे करतांना आणखी एका गोष्टीमुळे त्या तावून सुलाखून निघाल्या, ती म्हणजे शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे त्यांनी रिसेप्शनिस्ट म्हणून पार्ट टाइम जॉब चालू केला. रात्रभर जॉब करून त्या सकाळी कॉलेजसाठी रेडी राहायच्या. असं करत करत १९८० मध्ये त्यांनी तेथील शिक्षण पूर्ण केले.
तेथील डिग्री पूर्ण झाली आणि त्यांनी बोस्टन कंसल्टिंग ग्रुप मध्ये जॉईन झाल्या, इंटरनेशनल कॉर्पोरेट स्ट्रेटेजी डायरेक्टर या पदावर त्यांनी सलग सहा वर्ष काम पाहिलं आणि या नोकरीमुळे त्यांची ओळखच बदलली, त्या एक बुद्धिमान व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
त्या दरम्यान म्हणजेच १९८३ मध्ये त्यांचा राजकिशन नूयी यांच्याशी विवाह झाला, त्यांचे पती व्यवसायाने इंजिनीअर आहेत. त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर इंद्रा यांनी १९८६मध्ये मोटोरोला कंपनीत काॅर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग या डिपार्टमेंटच्या प्रेसिडेंट होत्या.
आणि त्यांच्या २ वर्षाच्या कारकिर्दीत कंपनीमुळे मोबाईल क्षेत्रात क्रांती झाली आणि कंपनी यशाच्या शिखरावर जाऊन बसली तेही इंद्रा यांच्या दमदार कामिगिरीमुळे, त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना कंपनीने डायरेक्टरपदी बसवण्याचा मान दिला.
यानंतरही इंद्रा थांबल्या नाहीत.. त्यांच्या करिअरचा आलेख वाढतच होता….
१९९० मध्ये त्यांनी मोटोरोला सोडलं आणि नवीन नोकरी घेतली,यादरम्यान त्यांनी बऱ्याच नोकऱ्या घेतल्या सोडल्या. ABB कंपनीत वाईस प्रेसिडेंट म्हणूनही काम केलं, तसेच त्यांनी एएसए ब्राऊन या स्विस स्वीडिश कंपनीतही काम केलं. येथील इंद्रा यांचे काम पाहून अनेक जण प्रभावित झाले.
त्यांना अनेक कंपन्याकडून ऑफर्स येत होत्या. तेंव्हा त्यांना जनरल इलेट्रिक या कंपनीची सीईओ पदासाठी ऑफर आली, तसेच पेप्सिको कंपनीने देखील त्यांना सीईओ पदासाठीचा प्रस्ताव सादर केला. तेंव्हा इंद्रा मात्र पेप्सिको या शीतपेयांच्या कंपनीला नाही म्हणू शकल्या अन्ही आणि प्रस्ताव स्वीकारला.
इंद्रा यांनी वयाच्या ४४ व्या वर्षी सुरुवातीला त्या पेप्सिकोमध्ये वाईस प्रेसिडेंट म्हणून रुजू झाल्या त्यांचा विभाग काॅर्पोरेट स्ट्रॅटेजी ॲन्ड डेव्हलपमेंट हा होता.
त्यादरम्यान कंपनीचा रेस्टाॅरंट व्यवसाय चांगला चालता-चालता अचानकच ढासळू लागला
आणि म्हणून या सर्व विभागाची पुनर्रचना करण्याची गरज आहे असं इंद्रा याचं म्हणणं होतं, आणि त्यांनी याची जबाबदारीही घेतली. पेप्सिकोच्या पूर्ण कार्यप्रणालीचा अभ्यास केला व तर्कशुद्ध निर्णय घ्यायचे ठरवले.
आणि त्यांनी धडाधड निर्णय घ्यायला आणि बदल करायला सुरुवात केली
१९९७ च्या पेप्सिकोच्या फास्ट फूड चेन यंत्रणेतील बदल केला, १९९८ च्या ट्राॅपिकाना कंपनीची खरेदी , २००१ मधील क्वॅकर ओटची खरेदी हे त्यांचे काही निर्णय कंपनीसाठी महत्वाचे ठरले. त्यांच्या या जबाबदारीच्या भूमिकेमुळे त्यांना २००१ मध्ये त्यांना सीएफओ और बोर्ड ऑफ़ डायरेक्टर्स मध्ये समाविष्ठ केलं गेलं आणि २००६ मध्ये कंपनीच्या चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ ) म्हणून निवडण्यात आले.
इंद्रा नुई या जगातील व्यवसाय क्षेत्रातल्या निवडक व ताकदवान महिलांपैकी एक आहेत.
त्यांच्या दमदार कारकीर्दीमुळे त्यांना २००७ मध्ये भारताचा प्रतिष्ठित पद्म भूषण सम्मान हि दिला गेला होता. पेप्सिको कंपनीला जगात पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवणाऱ्या इंद्रा यांनी १२ वर्षे सीइओ पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडली आणि २०१८ मध्ये या पदाचा राजीनामा दिला.
इंद्रा या सध्या ऍमेझॉन कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्य आहेत. अमेरिकेच्या ख्यातनाम नॅशनल पोट्रेट गॅलरी’ मध्ये आता इंद्रा नुयी यांचेही फोटो लागणार आहेत, हि विशेष कौतुकाची बाब आहे.
भारतीय वंशाच्या इंद्रा नूयी अमेरिकेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दिग्गजांच्या पंगतीत जाऊन बसल्या आहेत.
इंद्रा नुयी यांनी परदेशी नागरिकत्व स्वीकारलं असलं तरीही त्यांच्या दैदिप्यमान यशाला भारत कधीच विसरणार नाही.
हे ही वाच भिडू.
- पेप्सी, कोका-कोला खरी टक्कर दिली ती अस्सल भारतीय ब्रँड गोल्ड स्पॉट ने
- चहा विकणाऱ्या माणसाला आयडिया सुचली आणि जगाला नादावणाऱ्या कॅडबरीचा जन्म झाला..
- पटणार नाय पण आजही भारतातनं सगळ्यात जास्त एक्स्पोर्ट होणारी बाईक बजाज बॉक्सर आहे