पंतप्रधानांच्या बड्डेवेळी रेकॉर्ड लसीकरण वाद: बिगर भाजप शासित राज्यांनी काय केलं ?
१७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस होता. त्यादिवशी या वाढदिवसाचे सेलिब्रेशन भव्य दिव्य करण्यासाठी भाजपकडून ‘सेवा आणि समर्पण अभियान’ सुरु करण्यात आले. यात लसीकरण मोहीम, रक्तदान शिबीर, गरीब वस्त्यांमध्ये जाऊन फळ आणि इतर अत्यावश्यक सामान पोहोचवणे अशा कार्यक्रमांचा समावेश होता.
याच अभियानाचा एक भाग म्हणून देशात १७ सप्टेंबरला लसीकरणाचे महाअभियान राबवण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे त्या एका दिवसात देशात तब्बल २ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. हा एक जागतिक रेकॉर्ड मानला जात आहेत. त्याबद्दल जागतिक पातळीवरून भारताचं बरंच कौतुक करण्यात आले.
मात्र अनेकांकडून या रेकॉर्डवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सोबत या रेकॉर्डसाठी भाजप शासित राज्यांनी १७ सप्टेंबरच्या आधी ७ दिवसांच्या कालावधीमध्ये लसीकरणाची गती कमी केली होती. त्यामुळे त्यादिवशी १७ तारखेला जास्त लसी उपलब्ध झाल्या आणि लसीकरणाचा आकडा वाढवण्यात आला, असा दावा केला जात आहे.
त्यामुळे या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे हे बघणे महत्वाचे ठरते. सोबतच सगळ्याच भाजपशासित राज्यांमध्ये लसीकरणाचा रेकॉर्ड झाला होता का? आणि ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नव्हते त्या राज्यांमध्ये काय परिस्थिती होती? बिगर भाजपच्या राज्यात देखील लसीकरणाचे रेकॉर्ड बनले का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर बघणं महत्वाचं आहे.
सगळ्या भाजपशासित राज्यांमध्ये हाच ट्रेंड होता का?
देशातील बहुतांश भाजपशासित राज्यांमध्ये इतर दिवसांपेक्षा १७ सप्टेंबरला मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले. पण काही भाजपशासित राज्य अशी देखील होती जिथं इतर दिवसांच्या तुलनेत १७ सप्टेंबरला कमी लसीकरण झाले. या राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय अशा राज्यांचा समावेश आहे.
ज्या भाजपशासित राज्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झाले तिथं १७ सप्टेंबरच्या आधीच्या काही दिवसांमध्ये कमी लसीकरण झाले होते का?
तर बिहार आणि कर्नाटकमध्ये १७ सप्टेंबर या एका दिवशी ३० लाखांपेक्षा जास्त लसीकरण झाले. त्याचवेळी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये २४ लाखांपासून २८ लाखांपर्यंत लोकांचे लसीकरण झाले. तर आसाममध्ये ७ लाखांपेक्षा जास्त जणांचे लसीकरण पूर्ण झाले. याच सहा भाजपशासित राज्यांमध्ये सर्वाधिक लसीकरण झाले होते.
यात जर आता आदल्यादिवशी म्हणजे १६ सप्टेंबर या दिवासासोबत तुलना करून बघायचं म्हंटले तर बिहारमध्ये १६ तारखेला १ लाख १ हजार जणांचे लसीकरण झाले होते. जे ३ सप्टेंबरनंतर सर्वात कमी होते. तर १० ते १६ सप्टेंबर या काळात प्रत्येक दिवसात सरासरी ४.६ लाख पेक्षा जास्त लसीकरण झाले होते. म्हणजेच १६ सप्टेंबरला सरासरीपेक्षा तब्बल ३.५ लाख कमी लसीकरण झाले होते.
कर्नाटकमध्ये देखील १७ सप्टेंबरला ३० लाखांपेक्षा जास्त लसीकरण झाले. तर याच्या एक दिवस आधी केवळ ८३ हजार जणांचे लसीकरण होऊ शकले होते. त्याआधी १३ सप्टेंबर रोजी ३ लाख ६८ हजार जणांचे लसीकरण झाले होते. त्यानंतर २ दिवसांमध्ये लसीकरणाचा आकडा खाली येताना दिसला. तर १७ सप्टेंबरला मात्र ३० लाख लसीकरणाचा आकडा पार केला होता.
उत्तरप्रदेश राज्यात देखील १६ सप्टेंबरला ४ लाख ४३ हजार जणांचे लसीकरण झाले होते. त्याच्या आधीच्या ६ दिवसांची सरासरी हि ८ लाख ४० हजार इतकी होती. मात्र १७ सप्टेंबर रोजी उत्तरप्रदेशने २८ लाख ७३ हजार जणांचे लसीकरण पूर्ण केले.
हि तीन राज्य सोडून बाकीच्या ३ राज्यांमध्ये १६ सप्टेंबरला सरासरी एवढेच लसीकरण झाले होते.
बिगर भाजपशासित राज्यात काय परिस्थिती होती?
बिगर भाजपशासित राज्यांमध्ये म्हणजे पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, तमिळनाडू, दिल्ली या राज्यांमध्ये १७ सप्टेंबर आणि १६ सप्टेंबर या दोन्ही दिवशी अगदी नगण्य फरकाने एकसारखेच लसीकरण झालं होते. तर पंजाब, छत्तीसगड, केरळ अशा राज्यांमध्ये १६ सप्टेंबरच्या तुलनेत १७ सप्टेंबरला कमी लसीकरण झाले.
तर राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना आणि मध्ये १६ सप्टेंबरच्या तुलनेत जास्त लसीकरण झाले. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर १६ सप्टेंबरला राज्यात ६ लाख ७३ हजार जणांचे लसीकरण झाले होते. तर १७ सप्टेंबर या दिवशी दुप्पट म्हणजे १२ लाख ८४ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले होते.
एकूणच काय तर बिहार, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा १६ सप्टेंबरला कमी लसीकरण झाले होते. मात्र १७ सप्टेंबरला या राज्यांमध्ये वाढलेले लसीकरण हे त्या आकड्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. सोबतच बिगर भाजप महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा राज्यांनी देखील १७ सप्टेंबरला लसीकरणात आघाडी घेतली होती.
हे हि वाच भिडू
- म्हणून मेळघाटच्या ४ गावांमध्ये लसीकरण पूर्ण झालं तरी त्याचं देश पातळीवर कौतुक करावं लागतं
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशाला आज कामाच्या ५ गोष्टी मिळाल्या आहेत
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्यामागे लसीचं पण राजकारण दडलं आहे