जुना टीव्ही, लाल पारा, एक कोटी आणि आपली येडी जनता..

“तुमच्या जुन्या टिव्हीत एक चीप आहे, या चीपची किंमत कोटीत आहे. तुमच्या घरात जुना टिव्ही आहे का?”

मराठवाड्यातल्या काही भागात ही अफवा पसरली. लगेच लोकांनी जूने टिव्ही संच बाहेर काढायला सुरवात केली. आपण आत्ता श्रीमंत होणार याची स्वप्न पडायला लागली. ज्यांनी टिव्ही भंगारात दिले ते धाय मोकलून रडाय लागले.

हातचे कोटभर रुपये गेल्यावर कोणाची पण फाटणारच की ओ… 

पण थांबा, कोणी तुमचा जुना टीव्ही मागत असेल तर अजिबात देऊ नका. त्याच्यात कसलाच पार्ट शोधू नका. उलट टिव्ही समजून घ्या. ती लाल रंगाची चीप काय असते त्यांची माहिती करुन घ्या. 

तर ब्लॅक अँड व्हाइट टिव्हीत काय असतं?

ज्या टीव्ही/मॉनिटरची स्क्रीन मोनोक्रोम सीआरटी असते. CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब. ह्याला कॅथोड म्हणायचं कारण की त्यात ऋण प्रभार असणारी रे (इलेक्टरोन्सची शलाका) एका ट्युबमधून पुढच्या पडद्यावर पाठवली जाते. हा पडदा फॉस्फरसच्या लेपाने भरलेला असतो, ज्याला फॉस्फरसन्स म्हणतात. 

ज्या भागावर इलेक्ट्रॉन पडतात तो भाग ऋण आणि धन प्रभाराने सोबत उद्दीपित होतो. त्यामुळे आपल्याला स्क्रीनवर चित्रे दिसतात. जुन्या काळातील मॉनिटर, स्क्रीन्स, टीव्ही ह्यात हेच तंत्रज्ञान वापरले जाते. 

उद्दीपित होणाऱ्या जागी आपल्याला पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या मिश्रणात चित्रे दिसतात. हे उद्दीपण टीव्ही बंद केल्यानंतरही काही सेकंद सुरू राहते, म्हणून लाईट गेली तरीही स्क्रीनवर चित्रांच्या सावल्या दिसतात हे B&W टीव्ही पाहणाऱ्यांना आठवत असेल. टिव्हीत भुते असल्याची अफवा ह्यातूनच पसरायची.

आता ह्या CRT मध्ये मागे कॅथोड असणारी ट्यूब, त्याचा हिटर आणि त्याचे नियंत्रक कोणत्याही रंगाचे असू शकतात. लक्षात घ्या कोणत्याही रंगाचे असू शकतात. शिवाय इलेक्ट्रॉनची शलाका वळवण्यासाठी तिने तितके अंतर पार करणे व मध्ये नियंत्रक लावणे ह्यासाठी हे टीव्ही आकाराने लांब असत, म्हणजे त्यांची जाडी जास्त असायची. 

ह्यात एक व्हिडिओ कॅमेरा ट्यूब बसवली जात असे. आत्ता तुम्ही हा मजकूर जसा डावीकडून वाचत वाचत उजवीकडे जात आहात त्याच प्रकारे इलेक्ट्रॉनचा प्रवाह स्क्रीनवर डावीकडून उजवीकडे वळवला जातो. 

कित्येक कंपन्या ही ट्यूब बनवत मात्र जेव्हा व्हिडिओकॉन कंपनीने आपली ट्यूब बनवली तेव्हा बाकी सगळ्या ट्युबचा सुपडा साफ झाला, इतकंच काय ही ट्युबच व्हिडीओकॉन ट्यूब म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यापूर्वीच्या ट्यूब फक्त मोठमोठ्या कंपन्या आणि उद्योगपती लोकांनाच परवडत असत. त्यानंतर मात्र किंमती कमी होऊन टीव्ही सर्वांच्याच आवाक्यात आला. 

१९३० पासून १९९० पर्यंत ह्या ट्यूब टीव्हीचा प्राण होता. ह्या ट्युब्स कित्येक कंपन्या कित्येक आकारात आणि रंगात बनवत. 

आता जर कुणी हे लाल रंगात बनवत असेल तर त्याचा दोष काय?

दोष मुळात लाल रंग असण्यात आहे. गुरुजींनी गणेश गायतोंडेला दिलेली गोची असो की शिंगणापूर शनीच्या मूर्तीतून अमावस्या पौर्णिमेला येणारं रक्त असो किंवा बोल भिडूवर आपण शोधलेली कुत्र्यांना पळवण्यासाठी लावलेली बाटली असो, माणसाला लाल रंगाविषयी फालतू आकर्षण आहे. टिंगल नाही, भौतिकशास्त्र आणि त्यामुळं मानसशास्त्राचा भागय- विचार केलाय का, चायनीजच्या गाड्या, कुरकुरे, चिप्स, सॉस हे खायचं लाल पॅकिंगमध्ये का करतात?

लाल रंग सर्वात दूरवरून दिसू शकतो कारण त्याची वेव्हलेंथ सर्वात जास्त असते. त्यामुळे मानवी मेंदू लगेच सचेत होतो. म्हणून धोकादायक ठिकाणी, सिग्नलला आणि लग्नात लक्ष वेधून घ्यायला लाल रंग वापरला जातो.

ह्या लाल रंगामुळे जगात नाय त्या अफवा पसारल्याची उदाहरणे आहेत त्यातलं टॉप म्हणजे हा लाल पारा. 

मुळात पारा हा धातू असून द्रव म्हणून कुतूहल जास्त, त्यात तो हाती येत नाही म्हणून अजून कंड, त्यात जर का लाल असला तर? मुळात मर्क्युरी (Hg) हे मूलद्रव्य लाल असू शकत नाही. पण अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या काळात जे लाल ते सगळं कम्युनिस्ट रशियाचे आणि म्हणून धोकादायक अश्या फोक्या युरोप आणि अमेरिकेत पसरवल्या गेल्या. 

म्हणूनच आपल्या न्यूक्लियर प्रोग्रॅम आणि अणुबॉम्ब साठी रशिया एक गूढ लाल पदार्थ वापरत असल्याची पुडी कुणीतरी सोडून दिली. हा लाल पदार्थ म्हणजे लाल पारा असल्याची आवई उठवण्यात आली आणि सगळी येडी जनता त्याच्याच शोधत रमली. हे वेड जगभरात पोचायला वेळ लागला नाही आणि हे नवं कोडं तयार झालं. 

पार सौदीच्या शेखपर्यंत सगळ्या पब्लिकचा विश्वास बसून हा पारा जग नष्ट करू शकतो ते कुठलाही रोग बरा करू शकतो इथपर्यंत अफवा पसरल्या. जगात अस्तित्वात नसलेल्या पदार्थाची किंमत वाढत गेली. 

लोकांनी वाळलेल्या सॉसचे किंवा रक्ताचे फोटू सोडून अजून आगडोंब उठवला. धार्मिक लोकांनीही ह्यात हात धुवून घेतले आणि लाल पारा म्हणजे येशू ख्रिस्त याचे रक्त असल्यापासून तर मध्ययुगात क्रुसेड्ससाठी (मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांत लढली गेलेली धर्मयुद्ध) लढलेला रोमेनियाचा सरदार व्लाड द्राकुल दुसरा, म्हणजेच हॉलिवूड पिच्चरमध्ये फेमस झालेला रक्तपिशाच वॅमपायर ड्रॅकुला ह्याचं रक्त असल्याच्या बोंबा पसरल्या. 

रेड मर्क्युरित माणसाचे प्रतिबिंब दिसत नाही ते ह्याने एड्स/म्हातारपण/कोरोना बरा होतो इथपर्यंत लोकांनी पुड्या सोडल्या. आता मुळात जे अस्तित्वातच नाय त्याच्यावर काय संशोधन करून सत्य समोर आणणार. 

तरी लोकांचा गाढवपणा बघून कित्येक संशोधकांनी ह्यावर प्रबंध लिहिले. 

नमुना म्हणून Nuclear forensics in law enforcement applications हा १९९८ सालचा दीर्घ प्रबंध पाहू. युरोप अमेरिकेत लाल पारा म्हणून स्मगलिंग होत असलेल्या व टोळ्यांकडून हस्तगत केलेल्या आण्विक पदार्थावर लिव्हमोरच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनावर आधारित हा प्रबंध लाल पारा म्हणजे नक्की काय ह्यावर प्रकाश टाकतो. 

फक्त पारा आणि त्यात वितळलेल्या ऍल्युमिनियमचे सॅम्पल्स सोडून त्यांना ह्यात काहीही सापडलं नाही. पण ह्या पुड्याची किंमत तेव्हा पाच लाख डॉलर्स प्रतिकिलो होती. पाच लाख डॉलर्स कितीही जास्त असले तरी जवळकर साहेबांच्या समोर वाख्या विख्यी वेख्येच म्हणायचे, पण ते जाऊद्या ! 

ह्या पदार्थाला संशोधकांनी दस्तुरखुद्द प्रबंधात hoax म्हणजे आवई, खोटी बोंब म्हणून संबोधले आहे. 

दहावीत आवर्त सारणी म्हणजे पेरिओडिक टेबल ध्यान देऊन शिकणाऱ्या लोकांना माहीत असेल की त्यात नशिबी काही मूलद्रव्ये आहेत ज्यांचा शोध अजून लागला नाही किंवा ज्यावर अद्याप संशोधन चालू आहे. अशाच एका किरणोत्सर्गी मूलद्रव्याला संशोधक टिंगलीत अन-ऑफिशियली लाल पारा म्हणायचे. ते पिल्लू एवढं मोठं होईल हे त्यांनाही वाटलं नसावं. 

शेवटी एक किस्सा सांगून निकाल लावू भिडू,

झाही हव्वास म्हणून फेमस पुरातत्त्वशास्त्रज्ञ आहेत इजिप्तचे. तिकडचा रियल लाईफ खंडेराव म्हणा. जगभरातल्या उत्खननात ते मदत करत असतात. काही काळ इजिप्तचे सांस्कृतिक मंत्री सुद्धा होते. जगातील 100 सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचं नाव घेतलंय टाईम मॅगझीनने असा माणूस.

ते एकदा इजिप्तमध्ये असतात एक माणूस त्यांच्याकडे आला. तो म्हणाला,

‘मला दुबईच्या राजघराण्यातील लोकांसाठी महत्वाची मदत पाहिजेय. मी सौदीचा राजपुत्र आहे, माझी आई आजारी आहे. हकिमांनी सांगितलंय तिला फक्त लाल पारा वाचवू शकतो. तुम्ही एवढे तज्ञ आहात, माझ्या आईला वाचवा. मी जग पालथं घातलंय, माझा पैसा-ऊर्जा घातली पण अपयश आलं.”

ह्यावर हव्वास थबकले. थोड्या वेळ थांबले आणि म्हणाले,

“राजे, तुमच्या आईविषयी मला फार सहानुभूती आहे. पण मला माफ करा, लाल पारा नावाचं जगात काहीच अस्तित्वात नाही.”

त्याच्या हाताखाली संशोधन करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मानववंशशास्त्र संशोधक लिसा विन ह्यांनी हा किस्सा लिहिला आहे. आणि जुन्या आठवणींना जपलंच पाहिजे. इंग्लंडमध्ये अजून 7,000 लोक पांढरा टीव्हीच बघतात. त्यांच्या मते, कलर टीव्हीवर ती मजा नाही. बाकी जाता जाता हा रिसर्च बघुन जा मज्जा येईल. 

लेखक : भिडू वैभव वाळुंज 

हे ही वाच भिडू 

 

1 Comment
  1. Ashish says

    अगदी मुद्द्याच बोलला भिडू..🤣🤣 मी सुद्धा ही अफवा ऐकली आहे.
    भिडू आपल्या Website ला Support केला पाहिजे ..

    https://ashishdhekaleofficial.com/

Leave A Reply

Your email address will not be published.