मृग नक्षत्र आणि मृग किडा म्हणजे बळीराजाला पेरणी करण्याचे संकेत देणारं समीकरण !

भारतात पावसाच्या आगमनाची बातमी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलीये. वैज्ञानिक निकषांची पूर्तता झाली की, पाऊस कधी येणार? हे जाहीर केलं जातं. पण जसं वैज्ञानिक निकष असतात तसेच काही नैसर्गिक निकष देखील असतात जे पूर्ण झाले की पावसाच्या आगमनाची वार्ता सर्वांना मिळते.

यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो ‘मृग नक्षत्र’ आणि ‘मृग किडा’…

सूर्य या साधारण २७ नक्षत्रांतून वर्षभरात प्रवास करतो. सूर्याचा हा प्रवास आणि त्यावेळी भारतात असणारे ऋतू यांचा सहसंबंध असतो, हे आपल्या पूर्वजांच्या लक्षात आला. २७ नक्षत्रांपैकी मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, अश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुन, हस्त या ९ नक्षत्रात जेव्हा सूर्य असतो तेव्हा भारतात पावसाळा असतो. 

यापैकी पहिल्या मृगशीर्ष नक्षत्रात ७ ते ८ जूनला सूर्य प्रवेश करतो. आणि त्यावेळी भारतात मान्सूनचे आगमन होत असतं. ८ जून ते २१ जून सूर्य या नक्षत्रात असतो.

‘मृग’ हे विशेष देखणं नक्षत्र. हरिणाचे चार पाय, त्याच्या पोटात शिरलेला बाण आणि लगतच असलेला तेजस्वी व्याध तारा, असा भासणारा हा तारकासमूह मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण रात्रभर आकाशात दिसतो. मात्र जूनमध्ये आकाशात मृग नक्षत्र दिसतच नाही, कारण सूर्याच्या सान्निध्यात त्याचं तेज लुप्त होत असतं.

ग्रामीण भागात मृग नक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात! बळीराजा पेरणीला सुरुवात करत असतो. मात्र पेरणीला नक्की सुरुवात केव्हा करायची, हे समजण्यासाठी एक महत्वाचा घटक कारणीभूत ठरतो. तो म्हणजे… 

‘मृग किडा’

पहिल्या पावसाच्या सरींनंतर वर्षभर सुप्तावस्थेत असलेला मखमली असा ‘मृगाचा किडा’ दिसू लागतो. तप्त झालेल्या जमिनीवर पाण्याचे तुषार पडू लागतात तेव्हा जमिनीत एक ओलावा निर्माण होऊ लागतो. तेव्हाच हा किडा दिसू लागतो. याचा अर्थ शेतकरी असं लावतात की पेरणीसाठी जमिनीत मुबलक स्थिती निर्माण झाली आहे, आता पेरणी सुरु करायला हरकत नाही!

आपल्या संस्कृतीत निसर्गाच्या प्रत्येक विशेषाला पूजेचा मान असतो. नाग पंचमी, बैल पोळा, वटसावित्री, हे सगळेच दिवस मान्सूनच्या मौसमातच येतात. हे रेशमी लाल किडे पण तेव्हाच दिसतात. हे किडे भारतातल्या जैव विविधतेचा भाग आहेत आणि हा किडा दिसला की पाऊस पडणार अशी धारणा ग्रामीण भागातील लोकांची आहे. त्यामुळेच हा किडा दिसल्यानंतर ग्रामीण भागातील लोक त्याला हळद-कुंकू वाहत त्याची पूजा करतात.

WhatsApp Image 2022 06 06 at 6.14.51 PM

आकाराने छोटेसे, तुरुतुरु चालणारे हे किडे इतका आकर्षक असतो की सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. 

पूर्ण वर्षात पावसाच्या पहिल्या नक्षत्राच्या वेळी फक्त १५ ते २० दिवस हा किडा दिसतो. जस-जसं मृग नक्षत्र संपत जाऊन आद्रा नक्षत्र सुरु होतं, पावसाचा जोर वाढू लागतो, सूर्यप्रकाशाची तीव्रता संपल्यानंतर ते पुन्हा जमिनीत गाडून घेतात. फक्त मृग नक्षत्राच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हा किडा बघायला मिळत असल्यामुळे याला ‘मृग नक्षत्राचा किडा’ किंवा ‘मृगाचा किडा’ असं देखील म्हटलं जातं. 

या किड्याच्या रचनेवरून आणि दिसण्यावरून याला अनेक नावं ठेवण्यात आलेली आहेत. या किड्याला इंग्रजीत ‘रेड वेलवेट माईट’ असं म्हणतात. याचं कारण म्हणजे किड्याच्या अंगावरील लाल रंगाची मखमल. तर संस्कृतमध्ये या किड्याला बिर बाहुती, उर्दूत राणी किडा, तेलगू अरुद्रा तर मराठीत काही ठिकाणी ‘गोसावी कीडा’ असं देखील म्हटलं जातं.

खरंतर पहिल्याच पावसात या किड्यांचा प्रजननाचा, मिलनाचा काळ असतो. म्हणून हा किडा मृगाच्या पावसात मादीला आकर्षित करण्यासाठी जमीनीवर येतो. या किड्यांची मादी ओल्या मातीत अंडी देते आणि साधारणपणे दोन महिन्यांनंतर या अंड्यांमधून लहानलहान किडे बाहेर पडतात. सुमारे ६० ते एक लाखांपर्यंत समूहाने अंडी घातली जातात आणि टप्प्याटप्प्याने त्यांची वाढ होत जाते.  

हे लहान वयाचे किडे वृद्धांपेक्षा वेगळे दिसत असतात. त्यांची अन्न भक्षण करण्याची पद्धतदेखील इतरांपेक्षा प्रचंड वेगळी असते. हे किडे एखादा लहानसा जीव जंतू शोधतात आणि त्यानंतर त्याला मधोमध दंश करुन त्याच्या शरीरातले रक्त पिण्यास सुरुवात करतात. मृगाच्या बाळकिड्याच्या मजबूत पकडेमुळे बळीकिडा स्वतःचा जीव वाचू शकत नाहीत.

मोठ्या किड्यांना साधारणपणे आठ पाय असतात. तर लहान किडे तरुण होत नाहीत तोपर्यंत यांना सहा पायच असतात. पुढे तरुण झाल्यानंतर त्यांच्या शरीरात होणारे बदलांसोबत हे जास्तीचे दोन पाय दिसू लागतात. पन यांना कावळा, मैना, चिमणी अशा पक्ष्यांपासून जपून राहावे लागतं. 

या  किड्यांचं आयुष्यमान तसं खूप कमी कालावधीचंच असतं. साधारणपणे दोन ते तीन महिन्यानंतर हे किडे दिसत नाहीत.

वैज्ञानिक दृष्ट्या देखील या किड्याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या किड्यांमध्ये हजारो वेगवेगळ्या प्रजाती आहेत, ज्या संपूर्ण जगभर सापडतात. विशेषतः कॅनडा ते आफ्रिका इथल्या भूभागांमध्ये हे किडे मोठ्या प्रमाणात दिसतात. विविध भूभागांनुसार यांच्या आकारातदेखील फरक पडत असतो‌. या प्रकारचा सापडलेला सर्वात लहान किडा दोन सेंटीमीटर लांबीचा आहे.

मात्र या किड्याची भारतात सापडणारी प्रजाती दुर्मिळ आहे. म्हणून त्याचं जास्त अप्रूप आहे. 

मात्र हे किडे आता इतके दुर्मिळ होतील की कासेचा बघायला मिळायला नाहीत, अशी शंका उपस्थित होतेय. गावात हे किडे दिसणं तुलनेनं कमी झालंय. तर पूर्वी शहरातील काही ठिकाणी हा आढळत होता पण वाढलेलं जमिनीचं प्रदूषण, प्लास्टिकचा वारेमाप वापर, यामुळे शहरात याचे दर्शन क्वचित झालं आहे.

तर उद्यानांमध्ये, शेतात अतिरिक्त रसायनांच्या वापरामुळे १९९० ते २०२० या दरम्यान किड्यांच्या २५टक्के प्रजाती पृथ्वीवरून दिसेनाशा झाल्या आहेत. अंधश्रद्घा आणि या किड्यांपासून काढता येणारे तेल यामुळे आदिवासी जमाती हे किडे जमा करण्याचं काम करतात. 

तसंच औषध म्हणून हे किडे वापरले जातात. छत्तीसगड, मध्यप्रदेश यांसारख्या भागांमध्ये काही संशोधकांनी याबाबत अभ्यास केला होता तेव्हा तिथले स्थानिक लोक दहापेक्षा जास्त आजारांमध्ये या किटकाचा उपयोग करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामध्ये, मलेरिया, अर्धांगवायू आणि लैंगिक समस्येवर शक्तिवर्धक औषध म्हणून त्याचा उपयोग केला जात असल्याचं आढळून आलं होतं. 

मात्र, याबाबतच्या शास्त्रीय चाचण्या झाल्या नसल्याची माहिती आहे.

मृग नक्षत्र आणि तेव्हा येणारा हा मृग किडा पावसाची चाहूल घेऊन येतो, त्याची वार्ता घेऊन येतो, अशी धारणा आहे. निसर्गात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहे, त्यातील एक जैविक घटक म्हणजे मृग किडा. त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. 

एक काळ होता जेव्हा शाळकरी पोरं पावसाळ्यातील पेरणीची आनंदवार्ता घेऊन आलेला हा किडा माचीसच्या डबीत भरून ठेवायचे. खूप अप्रूप वाटायचं त्यांना याचं, शाळकरी आयुष्यात हमखास जगलेली पिढी सध्या आहे, मात्र ती फक्त किस्से सांगण्यासाठी राहिली आहे.

म्हणून हे मृगाचे लाल मखमली किडे आता फक्त आख्यायिका बनून राहतात की काय अशी भीती अनेक निसर्गप्रेमींना वाटू लागलीये. असं झालं तर पावसाळी पेरणीची वार्ता आता कोण घेऊन येईल? हा प्रश्न पडतो…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.