कितीही उंचावरुन आपटा पण उभं राहताना कुलदीप यादव बनायला तेवढं विसरू नका…

आयपीएल २०१९. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स मॅच होती. विराट कोहली तेव्हा ‘विराट कोहली’सारखा खेळत होता. त्या मॅचमध्ये त्यानं सेंच्युरी मारली. पण कोलकात्याला खरा तडाखा दिला मोईन अलीनं.

कारण २८ बॉल्समध्ये ६६ रन्स मारणं ही काय चेष्टा नसते. मोईन अलीच्या हाणामारीत गाजलेली ओव्हर होती १६ वी. या ओव्हरचं चित्र होतं, ४, ६, ४, ६, वाईड, ६… शेवटच्या बॉलला मोईन अली आऊट झाला खरा पण पाच बॉलमध्ये २६ रन्स मारत त्यानं कोलकात्यावर बेक्कार प्रेशर टाकलं.

मोईन अलीच्या हाणामारीमुळं दोन गोष्टी पाहायला मिळाल्या, आरसीबीचा विजय आणि ती १६ वी ओव्हर टाकणाऱ्या कुलदीप यादवला भर मैदानात फुटलेलं रडू.

कुलदीपनं त्या मॅचमध्ये ५९ रन्स दिले, त्याला भर मैदानात मॅच सुरू असताना त्याला रडू फुटलं. एखाद्या प्लेअरचा आत्मविश्वास एवढा गंडू शकतो, हे त्या दिवशी पहिल्यांदा समजलं.

बऱ्याच लोकांना वाटलं, कुलदीप संपला.

कारण बॉलिंग खराब पडली म्हणून भर मैदानात रडू फुटत असेल, तर यापेक्षा वाईट काय होऊ शकतं. पण कुलदीपच्या बाबतीत यापेक्षाही वाईट गोष्टी घडल्या.

ज्या कोलकाता नाईट रायडर्स टीमसाठी कुलदीप यादव प्रमुख स्पिनर होता, त्याच कोलकात्यानं मोईन अलीनं केलेल्या धुलाईनंतर त्याला संधी देण्याचं कमी केलं. २०२० च्या आयपीएलमध्ये कुलदीप फक्त ५ मॅच खेळला. त्यात त्याला फक्त १ विकेट घेता आली, कारण भावामध्ये आत्मविश्वासच उरला नव्हता.

२०२१ च्या आयपीएलमधली कुलदीपची आकडेवारी सापडत नाही, कारण कोलकात्यानं त्याला एकाही मॅचमध्ये संधी दिली नाही. दुसऱ्या हाफमध्ये तर त्याला दुखापत झाली, त्यामुळं संधी हुकलीच. गंडण्याचा प्रवास इथंही थांबला नाही, कारण भारताच्या वर्ल्डकप टीममध्येही त्याचं सिलेक्शन झालं नाही. आता करिअर पुढं मोठं प्रश्नचिन्ह होतं. 

लोकांनी कुलदीपचे फोटो घेऊन ‘पल दो पल का शायर’चे मिम्स बनवायलाही घेतले होते.

इथपर्यंतची गोष्ट होती आपटण्याची, फेल होण्याची आणि गंडण्याची. आता किस्सा उभं राहण्याचा…

२०२२ ला होतं मेगा ऑक्शन, कुलदीप यादव अनसोल्ड जाईल असं वाटत होतं. मात्र दिल्ली कॅपिटल्सनं त्याच्यावर विश्वास दाखवला. दिल्लीनं त्याला पहिल्या मॅचपासून संधी दिली आणि त्यानंही फक्त १८ रन्सच्या मोबदल्यात ३ विकेट्स घेत पहिल्या संधीचं सोनं केलं.

लखनौ आणि गुजरात विरुद्ध पण त्यानं चांगली बॉलिंग टाकली, पण खरा सामना होता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध. ज्या टीमनं आपल्यावर विश्वास दाखवला नव्हता, त्यांना भिडायचं होतं.

आत्मविश्वासासोबत, सेल्फ रिस्पेक्टचाही प्रश्न होता.

त्या मॅचमधला कुलदीप वेगळाच वाटला, त्यानं रन्स दिले ३५ पण विकेट्स काढल्या ४. झोकात खेळणारा श्रेयस अय्यर, मॅच फिरवू शकणारे पॅट कमिन्स आणि सुनील नरीन आणि बोनस म्हणून उमेश यादव. पुढं आणखी तीन मॅचेस झाल्या आणि पुन्हा सामना रंगला, दिल्ली विरुद्ध कोलकाता.

सगळ्यांचं लक्ष पुन्हा कुलदीपवर.

गुरुवारी झालेल्या या मॅचमध्ये त्यानं परत ४ विकेट्स काढल्या. फॉर्मात खेळणारा श्रेयस अय्यर, किपर बाबा इंद्रजित, सुनील नरीन आणि सगळ्यात महत्त्वाची विकेट म्हणजे आंद्रे रसेल. कुठल्याही क्षणी मॅच फिरवू शकणाऱ्या रसेलला त्यानं शून्यावर काढलं आणि कोलकात्याच्या डगआऊटमध्ये भयाण शांतता पसरली. ३-०-१४-४ अशा खतरनाक स्पेलमुळं दिल्लीचा विजय सोपा झाला.

ज्या कोलकात्यानं कुलदीपला बेंचवर बसवलं, ज्या कोलकात्यानं त्याला आत्मविश्वास दिला नाही. त्याच कोलकात्याच्या विरुद्ध झालेल्या दोन्ही मॅचेसचा मॅन ऑफ द मॅच कुलदीप यादव आहे.

ते आपल्याला सोडून गेलेल्या पोरीच्या लग्नात आपण थाटात जावं असं लई पोरांचं स्वप्न असतं. कुलदीपची कामगिरी बघून आपल्याला हेच आठवतं.

टीममधली जागा जाऊनही त्यानं लाऊन धरलं, मेहनत घेणं, सराव करणं सोडलं नाही. आज त्याचं फळ कुलदीपला मिळतंय. बॉलिंगमध्ये आणलेले काही व्हेरिएशन्स आणि वाढवलेला स्पीड याही पेक्षा विकेट घेण्यात महत्त्वाचा ठरतोय, तो म्हणजे त्याचा आत्मविश्वास. कधीकाळी ज्या कुलदीपच्या डोळ्यात पाणी होतं, तोच कुलदीप जुन्या जोशात मैदान गाजवतोय.

सध्या त्याच्या नावाची चर्चा आहे, कारण म्हणजे बांग्लादेश विरोधातील दुसऱ्या टेस्ट मॅच मधून त्याला वागळ्यांना आले आहे. २२ महिन्यानंतर कुलदीप यादव टेस्ट क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. पहिल्या मॅच मध्ये ८ विकेट घेतल्या होत्या. तसेच त्याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला होता. मात्र आजच्या मॅच मध्ये प्लेयिंग ११ मध्ये त्याला स्थान देण्यात आले नाही.यामुळे कुपदीप यादव बद्दल सोशल मीडियावर बोलले जात आहे.

म्हणून तर म्हणलं शेठ, कितीही जोरात खाली आपटा, उभं राहताना कुलदीप सारखं रहा. थाटात पण पाय जमिनीवर ठेऊन.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.