आयुष्यात दोस्त का पाहिजे… हे दिनेश कार्तिकचा कमबॅक बघून समजतं

डोक्याला अगदी जरासा ताण देऊन आठवा, तुम्ही एक मेसेज किंवा पोस्ट वाचली असेल, दिनेश कार्तिकबद्दल.

दिनेश कार्तिकला आपल्या बायकोच्या पोटात दुसऱ्याचं बाळ आहे हे समजलं, त्यानंतर तो दारू प्यायला लागला, देवदास झाला, त्यानं क्रिकेट सोडून दिलं. तमिळनाडूची कॅप्टन्सी त्याच्याकडून काढून घेतली गेली. आयपीएलमधून त्याला बाहेर काढलं, तो जीव द्यायला निघाला होता… असं बरंच काही काही…

त्या स्टोरीमध्ये इतका मसाला होता, की बॉलिवूडचा पिक्चर निघाला असता. पण गोम अशी होती की हि स्टोरी होती फेक. दिनेश कार्तिकला कधीच आयपीएलमधून बाहेर काढण्यात आलं नव्हतं आणि तो देवदासही झाला नव्हता.

मसाला लावलेल्या स्टोरीला व्हायरल व्हायला काय लागत नसतंय, पण त्याच्या नादात खरी स्टोरी कुठंतरी किटबॅगमध्ये पडून राहते आणि ज्या माणसाला क्रेडिट मिळायला पाहिजे त्याला मिळत नाही.

सध्याचा रेफरन्स सांगायचा झाला तर, दिनेश कार्तिकची साऊथ आफ्रिके विरुद्धच्या टी२० सिरीजसाठी भारतीय संघात निवड झालीये. एखादा माणूस हारलाय, संपलाय असं गृहीत धरुन दुनिया चालत असते आणि तेव्हाच तो असलं बाप कमबॅक करतो, म्हणजे किती मोठा विषय.

दिनेश कार्तिकच्या स्टोरीतलं खरं मोटिव्हेशन इथं आहे, त्याची बायको त्याला सोडून गेली, टीम इंडियात जागा मिळवणं कठीण होतं, फॉर्म सपशेल गंडला होता, तरीही डिके पुन्हा उभा राहिला.. तो फिनिक्स पक्षी असतोय ना, त्याच्यासारखा!

आता तसं बाकी दुनियादारी तुम्हाला माहिती असेलच, पण आपण झटकन उजळणी करुयात.

२००३ साली जेव्हा दिनेश कार्तिकनं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला, तेव्हा आपल्यातल्या कित्येकांना धड क्रिकेटचं स्पेलिंगसुद्धा लिहिता येत नव्हतं. त्या पहिल्याच मॅचमध्ये त्यानं मायकेल वॉनला स्टंपिंग केलं आणि सगळ्या इंग्लंडच्या बत्त्या डीम केल्या.

भारताचा ‘विकेटकिपर: एक खोज’ नावाचा अध्याय संपता संपत नव्हता, तेव्हा आपल्याला दिनेश कार्तिक मिळाला. डीकेची बॅटिंग वैगेरे सगळं सेट होतं, पण जशी लांब केसांच्या आणि रुंद खांद्यांच्या धोनीची एंट्री झाली… तसा डीके बाहेर पडत गेला.

त्यानंतर तो २००७ चा वर्ल्डकप खेळला, भारतीय संघात कधी आत कधी बाहेर मात्र सुरूच होतं. या सगळ्या पिक्चरमध्ये २०१२ ला दिनेश कार्तिकला आपल्या बायकोचं आपलाच टीममेट मुरली विजयशी अफेअर असल्याचं समजलं. कार्तिकसाठी जिंदगीतला सगळ्यात घाण सेटबॅक.

या नंतरची स्टोरी, निदाहस ट्रॉफीमधली इनिंग आणि आता आयपीएल हे तुम्हाला माहितीच असेल. पण इथवर ३०० शब्दांची बॅकग्राउंड स्टोरी सांगितलीये,

कारण आता गोष्ट दोस्तीची सुरू होते.

अभिषेक नायर आठवतो? भारताकडून फक्त ३ वनडे मॅचेस खेळलाय. पण मुंबई क्रिकेटमधला दादा बॅट्समन. सध्या कोलकाता नाईट रायडर्सच्या कोचेसपैकी एक. बोलायला, राहायला, वागायला एकदम सिम्पल माणूस. रोहित शर्माचं करिअर धोक्यात असताना, अभिषेक नायरनंच त्याला मदत केली होती.

दिनेश कार्तिकच्या आयुष्यात एक असा पॉईंट आला होता जेव्हा त्याची भारताकडून खेळण्याची इच्छा संपली होती. कधीकधी आपल्याला वाटतं ना की काहीच करायला नको, नुसतं बसून राहावं असं सेम डीकेला वाटत होतं.

तेव्हा त्याच्या आयुष्यात अभिषेक नायरची एंट्री झाली. चेन्नईत मोठ्या घरात राहणारा डीके नायरच्या पोवईमधल्या छोट्या घरात रहायला लागला. 

नायरनं त्याला ट्रेन केलं, कम्फर्ट झोनच्या बाहेर काढलं. कधी स्विमिंग पूलमध्ये ४० लॅप्स मारायला लावले, तर कधी डोंगरावर पळायला लावलं, कधी सांगेल तो व्यायाम करायला लावला.

घर झाडून, पुसून घ्यायला लावलं, स्वतःचं अंथरुण स्वतः घालायला लावलं, आपल्यासाठी या गोष्टी किरकोळ असतील, पण यामुळंच डीके कम्फर्ट झोनच्या बाहेर आला.

अभिषेक सांगतो, “हे माझं एकट्याचं क्रिकेट नाही, सगळ्यात मोठं क्रेडिट स्वतः दिनेश कार्तिकचं आहे. कारण आपण लाख सांगू पण ज्याला सांगतोय त्यानं ऐकणं आणि त्यावर काम करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अपूर्व देसाईनं त्याच्या बॅटिंगवर भरपूर काम केलं. मी फक्त डीकेला त्याच्यात काय ताकद आहे, तो काय करु शकतो याची जाणीव करुन दिली.”

आपल्या आयुष्यात पण असाही एक मित्र असतो ना, जो आपण जे काही आहोत, जे काही कमावलंय त्याच्यात आपला दोस्त सोबत असतो. त्याला आपल्या आयुष्यातून काढला ना, तर जिंकण्याची मजाच राहत नाही. त्यानं आपल्याला केलेली मदत, त्याचा सपोर्ट याबद्दल आपण लोकांना बरंच काही सांगू शकतो. पण जेव्हा तो लोकांना आपल्याबद्दल सांगतो, तेव्हा म्हणतो, ‘माझं काही नाही यानं केलं म्हणून झालं.’

या क्षणाला पैसा, प्रसिद्धी हे गळ बाजूला पडतं आणि दोस्ती जिंकते… कायम.

अभिषेक नायरनं दिनेश कार्तिकसोबत हेच दोस्ताचं काम केलं… त्यामुळं आज फक्त दिनेश कार्तिकच नाय, तर अभिषेक नायरही एक दोस्त म्हणून जिंकला.

जाता जाता, कदाचित तुम्हाला माहीत नसलेला किस्सा सांगून जातो. २०२० मध्ये दिनेश कार्तिक कोलकात्याचा कॅप्टन होता. आयपीएल सुरू असतानाच त्याची कॅप्टन्सी गेली. सगळीकडे चर्चा झाली की केकेआरनं त्याला कोल्ला.

पण खरा विषय असा होता की, डीकेच्या बायकोचं दीपिकाचं मिसकॅरेज झालं होतं. गडी भारतात यायला निघाला आणि तेव्हा टायच्या बायकोनं त्याला सांगितलं की, ‘तू थांब. तू खेळ.’ 

२०२० आणि २०२१ च्या आयपीएलमध्ये डीके फार भारी खेळला नाही. २०२२ मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं संधी दिली आणि डीकेनं ती गाजवली. एबीडी टीममध्ये नाही, कोहली फॉर्मात नाही, डू प्लेसिस पण कधी खेळतोय कधी नाही, असं असूनही दिनेश कार्तिकमुळं आज आरसीबी प्लेऑफमध्ये आहे.

एवढंच नाही, तर दिनेश कार्तिकला इंडिया टीममध्ये बोलावणं आलंय. २०१९ मध्ये डीके इंडियाकडून शेवटची टी२० खेळला होता, त्यानंतर पुन्हा कमबॅक करतोय. पुढच्या वर्षीपर्यंत खेळत राहिला, तर २० वर्षांचं इंटरनॅशनल करिअर होईल. बाकी वयाचं म्हणाल, तर ३६ वर्षाचा आहे.

आणि जिगर म्हणाल तर अजून लई आहे… निदाहास ट्रॉफीत बांगलादेशला मारलेल्या सिक्सपासून ते केकेआरला हरवल्यावर फक्त आदरापोटी सेलिब्रेट न करण्यापर्यंत.

दिनेश कार्तिक फिनिक्स आहे… इतक्यात संपत नसतोय!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.