तिचं पाकिस्तानी क्रिकेटर बरोबर लग्न ठरलं आणि शत्रुघ्न सिन्हा धाय मोकलून रडू लागले.

जगाला खामोश करणारा स्टार म्हणजे शत्रुघ्न सिन्हा. शत्रू काका बोलायला लागले की कोणाला ऐकत नाहीत. एक काळ होता जेव्हा सिन्हा साहेब बच्चनला टक्कर समजले जायचे. त्यांची अँग्री यंग इमेज , डायलॉग डिलिव्हरी, फायटिंग अमिताभला देखील जड जायची. शत्रुघ्न सिन्हाने शोले नाकारला आणि तो अमिताभला मिळाला. पुढचा इतिहास तर आपल्याला ठाऊकच आहे.

हे झालं त्यांच्या अँग्री यंग मॅन इमेजबद्दल. पण या सोबतच शत्रुघ्न काका आणखी एका गोष्टीसाठी फेमस होते ते म्हणजे त्यांच्या फिमेल फॅन फॉलोविंग साठी.

शत्रुघ्न सिंह यांच्या मैत्रिणी प्रचंड होत्या. त्याकाळात त्यांना प्ले बॉय म्हणून ओळखलं जायचं. नेहमी पोरींच्या घोळक्यात डायलॉगबाजी करताना आढळणाऱ्या या शत्रूजींची एक मैत्रीण मात्र खास होती. तीच नाव रीना रॉय.

खरं नाव सायरा अली. वडील सादिक अली आणि आई शारदा राय हे दोघेही सिनेमामध्ये छोटे मोठे रोल करायचे. पुढे दोघे वेगळे झाले आणि शारदा रायने पोरीचं नाव रूपा राय केलं. जेव्हा हि लेक सिनेमात आली तेव्हा रूपाचं रिना झालं.

नागीण हा तिचा सगळ्यात गाजलेला सिनेमा. सुनील दत्त जितेंद्र पासून ते संजय दत्त कमल हसन पर्यंत अनेक हिरोंसोबत तिने काम केलं. पण तिची खरी जोडी जमली शत्रूसाहेबांसोबत. असं म्हणतात कि एका रेल्वे कंपार्टमेंट मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. तिथून लवकरच प्रेमात त्यांचं रूपांतर झालं.

शत्रुजी रिना रॉय साठी वेडे झाले होते असं म्हणतात. दोघांचा एकत्र कालिचरण, विश्वनाथ हे सिनेमे देखील प्रचंड सुपरहिट झाले. त्यांनी एकूण १६ सिनेमांमध्ये एकत्र काम केलं यापैकी ११ सिनेमे हिट होते. त्यांची जोडी प्रेक्षकांना देखील आवडू लागली होती.

त्यांच्या लग्नाच्या वावड्या उठू लागल्या. पण शत्रुजी म्हणजे शत्रुजी होते. त्यांचं काही खरं नव्हतं.

आणि घडलंही तसेच. रिना रॉय एकदा लंडनला गेली होती. शत्रुजी एका पाहुण्यांच्या लग्नाला गेले होते. तिथल्या रिसेप्शन वेळी त्यांना एक मिस इंडिया भेटली. नाव पूनम. शत्रुजी नेहमीप्रमाणे तिच्या प्रेमात पडले. पण यावेळी प्रकरण साधं नव्हतं. पूनमने त्यांना लग्नाला तयार केलं. परमवीर शत्रुघ्न सिन्हा यांनी पडत्या फळाची आज्ञा मानत तिच्या बरोबर चक्क लग्न देखील केलं.

रिना रॉयला जेव्हा हि बातमी कळली तेव्हा तिच्या डोक्यावर बॉम्बच पडला. सुरवातीला चिडली, राग राग केला, पण शत्रुघ्न सिन्हाच्या पाषाण हृदयाला काही फरक पडला नाही.

पुढे दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. दोघांनी आपल्या करियरकडे लक्ष केंद्रित केलं. रिना रॉय तेव्हा आपल्या कारकिर्दीच्या टॉपवर होती. 

लग्नानंतर काही दिवसातच या दोघांचं अफेअर  पुन्हा चालू झालं . शत्रुघ्न सिन्हा स्वतः आपल्या पुस्तकात याबद्दल सांगतात. पहलाज निहलानी यांच्या हातकडी या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. यात शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार यांच्या बरोबर रिना रॉय देखील होती. हा सिनेमा संपून निहलानी पुढचा सिनेमा लगेच सुरु करणार होते. मात्र रिना रॉय त्यांना होकार कळवत नव्हती. कारण विचारल्यावर तिने निहलानी यांना सांगितलं की,

अपने दोस्त से जाकर कह दो, वो अपना जवाब जल्दी दें। अगर वो हां कहते हैं तो मैं इस फिल्म में काम करूंगी वरना नहीं। मैंने फैसला कर लिया है कि अगर वो मुझसे शादी नहीं करेंगे तो मैं अगले 8 दिनों में कहीं और शादी कर लूंगी।’

तिचा मेसेज निहलानी यांनी शत्रुघ्न सिन्हाला सांगितला तेव्हा शत्रुजी हादरून गेले. त्यांनी लगेच तिला फोन लावला. दोघांचा फोनवर मोठा वाद झाला. शत्रुघ्न सिन्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे जोरजोरात रडत होते पण रिना आपल्या म्हणण्यावर ठाम होती. निहलानी यांनी शत्रुघ्नला समजावलं.

‘उसे जाने दो, शादी कर लेने दो।’

पुढे काही वर्षांनी रिना रॉयने लग्न केलं पण ते हि थेट पाकिस्तानी क्रिकेटर बरोबर. मोहसीन खान.

मोहसीन खान देखणा होता. पाकिस्तानचा स्फोटक ओपनर म्हणून तो फेमस होता. भारत विरुद्धच्या एका कसोटीत पाकिस्तानने १३५ धावा काढल्या या पैकी १०१ धावा फक्त एकट्या मोहसीनच्या होत्या. त्याने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध डबल सेंच्युरी मारण्याचा विक्रम देखील केला होता.

अशा या पठाणी क्रिकेटर बरोबर नाजूक रिना रॉयने लग्न केलं. पुढे या दोघांना मुलगी देखील झाली, तीच नाव ठेवलं जन्नत.  त्याकाळी या लग्नामुळे सम्पूर्ण देशात खळबळ उडाली होती. भारताविरुद्ध खेळणाऱ्या क्रिकेटर बरोबर रिना रॉय लग्न कस करू शकते या प्रश्नांनी संस्कृती रक्षक खवळले होते.

मोहसीन खान क्रिकेटमधून संन्यास घेऊन बॉलिवूडमध्ये देखील आले. जे पी दत्ता यांनी त्याला बटवारा या सिनेमात ब्रेक दिला. मोहसीन खानने जवळपास सात आठ सिनेमात काम केलं. यातला महेश भट्टचा साथी हा सिनेमा प्रचंड गाजला. 

पण हिकडे रिना रॉय आणि त्याच्या लग्नाची गाडी मात्र रुळावरून घसरली होती. मोहसीन बरोबर संसार करणे अशक्य आहे हे ओळखून रिना भारतात परत आली. दोघांनी सोडचिठ्ठी घेतली. मात्र त्यांच्या लेकीचा ताबा मोहसिनकडेच राहिला.

पुढे मोहसिनने दुसरं लग्न केल्यावर रिनाला आपल्या पोरीची कस्टडी मिळाली. तिने तीच नाव देखील बदलून सनम असं केलं. २००० साली जेपी दत्ता यांच्या रिफ्युजी सिनेमातून रिना ने कमबॅक केला पण त्यात ती यशस्वी झाली नाही.

आजही तिच्या आणि शत्रूजींच्या लव्हस्टोरीच्या आठवणी सोशल मीडियावर काढल्या जातात. सोनाक्षी सिन्हा कशी रिना रॉयसारखी दिसते असं बोललं जातं. शत्रू आणि रिना रॉयची अधुरी राहिलेली प्रेमकथा आजही गॉसिपमधून जिवंत आहे हे खरं.

  हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. BHIDU says

    ते सगळ ठीक आहे पण, नीट निरखून पाहिल तर सोनाक्षी सिन्हा रिना रॉय सारखी का दिसते?

Leave A Reply

Your email address will not be published.