भाजपसोबत ज्या-ज्या पक्षांनी युती केली त्यांची वाट लागली…!

भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचं आज देशभरातील जवळपास १७ राज्यात आणि केंद्रशासीत प्रदेशात सत्ता आहेत. केंद्रातल्या सत्त्तेबरोबरच आज जवळपास भारताच्या ४४% टक्के भूभागावर भाजपाचंच शासन आहे.  १९८० मध्ये स्थापन झालेली ही पार्टी आज काही अपवाद सोडले तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचली आहे.

सुहास पळशीकर यांनी या भाजपच्या कार्यकाळाला  India’s Second Dominant Party System असंही म्हटलं आहे. 

स्वातंत्र्यानंतर जसं तीन दशके देशात फक्त काँग्रेसचं चालत होती तसाच आज भाजपचा दबदबा आहे.

भाजपच्या या घौडदौडीत त्यांना मित्रपक्षांची देखील तितकीच मोलाची साथ मिळाली. मात्र यापैकी आज एकची पण अवस्था धड नाहीये.

होय !

एकाची पण नाही याच्यासाठी की ज्यांनी भाजपशी युती करून सत्ता भोगली त्यांना आज उतरती कळा लागली आहे.

सुरवात करू सध्या हा मुद्दा ट्रेंडिंगमध्ये आणणाऱ्या

बिहार मधल्या VIP या पार्टीपासून 

बिहारमधील निषाद जातीची बिहार आणि त्याचबरोबर उत्तरप्रदेशातील मतं आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने बिहार निवडणुकीदरम्यान मुकेश सहानी याच्या व्हीआयपी पक्षाशी युती केली. पक्षाला ११ जागा देखील सोडल्या. यामधून व्हीएआयपीच्या ३ जागा निवडून आल्या. व्हीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश सहानी यांना मंत्रिपद देखील दिलं.

मात्र उत्तरप्रदेश निवडणुकीत जेव्हा मुकेश सहानी यांनी स्वतःचे उमेदवार भाजपच्या विरोधात उतरवले तेव्हा भाजपने सरळ त्यांच्या पार्टीचे तिन्हीही आमदार आपल्याकडे घेत नितीश कुमारांना सांगून सरळ मंत्रिमंडळातून नारळ दिला आहे.

सतराव्या वर्षी मुंबईमध्ये पळून येऊन, फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचा बिझनेस उभारून आणि मग स्वतःची पार्टी काढून मंत्रिपद मिळवणाऱ्या मुकेश सहानी यांच्यापुढे आज अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.

पण भाजपबरोबर जाऊन आता पार अस्तित्वासाठी झगडणाऱ्या पक्षांची लिस्ट तशी लै मोठी आहे.

पंजाबमधील शिरोमणी अकाली दल.

शिरोमणी अकाली दल हा भाजपच्या सगळ्यात जुन्या मित्र पक्षांपैकी एक होता. आज पंजाबमध्ये जो थोडाफार भाजपची ताकद आहे ती शिरोमणी अकाली दलाच्या मदतीनेच आहे असं सांगण्यात येतं. मात्र शेती कायद्यांसारख्या कायदा जो पंजाबच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील होता त्यात भाजपने शिरोमणी अकाली दलाचं कोणतंच म्हणणं ऐकून घेतलं नाही. परिणामी अकाली दलाला भाजपापासून  दूर जाऊन जनतेला आमचा या निर्णयाशी काही संबंध नाही असं सांगावं लागलं. मात्र याचा काही फायदा झाला नाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकाली दलाची धूळधाण झाली.

बिहारमध्ये नितीश कुमारांची खुर्ची सुरक्षित राहिली मात्र त्यांचा पक्ष जदयू लयालाच जात राहिला.

२००५ मध्ये जेव्हा मुख्यमंत्री म्ह्णून नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच मुख्यामंत्रीपदाची ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता तेव्हा जनता दल (यु) चे आमदार होते ८८ आणि भाजपचे होते ५५.  मात्र २०२० पर्यंत भाजपा कधी मोठा भाऊ झाला हे नितीश कुमारांना कळलंच नाही. २०२०च्या विधानसभेच्या  निवडणुकीनंतर भाजपचा जागा आहेत ७४ आणि नितीश कुमारांच्या ४३.

अरुणाचलमध्ये ७ पैकी ६ आमदार फोडल्यानंतर पण नितीश कुमार शांत होते.केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त एक मंत्रिपद दिल्यांनतर नाराज होऊनही त्यांनी कोणतीच हालचाल केली आहे. जाणकार सांगतात नितीश कुमार यांच्यानंतर त्यांच्या स्टेट्सचा सध्या कोणताच नेता जनता दलात नसल्याने याचा फायदा भाजपलाच होणार आहे. त्यात जनता दलातले अनेक नेते जसे की केंद्रीय मंत्री आर सी पी सिंग हे भाजपच्या खूप जवळ असल्याचंही सांगण्यात येतं .

रामविलास पासवान यांच्यानंतर त्यांच्या राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीत पडलेलं उभी फूट.

मोदीजी मेरे सिने मे राहते है असं म्हणणाऱ्या चिराग पासवान यांना जेव्हा काका पशुपतीनाथ पारस यांच्याविरोधात मदत पाहिजे होती तेव्हा भाजपाने सरळ काकाच्या बाजूला  खासदार आणि आमदार जास्त आहेत बघून पशुपतीनाथ पारस यांनाच साथ दिली. नेहमी सत्तेत राहून पार्टी वाढवणाऱ्या रामविलास पासवान यांची पार्टी त्यांच्या मृत्यूच्या १-२ वर्षांतच संपत आली आहे.

उपेंद्र कुशवाह यांची समता पार्टी संपली पण.

बिहारमध्ये उपेंद्र कुशवाह यांना नितीश कुमार यांनी मधल्या काळात साथ सोडल्यानंतर भाजपने कुशवाह यांच्या समता पार्टीला जवळ केले. त्यांना ३ खासदारांसह केंद्रीय मंत्री देखील करण्यात आले आले होते. मात्र २०१९ मध्ये नितीश कुमार NDA मध्ये आल्यानंतर कुशवाह यांना जास्तीच्या जागा  दिल्या नाहीत . मग NDAमधून बाहेर पडावं लागलेल्या उपेंद्र कुशवाह यांच्या पक्ष एवढा तळाला गेला कि शेवटी त्यांना आपला पक्ष JDU मध्ये विलीन करावा लागला.

चंद्राबाबू नायडू यांचा विषय तर जरा जास्तच अवघड झालाय

NDA च्या जुन्या पक्षांमध्ये एक नावच कायम असायचं ते म्हणजे चंद्राबाबू नायडू. तेलगु देसम पार्टीने मग भाजप त्यांची आंध्रला स्पेशल स्टेटस देण्याची मागणी मान्य होत नसल्याचा कारण देत भाजपाची साथ सोडली आणि पक्षाला अवकळा आली. जगनमोहन रेड्डी हात धुवून चंद्राबाबूंच्या मागे लागले असताना त्यांना जुना मित्र भाजपकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र साध्य तरी भाजपने आपलं वजन जगनमोहन रेड्डी यांच्याच पारड्यात टाकल्याचं दिसतंय.

आम्ही युतीत २५ वर्षे सडलो असं शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उगीच म्हणाले नाहीयेत.

१९९५ मध्ये युतीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा शिवसेनेचे आमदार होते ५२ आणि भाजपचे ४२. मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होता. पण मधल्या काळात सुरवातील युतीतला लहान भाऊ असेलला भाजपा कधी राज्यातला सर्वात मोठा  पक्ष झाला हे शिवसेनेला पण कळले नाहीये. २०१९ची निवडणूक युतीत लढूनही भाजपच्या जागा आल्या होत्या १०२ आणि शिवसेनेच्या अर्ध्या म्हणजेच ५६. दिवसेंदिवस भाजपकडून होणारी कोंडी पाहून मग शिवसेनेनेही भाजपाची साथ सोडली. यामागं भाजपाची प्रगती होत असताना शिवसेना मात्र दिवसेंदिवस कमी होत चालली होती हे ही कारण होतं हे शिवसेनेच्या नेत्यांनीही मान्य केलं आहे.

गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी तर एक क्लासिक उदाहरण आहे.

१९९४ च्या निवडणुकीत भाजपने MGP सोबत युती केली आणि त्या पक्षाच्या मतांच्या आधारावर राज्यात प्रवेश केला. भाजपाला त्या निवडणुकीत केवळ चार जागा जिंकल्या आणि MGP ला १० जागा मिळाल्या. मात्र पुढच्या काही वर्षांमध्ये  MGPचा एक सिंह आणि भगवा ध्वज भाजपच्या भगव्यापुढे झाकोळला तो कायमचाच. कधीकाळी स्वबळावर गोव्याचं मुख्यमंत्रीपद मिळवनाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीला २०१७ च्या निवूडणुकीनंतर तीनच जागा मिळाल्या होत्या आणि नंतर त्यातले पण  २ भाजपाने नंतर फोडले. आता पक्षाने आमचे आमदार फोडायचे नाहीत या अटीवर भाजपाला पाठिंबा दिला आहे. विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पार्टीची पण आता भाजपाने सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवल्याने बिकट अवस्था झाली होती.

तिथं जयललितांच्या अण्णा द्रमुक तर जास्त जागा असूनही भाजपची B टीम म्हणून ओळखला जातोय.

जयललिता यांच्या जाण्यानंतर पक्षात सुरु झालेल्या भांडणात भाजपने यशस्वीपणे हस्तक्षेप केला आणि  दिल्लीच्या आशीर्वादाने AIADMK चं सरकार टिकलं. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत AIADMKला भाजपाबरोबर  जाणं चांगलंच महागात पडलं आणि द्रविडीयन जनतेनं या युतीला नाकारलं. आता AIADMK चं पाटण चालू असताना भाजपाचे मात्र राज्यात पाय पसरण्याचे प्रयत्न जोरात चालू आहेत.

त्यामुळे भाजपा एवढी वाढली ती फक्त काँग्रेसला रिप्लेस करून नाही तर मित्रपक्षांच्या पॉवर कमी करून देखील असं म्हणण्यास फुल स्कोप आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.