शेन वॉर्न का भारी होता, ते इंग्लंडच्या रेहान अहमदला बघून समजतं…

शेन वॉर्नचं नाव घेतल्यावर आपल्याला जसे त्याचे मैदानाबाहेरचे राडे आठवतात, तसेच मैदानातले खतरनाक लेग स्पिनही. समोर कितीही वस्ताद बॅट्समन असला तरी त्याच्या पायामागून बॉल काढून दांड्या उडवायचं स्कील वॉर्नकडे होतं. लेग स्पिनर लय मार खातात, त्यांची दहशत नसते असं वाटणाऱ्या प्रत्येकाला शेन वॉर्नच्या बॉलिंगनं खोटं ठरवलं.

भारतीय फॅन्सला त्याच्याबद्दल राग होता, कारण गडी सचिन, द्रविड यांच्यासारख्या प्लेअर्सलाही सुट्टी द्यायचा नाही. बॉलिंग आणि स्किलच्या बाबतीत वॉर्न बादशहा होताच, पण त्याहीपेक्षा मोठं स्कील त्याच्याकडे होतं ते टॅलेंट पारखण्याचं.

आत्ता वॉर्नची आठवण येण्याचं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये झालेली इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टेस्ट मॅच. इंग्लंडच्या हॅरी ब्रुकनं या मॅचमध्ये सेंच्युरी केली, बेन डकेट, बाबर आझम, सौद शकील यांनी फिफ्टी मारली, पण सगळी चर्चा फिरतीये ती रेहान अहमद या एकाच नावाभोवती.

वयाच्या १८ व्या वर्षी रेहाननं इंग्लंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो त्यांचा सगळ्यात कमी वयाचा टेस्ट प्लेअर ठरला आणि सगळ्यात कमी वयात डावात ५ विकेट्स खोलणारा भिडूही.

आधी बघू रेहाननं नेमकं केलं काय ?

तर पाकिस्तान विरुद्धच्या टेस्टमध्ये त्याला संधी मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये त्यानं २ विकेट्स काढल्या, त्याचं बरंच कौतुकही झालं. पण त्याचा इम्पॅक्ट पडला तो दुसऱ्या इनिंगमध्ये. जॅक लीचनं टॉप ऑर्डरच्या तिन्ही विकेट्स खोलल्यावर इंग्लंडला चांगला चान्स क्रिएट झाला होता. पण बाबर आझम आणि सौद शकीलनं चौथ्या विकेटसाठी खतरनाक पार्टनरशिप केली. जवळपास तीन तास हे दोघं क्रीझवर होते, साहजिकच इंग्लंडचं टेन्शन वाढत होतं.

हे टेन्शन वाढायचं आणखी एक कारण म्हणजे कॅप्टन बेन स्टोक्सनं जॅक लीच, ओली रॉबिन्सन, मार्क वुड आणि स्वतः स्टोक्स असे सगळे पर्याय वापरुन बघितले होते, पण ही जोडी काय फुटत नव्हती. मग स्टोक्सनं बॉल दिला रेहानकडे.

त्याच्या खराब बॉलवर बाबर आझम आऊट झाला, मग त्यानं मोहम्मद रिझवानला आऊट केलं आणि तिथनं पाकिस्तान गंडायला सुरुवात झाली. बघता बघता रेहाननं ५ विकेट्स खोलल्या, वयाच्या १८ व्या वर्षी त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये पंजा खोलला.

तेही अशा पिचवर जिथून कुठल्याच बॉलरला मदत मिळत नव्हती, ना बाऊन्स होता आणि ना टर्न.त्यात होम टीम असलेले पाकीस्तानचे प्लेअर्स स्पिन बॉलिंग खेळत खेळतच मोठे झालेले, पण त्यांनाही रेहानची बॉलिंग झेपली नाही. त्यानं तिसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या इनिंगला फुलस्टॉप लावला.

त्यात जेव्हा नाईट वॉचमन म्हणून रेहान बॅटिंगला आला तेव्हा आल्या आल्या त्यानं पाकिस्तानच्या बॉलर्सवर अटॅक करायला सुरुवात केली. त्यानं आल्याआल्या एक बाऊंड्री मारली. विकेट लवकर गेली, पण आपण नाईट वॉचमन असलो तरी टुकूटुकू खेळायला आलेलो नाही, असा मेसेज त्यानं पद्धतशीर दिला.

पहिल्याच टेस्टमध्ये ७ विकेट्स घेणाऱ्या रेहानची आता साहजिकच चर्चा होतीये. त्याचं कारण सध्याचा परफॉर्मन्स हे तर आहेच, पण सोबतच त्याचा प्रवासही.

वडील टॅक्सी ड्राइव्हर म्हणून कमा करायचे, पण त्यांच्यासकट रेहान आणि त्याच्या दोन्ही भावांना क्रिकेटचा भयंकर नाद. तिघंही जण क्रिकेटच खेळतात. पण यात रेहानचं फ्युचर ब्राईट निघालं, वयाच्या अकराव्या वर्षी त्याला इंग्लंडच्या टॉप लेव्हलच्या बॅट्समनला नेट्समध्ये बॉलिंग करायला बोलवलं. त्यावेळी त्यानं ऍलिस्टर कुक आणि बेन स्टोक्स या दोन्ही तगड्या बॅट्समनला आऊट केलं.

पण तरीही त्याच्या नावाची सगळ्यात जास्त चर्चा झाली, ती शेन वॉर्नमुळंच.

लॉर्ड्सच्या नेट्समध्ये वॉर्ननं रेहाननं त्याला बॉलिंग करताना बघितलं आणि तेव्हाच भाकीत केलं की, ‘लवकरच आम्ही तुझ्यावर कॉमेंट्री करत असू.’ याच वर्षी अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये रेहान इंग्लंडकडून खेळला. याचवर्षी त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. वॉर्नला ज्या गोष्टीसाठी ओळखलं जायचं तीच गुगली हे रेहानचं सुद्धा बलस्थान आहे.

ज्या पाकिस्तानमध्ये तो सुट्टी घालवायला म्हणून यायचा, त्याच पाकिस्तानमध्ये त्यानं टेस्ट पदार्पण केलं, पहिल्याच मॅचमध्ये ‘फाईव्ह विकेट हॉल’ ही मिळवला. कॉमेंटेटर्स त्याच्याबद्दल बोलताना, त्याचं कौतुक करताना दमत नव्हते, फक्त या हिऱ्याची पारख करणारा शेन वॉर्न हे सगळं बघायला नव्हता.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.