हँडसम हिरो हवा म्हणून रेखाने बच्चनला सिनेमातून काढून टाकायला लावलं होतं….
अमिताभ बच्चन म्हणजे बॉलिवूडचा महानायक. शतकातला सगळ्यात मोठा हिरो म्हणून अमिताभ बच्चनला ओळखलं जातं. पडद्यामागे आणि पडद्यावर अभिनेत्री रेखासोबत त्याचं प्रेमप्रकरण चांगलंच गाजलं आणि ते अजूनही लोकांच्या चर्चेत असतं. पण एक काळ असा होता जेव्हा रेखानेच अमिताभ बच्चनला सिनेमातून काढून टाकलं होतं आणि सांगितलं होतं की एखादा हँडसम हिरो शोधा म्हणून, तर जाणून घेऊया नक्की काय किस्सा होता.
हा किस्सा म्हणजे असा आहे की बॉलिवूडमध्ये एखाद्यावर जेव्हा वाईट वेळ आलेली असते तेव्हा त्याची किंमत काय असते आणि चांगली वेळ आलेली असते तेव्हा काय किंमत असते. हा तो काळ होता जेव्हा अमिताभ बच्चन बॉलीवूड मध्ये स्थिरावू पाहत होता. आधीच रेडिओवरून आवाज चांगला नाही म्हणून आणि अशी बरीच रिजेक्शन घेऊन बच्चन वैतागलेला होता. चांगलं काम कसं मिळेल म्हणून दिग्दर्शक आणि प्रोड्युसर लोकांचे उंबरे झिजवत होता.
तो काळ होता राजेश खन्ना आणि धर्मेंद्र यांचा. सगळ्या सिनेजगतात या दोन सुपरस्टार लोकांची हवा होती. लोकांमध्ये राजेश खन्नाची अदाकारी आणि स्टाईलची चर्चा होती तर धर्मेंद्रच्या देखणेपणाचा बोलबाला होता. तोवर 12 सिनेमांमधून अमिताभने काम केलेलं होतं पण त्यापैकी फक्त 2 चं सिनेमे थेटरात पोहचले होते. या दोन सिनेमांपैकी एक सिनेमा होता आनंद ज्यात अमिताभच्या कामाचं कौतुक झालं खरं पण सिनेमा चालला तो राजेश खन्नामुळे.
1972 साली अमिताभला दुनिया का मेला नावाचा सिनेमा मिळाला ज्यात मुख्य भूमिकेत रेखा होती. अमिताभला पाहताक्षणी रेखाने सिनेमाच्या प्रोड्युसरला सांगितलं की या सिनेमात तिला एखादा हँडसम हंक हिरो हवा आहे. एखाद्या देखण्या हिरोसोबत तिला काम करायचं आहे आणि अमिताभ सोबत तिला काम करायचं नाहीए. शेवटी रेखाच्या सांगण्यावरून अमिताभला या सिनेमातून काढून टाकण्यात आलं आणि त्याऐवजी संजय खानला या सिनेमात घेण्यात आलं.
हा सिनेमा बनला खरा पण त्याला रिलीज व्हायलाच 2 वर्ष लागली. पण याच काळात अमिताभला त्याच्या करिअरची सगळ्यात मोठी फिल्म जंजिर मिळाली होती आणि अमिताभ ऑल टाइम हिट अभिनेता झाला. जंजिरमुळे अमिताभला राजेश खन्ना नंतरचा सगळ्यात मोठा सुपरस्टार मानलं जाऊ लागलं. 1973 साली नमक हराम सिनेमातून रेखा,अमिताभ आणि राजेश खन्ना एकत्र काम करताना दिसले. पण यात रेखा ही राजेश खन्नाची हिरोईन होती.
1974 साली दुनिया का मेला सिनेमा रिलीज झाला खरा पण त्या वर्षीचा तो सगळ्यात फ्लॉप आयटम ठरला. या नंतर मात्र अमिताभ बच्चनची वाढती लोकप्रियता बघून रेखा अमिताभकडे आकर्षित झाली. दो अजनबी सिनेमात अमिताभ आणि रेखाने एकत्र काम केलं आणि इथून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं.
पण हँडसम हिरोच्या नादात रेखाने अमिताभ फिल्ममधून रिजेक्ट केलं होतं.
हे ही वाच भिडू :
- बिचाऱ्या अशोक चव्हाणांना दाऊद समजून अमिताभ बच्चनला ट्रोल करण्यात आलेलं..
- देवानंदमुळे अमिताभ बच्चनला जंजीरसारखा सुपरहिट सिनेमा मिळाला…
- चुकून भरलेल्या एका फॉर्मने सुरेखा सिक्रि छोट्या पडद्यावरच्या दादीसा बनल्या….
- जत्रेत तमाशाचा फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर थेट न्यूयॉर्कला जाऊन पोहचल्या..