म्हणून बॉब मार्लेच्या गाण्यात महादेव असतोच…

अमेरिकेच्या दक्षिणेकडील कॅरीबियन समुद्रात छोटे छोटे बेट आहेत आणि त्यावर छोटे छोटे देश आहेत. एकेकाळी भारत शोधायला निघालेला कोलंबस इथ पोहचला होता आणि या देशाला भारत समजून बसला होता. त्यामुळेच या बेटांना वेस्ट इंडीज म्हणून ओळखले जाते.

याच बेटांपैकी एक देश आहे जमैका.

भारतात तेव्हा ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच राज्य होत. जगभर वसाहती बनवणे, तिथून लुटून पैसा आपल्या देशाला नेणे याची स्पर्धा सुरु होती. आणि यात सर्वात पुढे होते इंग्रज. इंग्रजांनी ठरवलं या कॅरीबियन बेटांवर शेती करायची. पण त्या बेटावरच्या नेटिव्ह इंडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासींना शेतीच ज्ञान नव्हत, म्हणूनच इंग्रजांकडून भारतातले गंगेच्या खोऱ्यातले शेतकरी गुलाम म्हणून नेण्यात आले.

साल होत १८४५, जमैकाच्या ओल्ड हार्बर बे बंदरात “मेडस्टोन” नावाचं जहाज येऊन लागलं.

अख्खा अटलांटिक समुद्र ओलांडून हे जहाज आलं होत. या जहाजात होते भारतातून आणले गेलेले गुलाम. २०० पुरुष, २७ स्त्रिया आणि ३० बालके. या भारतीयांनी पहिल्यांदा या बेटावर पाउल ठेवले. हाच तो दिवस यानंतर जमैका कायमच बदलून गेलं. त्यांच सांस्कृतिक,आर्थिक विश्व पहिले उरले नाही.

१८४० च्या दशकात हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय कामगार कॅरीबियन बेटांवर आणले गेले. त्यानी जमैका मध्ये ऊस, कॉफी या नगदी पिकांची लागवड केली. इंग्रज शेत मालकांनी त्यांचं प्रचंड शोषण केलं. शेतामध्ये राबणे आणि आपल्या दिलेल्या बराकीमध्ये दाटीवाटीने राहणे एवढच त्यांना ठाऊक होत. १९१७ पर्यंत गुलामगिरी रद्द होईपर्यंत सगळ्या कॅरीबियन बेटांवर हीच परिस्थिती होती. 

जवळपास शंभर वर्षे हे भारतीय गुलाम म्हणून तिथे होते. एवढ्या वर्षात भारतीयांनी आपली संस्कृतीची छाप तिथे उमटवली. भारतीय करी, वांगयाची भाजी, चिकन रस्सा, आंबे, भात, गाणी, डान्स, दागिने हे जमैकन कल्चर वर खूप मोठा इफ्फेक्ट केला. पण सर्वात मोठा इफ्फेक्ट केला गांजाने.

हो गांजा!! 

उत्तर भारतात बम बम भोले शंकराचा प्रसाद म्हणून भांग, गांजाचं सेवन केलं जात. हलाहल प्राशन केल्यावर त्याचा दाह सहन करण्यासाठी महादेवाने दुधात गांजाची पाने टाकून भांग बनवलं असं म्हणतात. हिमालयातल्या साधूंच्या झोळीत हमखास आढळणारा हा पदार्थ. याच्या सेवनाने जी तंद्री लागते त्यामुळे देवाशी एकरूप व्हायला मदत होते असा समज-गैरसमज त्या भागात आहे.

तर हे उत्तर भारतीय कामगार दिवसभर शेतात मरमर राबायचे पण काही क्षण हे श्रम विसरावेत शरीराला आराम मिळावा यातून गांजाचा वापर सुरु झाला. भारतीयांचा गांजा बघून जमैकाचे नेटिव्ह लोक सुद्धा त्याचं सेवन सुरु केले. काही दिवसातच स्वच्छंद आयुष्य जगण्याची सवय असणाऱ्या जमैकन बेटावर गांजा पॉप्युलर झाला.

१९३० च्या दशकात जमैकामध्ये एका नव्या धार्मिक चळवळीचा उदय झाला.

त्याचं नाव होत “रास्ताफरी”.

रास्ताफरी हा केवळ एक धर्म नव्हता तर ही एक चळवळ होती. वसाहतवाद्यांनी वर्षानुवर्षे केलेल्या शोषणाविरुद्धची चळवळ. एकच देव मानणारा हा धर्म बायबलवर विश्वास ठेवणारा तसेच माणुसकी आणि प्रेम या तत्वावर उभा असलेला होता. निसर्गावाद या एकाच नियमाचे ते पालन करत. वर्ण वंश लिंग यावरून होणारा कोणताही अन्याय त्यांना मान्य नाही.

रास्ताफरीमध्ये गांजाला पवित्र मानले गेले आहे. त्यांचा विश्वास आहे की गांजा हा देव आणि आत्मा यांना जोडणारा एक पूल आहे.

भारतीयांच्या प्रभावाने भगवान शंकर यांच्याप्रमाणे जटा वाढवणे हे सुद्धा रास्ताफरीशी जोडले गेले. सापाप्रमाणे एकमेकांत गुंतलेले कधीही न धुतले गेलेले प्रचंड वाढवलेले केस दाढी यामुळे एखाद्या अघोरी साधूप्रमाणे दिसतात रास्ताफरीचे फॉलोवर्स. पन्नास साठचे दशक येई पर्यंत या रास्ताफरीचा अख्ख्या जमैकन बेटावर प्रभाव पडला. हिरवा, काळा, पिवळा आणि लाल अशा रंगातले रास्ताफरीचे झेंडे तरुणांच्या शर्टवर दिसू लागले.

याच काळात जमैकामध्ये एका गायकाचा उदय झाला. बॉब मार्ले !! 

रेगे संगीताची क्रांती आणणारा बॉब मार्लेसुद्धा रास्ताफरी चळवळीशी जोडला गेला. आपल्या वन लव्ह, नो वूमन नो क्राय अशा गाण्यामुळे तो फेमस झाला होता. एक्सोड्स, जाह लाइव्ह अशा अल्बममुळे रास्ताफरी चळवळ त्याने जमैकाच्या बाहेर जगभरात पोहचवली.

बॉब मार्ले गांजा आणि रास्ताफरी चळवळ यांचा प्रतिक बनला. त्याचे रेगे संगीत हा या धर्माचा अॅन्थम बनले. कृष्णवर्णीयांना त्यांचा राजकीय व सामाजिक हक्क मिळावा यासाठी क्रांतीची गरज आहे. फक्त आणि फक्त प्रेमच ही क्रांती घडवू शकेल यावर त्याचा विश्वास होता.

गांजा ला मान्यता मिळावी. त्यावरची बंदी हटावी यासाठी तो आयुष्यभर प्रयत्नशील राहिला. तो म्हणायचा,

 “दारू देशाचे नुकसान करते तर गांजा देशाला मजबूत बनवते.”

एकदा एका कॉन्सर्टच्या आधी बॉब मार्लेवर खुनाचा हल्ला झाला. त्यातून तो थोडक्यात वाचला. पण त्याने कॉन्सर्ट कॅन्सल केले नाही. त्यावेळी तो म्हणाला,

“माणुसकीला काळिमा फासायच्या प्रयत्नात असणारे लोक जर सुट्टी घेत नसतील तर मी का घेऊ? ” 

आयुष्याच्या शेवटपर्यंत तो रास्ताफरीशी जोडला गेला. एकदा एक फुटबॉल सामना खेळताना झालेल्या जखमेवेळी त्याला आपल्या एका बोटाला कॅन्सर झाला आहे हे कळाले. डॉक्टरनी त्याला ते बोट तोडायचा सल्ला दिला होता पण रास्ताफरीमध्ये याला परवानगी नाही म्हणून त्याने ते उपचार करून घेतले नाहीत. याच आजाराशी लढता लढता वयाच्या ३६ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.

गंगेकाठच्या बनारस संस्कृतीशी त्याचं नात जवळच राहिलं. त्याने आपल्या एका मुलाच नाव ही रोहन ठेवल होत. त्याच्या अनेक गाण्यांमध्ये भगवान शंकराचा, भारतीय प्रतीकांचा उल्लेख येतो. “बम बम भोले, ओम नमः शिवाय”अशी गाणी बॉब मार्लेला समर्पित करण्यात आली आहेत.

प्रेम आणि संगीत जगाचे सगळे प्रश्न सोडवू शकेल असं म्हणणारा बॉब मार्ले त्याच्या जगभरातल्या फॉलोवर्ससाठी एखाद्या देवापेक्षा कमी नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.