दोन वर्षांच्या शर्यतीनंतर अखेर मुकेश अंबानींनी जेफ बेझोस यांना पाणी पाजलंय

गेल्या काही दिवसांमध्ये अदानी गृप, टाटा गृप, महिंद्रा अँड महिंद्रा, अशा भारतातल्या मोठमोठ्या कंपन्या चर्चेत आल्या. मात्र रिलायन्स कंपनी काही चर्चेत आली नाही, अशी चर्चा आम्ही सर्व भिडू करतच होतो की एक बातमी आली आणि “घ्या, नाव घेताच अंबानी आले” असं एका कार्यकर्त्यानं सांगितलं. काय घडलंय, म्हणून विचारलं तर कळलं, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अमेरिकन कंपनी ॲमेझॉन यांच्यात फ्यूचर रिटेलसाठी बऱ्याच काळापासून लढाई चालूये. याच लढाईत अंबानींनी जेफ बेझोस यांना मागे टाकल्याच्या चर्चा सुरुयेत.

नेमकं काय झालंय? अंबानी कसे बेझोस यांच्या पुढे गेलेत? रिलायन्स आणि ॲमेझॉन यांच्यात कोणता वाद सुरुय? याचाच शोध मग आम्ही घेतला आणि तोच तुमच्यासाठी घेऊन आलोय. 

सुरुवातीला बघूया नेमका वाद काय आहे?

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी म्हणजेच रिलायन्स रिटेलं. या कंपनीने फ्युचर रिटेल कंपनी खरेदी केली. रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुप यांच्यात २७,५१३ कोटी रुपयांचा करार झाला. या करारांतर्गत, फ्युचर ग्रुपने त्यांचे सर्व किरकोळ व्यवसाय, घाऊक व्यवसाय, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस विकण्याची परवानगी रिलायन्सला दिली होती.

या डीलमध्ये, भविष्यातील रिटेल सुपरमार्केट चेन बिग बाजार, अन्न पुरवठा युनिट फूडहॉल, फॅशन आणि कपड्यांचा किरकोळ कारखाना रिटेल रिलायन्स यांना विकण्याची घोषणा करण्यात आली. इथपर्यंत सगळं चांगलं चालू होतं. पण यात अचानक ॲमेझॉन कंपनी आली. का? तर ॲमेझॉन आणि फ्युचर्स यांच्यातील एका करारामुळे. 

२०२० मध्ये किशोर बियाणीच्या फ्युचर रिटेलने ॲमेझॉन या ई-कॉमर्समधील जगप्रसिद्ध कंपनीसोबत करार केला होता. या करारानुसार, ॲमेझॉनने फ्यूचर रिटेलची प्रमोटर कंपनी एफसीपीएलमधले ४९% स्टेक विकत घेतले होते. शिवाय हा करार सुमारे २००० कोटी रुपयांना झाला होता. या डील अंतर्गत असं देखील ठरवण्यात आलं होतं की, फ्युचर रिटेल त्यांचे प्रोडक्ट ॲमेझॉनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकू शकेल. 

ॲमेझॉनला फ्युचर ग्रुपमध्ये गुंतवणूक करण्याबाबत विचारण्याचा अधिकारही मिळाला होता. शिवाय तीन ते १० वर्षांच्या कालावधीनंतर, समूहाच्या प्रमुख कंपनीला फ्यूचर रिटेलमध्ये भागभांडवल खरेदी करण्याचा अधिकारही मिळाला होता. म्हणूनच रिलायन्स आणि फ्युचरच्या डीलने ॲमेझॉन आणि फ्यूचर ग्रुपमधील डीलच्या अटींचं उल्लंघन झालं असून रिलायन्ससोबत करार करण्यापूर्वी ॲमेझॉनला कळवायला हवं होतं, असं ॲमेझॉन कंपनीचं म्हणणं होतं.

अमेझॉन, रिलायन्स आणि फ्युचर्स कंपनीचा हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला. ॲमेझॉननं फ्युचर-रिलायन्स रिटेल डील थांबवावी, असा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला होता. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं ऑगस्ट २०२१ मध्ये ॲमेझॉनच्या बाजूने निकाल दिला. रिलायन्स फ्युचर ग्रुपची किरकोळ मालमत्ता विकत घेण्याच्या करारावर तात्पुरता पुढे जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. त्यानंतर रिलायन्स पुढे सरसावला आणि डील सुरु होण्यासाठी प्रयत्न करू लागला. 

अशाप्रकारे गेल्या जवळपास २ वर्षांपासून ‘कोण बरोबर?’ अशी शर्यत रिलायन्स आणि ॲमेझॉनमध्ये सुरुचं आहे. 

याच शर्यतीत आता रिलायन्सच्या अंबानींनी ॲमेझॉनच्या जेफ बेझोझ यांना मागे टाकलंय. काय झालंय? तर नुकतंच फ्युचर रिटेलने थकबाकी न भरल्यामुळे रिलायन्स रिटेलनं फ्युचरच्या जवळपास २०० स्टोअर्सवर ताबा मिळवला आहे. तर कंपनी पुढे जाऊन आणखी २५० रिटेल स्टोअर्सच नियंत्रण घेऊ शकते. आता ही आकडेवारी जर नीट बघितली तर फ्यूचर रिटेलच्या एक तृतीयांश रिटेल स्टोअरच्या समान आहे.

फ्युचर ग्रुपवर सध्या चार अरब डॉलरपेक्षाही जास्त कर्ज आहे. 

शिवाय कंपनीने फेब्रुवारीमध्ये हे देखील सांगितलं होतं की कंपनी त्यांचे ऑपरेशन्स कमी करतीये. आता रिलायन्सने या स्टोर्सवर ताबा मिळवल्यानंतर तिथल्या कामगारांचं काय झालं? असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. तर रिलायन्सने फ्यूचरच्या सर्व कर्मचाऱ्यांना तिथेच काम करण्याची संधी दिलीये. म्हणजे स्टोर्स रिलायन्सचे पण कामगार फ्यूचरचे असं चित्र बघायला मिळणार आहे. 

रिलायन्सकडून फ्यूचरच्या स्टोअर्सचा अचानक ताबा घेण्याच्या या घटनेला ‘रिलायन्सचा ॲमेझॉनवर शेवटचा वार’, असं तज्ज्ञांकडून म्हटलं जातंय. म्हणजेच आता ॲमेझॉनच्या हातात काहीच उरले नाहीये, कारण जर स्टोर्सच राहणार नाहीत तर न्यायालयात लढाई कोणत्या मुद्यावर होईल? असा तर्क लावण्यात येतोय. 

शिवाय रिलायन्सच्या या कारवाईनंतर ॲमेझॉनने हा त्यांच्यातील मुद्दा बातचीत करून, चर्चेतून सोडवण्याचा प्रस्ताव मांडलाय, ज्याला फ्युचर ग्रुपने संमती दर्शवलीये. त्यामुळे आता लवकरच या कंपन्यांमध्ये चर्चा सुरु होतील. 

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.