अंबानींच्या जिओफोन नेक्स्टचा फ्लॉप शो होऊ शकतोय

साल होतं २००३. विरेंद्र सेहवागचं नाव घेतल्यावर पहिल्या बॉलवर बाऊंड्री आणि सिक्स मारून सेंच्युरी या दोनच गोष्टी डोक्यात पक्क्या बसल्या होत्या. मग आली सेहवागची जाहिरात, ज्यात तो म्हणायचा – ‘करलो दुनिया मुठ्ठी में.’

ही जाहिरात होती रिलायन्सच्या इंडिया मोबाईलची. सामान्य माणसालाही परवडेल अशा किंमतीतला फोन म्हणत रिलायन्सनं हा फोन लॉंच केला. त्याकाळी फोनवर बोलणं हीच चैन होती. त्यामुळं फ्री डिजिटल मोबाईल, फ्री इनकमिंग, फ्री एसएमएस आणि ४० पैसे प्रति मिनिट दरानं बोलणं तेही महिन्याला ६०० रूपयांत, अशी ही ऑफर पाहून लोकांनी या फोनला दणदणीत प्रतिसाद दिला.

पण यामुळं एक झालं, सामन्यांना मोबाईल परवडू लागले. मागणी आणि पुरवठा दोन्ही वाढलं आणि मोबाईलचे रेट धापकन पडले. रिलायन्सच्या इंडिया मोबाईलला मिळणारा प्रतिसाद हळूहळू कमी होत गेला.

आता हे सगळं सांगायचा विषय काय? तर अंबानींच्याच जियोचा नवा फोन मार्केटमध्ये आलाय. त्याचं नाव ए जिओफोन नेक्स्ट.

देशाला 2G मुक्त करून 4G नेटवर्क आणि फोन्स देशभर पोहोचवण्याचं रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचं स्वप्न आहे. त्या स्वप्नपूर्तीचं पहिलं पाऊल म्हणून हा जिओफोन नेक्स्ट बाजारात आलाय. मात्र विश्लेषकांचं म्हणणं आहे की, हा फोन फ्लॉप शो ठरण्याची मजबूत शक्यता आहे.

काय आहे जिओफोन नेक्स्ट-

गुगल आणि रिलायन्सनं मिळून तयार केलेल्या या फोनची किंमत आहे, ६४९९ रुपये.  फोन १९९९ रुपयांचं डाऊनपेमेंट भरून घेता येईल, उरलेले पैसे १८ किंवा २४ महिन्यांच्या ईएमआयवर देता येतात. या फोनला चांगला प्रोसेसर आहे, सोबतच दोन सिम, ३५०० एमएएच बॅटरी आणि १३ एमपी रिअर कॅमेरा आणि ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे.

मग झोल नक्की काये?

विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, ६४९९ ही किंमत तशी जास्त आहे. याच किंमतीत इतर ब्रॅण्ड्सचे स्वस्त फोन येतात. ज्या फिचर फोन वापरकर्त्यांना समोर ठेऊन या फोनची निर्मिती करण्यात आली, त्यांच्यासाठी ६४९९ ही किंमत फार जास्त आहे. जवळपास ३७ ते ४० कोटी फिचर फोन वापरकर्त्यांसाठी ही किंमत आवाक्याबाहेर आहे. त्यातले बरेचसे जण जवळपास १२०० रुपयांचे फोन वापरत असतील.

सोबतच सध्या वापरत असलेल्या फोनपेक्षा महाग, कमी बॅटरी क्षमतेचा आणि सहज फुटू किंवा तुटू शकेल असा फोन वापरण्याचा विचार लोक करणार नाहीत, असा तज्ञांचा अंदाज आहे. गुगल आणि रिलायन्स एकत्र येऊन हा फोन तयार करत असल्यानं, याच्याकडून अनेक अपेक्षा होत्या. याची किंमत कमी असती, तर फिचर फोन वापरणाऱ्यांनी स्मार्टफोनमध्ये स्विच केलं असतं आणि या फोनला भरपूर प्रतिसाद मिळाला असता, असं विश्लेषक सांगतात.

या आधी रिलायन्सनं मार्केटमध्ये आणलेल्या जिओफोनचे फक्त १० कोटी मॉडेल्सच विकले गेले होते. त्यामुळं या नव्या फोनकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिलायन्सला चांगलीच कंबर कसावी लागणार आहे.

या फोनची किंमत बघता ७ ते ८ हजाराचे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना हा फोन जास्त आकर्षित करेल, त्यामुळं अंबानींचं 2G मुक्त भारत करण्याचं स्वप्न न मिळणाऱ्या रेंजसारखं अपूर्ण राहू शकतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.