रिलायंस कंपनी विकत घेणार या नुसत्या चर्चेनंच कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढलीये…
रिलायंस ही देशाच्या इंडस्ट्रीयल मार्केटमधल्या सर्वात मोठ्या कंपनीजपैकी एक आहे. म्हणजे, रिलायंसच्या नुसत्या नावानं एखादं प्रोडक्ट चालतं. आजवर रिलायंसने ज्या इंडस्ट्रीत हात घातला त्या इंडस्ट्रीत रिलायंसने नाव कमवलंय. जे प्रोडक्ट विकायचं रिलायंस ठरवते त्या प्रोडक्टमध्ये रिलायंसला तोड देणं कठीणच असतं. सध्या रिलायंस आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नवनवील कंपनीज विकत घेतेय.
आता रिलायंस लोटस नावाची चॉकलेट बनवणारी कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहे.
आता रिलायंस ही कंपनी विकत घेणार म्हणल्यावर मार्केटमध्ये बातमी पसरायची राहणं शक्यच नाही. ही बातमी पसरली आणि लोटस कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये वाढ झालीये. या कंपनीच्या शेअर्सला काल म्हणजे शुक्रवारी अप्पर सर्कीट लागलं. लोटस चॉकलेट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असं या शेअर्सचं नाव आहे. ५ टक्क्यांनी किंमत वाढून आता एका शेअरची किंमत १२२.९५ रुपये इतकी आहे. आता रिलायंस टेकओव्हर करणार म्हणल्यावर शेअर मार्केटमध्ये लोटस चॉकलेट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे शेअर्स विकत घेण्यासाठी ग्राहक मोठ्या उत्साहात आहेत.
‘रिलायंस रिटेल’ ५१% शेअर्स खरेदी करणार.
रिलायंस ग्रुपच्या अंडर असलेली रिलायंस रिटेल ही कंपनी लोटसचे शेअर्स विकत घेणार आहे. सध्या मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या रिलायंस रिटेलचं काम पाहतात. त्यामुळे, या डीलमध्ये ईशा अंबानींची भुमिका मोठी असणार आहे.
प्रतिशेअर भाव सुद्धा ठरलाय.
रिलायंस रिटेलने लोटस कंपनीचे ५१% शेअर्स खरेदी करण्यासाठी भाव सुद्धा ठरवलाय. ११३ रुपयांना हा भाव निश्चित झालाय. सध्या मुकेश अंबानी हे रिलायंस रिटेलचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे, ते स्वत: या डीलसाठी प्रयत्न करत असल्याच्याही चर्चा आहेत.
या कंपनीसाठी रिलायंस मोजणार ८.९४ मिलियन डॉलर्स
रिपोर्टनुसार, रिलायन्स रिटेल आणि लोटस चॉकलेटमधील हा करार जवळपास ८.९४ दशलक्षमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे रिलायन्स रिटेलने लोटस चॉकलेटमधील ५१ टक्के हिस्सा खरेदी करण्याची योजना आखली आहे. यासोबतच ओपन ऑफरद्वारे अतिरिक्त २६ टक्के स्टेक खरेदी करण्याची तयारी आहे. सध्या चॉकलेट कंपनीमध्ये प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाकडे ७२ टक्के हिस्सा आहे.
रिलायंसचा बिझनेस वाढवण्याकडे कल.
काही दिवसांपुर्वीच मुकेश अंबानी यांनी रिटेल व्यवसायात आपली रुची वाढत असल्याचं बोलून दाखवलं होतं. तेव्हापासूनच रिलायंस रिटेल वेगवेगळ्या कंपनीज विकत घेतेय. लोटस चॉकलेट कंपनीसुद्धा याचसाठी विकत घेतली जाणार आहे.
आता रिलायन्सने या कंपनीमध्ये रुची दाखवल्यामुळे या कंपनीच्या मार्केट व्हॅल्यूमध्येही वाढ झालीये.
लोटस चॉकलेट कंपनी १९८८ मध्ये टी. शारदा आणि विजयराघवन नांबियार यांनी सुरू केली होते. सध्या ही सनशाइन अलाईड इन्व्हेस्टमेंट सिंगापूर या कंपनीची उपकंपनी आहे. कंपनीचं काम आंध्र प्रदेशातल्या दौलताबाद इथे चालतं.
चॉकलेट्सकडे युवकांचा जास्त कल.
आताच्या घडीला मित्र/मैत्रिणीली प्रपोज करायचं असेल, कुणाचा वाढदिवस असेल किंवा कुणाल अॅनिवर्सरी गिफ्ट द्यायचं असेल बाकी सगळ्या गिफ्ट्ससोबत एक गोष्ट कॉमन असते… ती म्हणजे चॉकलेट. म्हणजे गिफ्ट द्यायला बजेट नसलं की चॉकलेट देणं हा बेस्ट ऑप्शन असतो. चांगलं बजेट असेल आणि काही भारी गिफ्ट घेतलं असेल तरी, त्याच्यासोबत लहानसं चॉकलेट दिलं की समोरचा खूष होतो.
इतकंच कशाला पुर्वी भाऊबीज, रक्षाबंधन या सारख्या सणांना ओवाळायच्या ताटात असलेल्या मिठाईची जागा आता चॉकलेट्सने घेतलीये. त्यामुळे, चॉकलेट्सचं मार्केट हे वाढतच राहणार आहे. त्यामुळे, रिलायंसने घेतलेला हा निर्णय भविष्यात चॉकलेटचं वाढतं मार्केट पाहूनच घेतला असावा.
रिलायंस आता चॉकलेटच्या मार्केटमध्ये उतरतंय… आणि आतापर्यंतचा रिलांसचा इतिहास बघता, रिलायंस मार्केटमध्ये उतरतंय म्हणल्यावर ते मार्केट खाणार असं दिसतंय.
हे ही वाच भिडू:
- मार्केटमध्ये सिल्क आली आणि चॉकलेट डे खिशाला महाग पडू लागला…
- आश्चर्य वाटेल पण भारतातली तिसरी सर्वात मोठ्ठी चॉकलेट कंपनी शेतकऱ्यांनी उभी केली आहे
- किसमी चॉकलेट म्हणजे आपल्या हातात आलेलं पहिलं सॉफ्ट पॉर्न होतं.