रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवायचे असेल तर हे मार्ग आहेत..

कोरोनाची दुसरी लाट आली आणि लोकांच्या फ्यूजा उडाल्या. कुणाला बेड मिळेना झालेत तर कुणाला औषधे मिळेना झालेत. त्यात मिडीया रोज नवनवी आकडेवारी मांडून लोकांना बिनकामाचा ताण देत आहे.

अशातच हाय पॉईन्टला गेलेला मुद्दा आहे तो म्हणजे रेमडेसिवीर औषधाचा. जितकं अवघड या औषधाचं नाव आहे तितकचं अवघड हे औषध मिळवायचं झालय. लोकांना एकतर हे औषध मिळना आणि मिळालच तर ते अव्वाच्या सव्वा किंमतीत पदरात पाडून घ्यायला लागतय. असो, तर आपला मुळ मुद्दा असा आहे की हे औषध कस मिळवायचं आणि कोणी मिळवायचं.

पण त्यापूर्वी कोरोनाचे बेसिक लक्षणं आणि त्यापूर्वी कोणती चाचणी करायची हा विषय पण पहायला पाहीजे कारण काय तर रेमडेसिवीर औषधासाठी परत गावभर फिरण्यापेक्षा अगोदरच त्या स्टेपला जाण्यापूर्वी काळजी घेतलेली बरी. 

कोरोनाचा मानवी शरिराशी संपर्क आल्यांनतर या रोगाची लक्षण दिसण्याचा कालावधी जागतिक आरोग्य संघटनेनुसार १ ते १४ असू शकतो. त्याचसोबत या रोगाची लक्षण दिसण्याचा सरासरी कालावधी ५ ते ६ दिवस आहे.

या रोगाची लक्षण दिसू लागताच किंवा ज्यांना लक्षण आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपल्याला कोरोना झाला आहे का नाही याची चाचणी करून घेणे गरजेचे आहे.

कोरोना चाचणी कोणती आणि कुठे करावी..? 

कोरोनाचा मानवी शरीरात शिरकाव झाला आहे का नाही हे समजण्यासाठी पुढील चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने  केल्या जातात.

या चाचण्या करण्यासाठी प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा आरोग्य केंद्र तसेच काही खासगी रुग्णालय अशा विविध ठिकाणी कोरोना चाचणी ची सोय केली आहे.

RT-PCR :

या चाचणी मध्ये नाक किंवा घसा मधून नमुने घेतले जातात.२४ ते २५ तासात या चाचणीचा अहवाल भेटतो तसेच या चाचणीचा सर्वात अचूक अहवाल भेटतो.

अँटीबॉडीज:

या चाचणी मध्ये मानवी शरीराच्या रक्ताचे नमुने घेतले जातात हे नमुने लॅब मध्ये तपासले जातात या यामध्ये प्रामुख्यने रक्ताच्या पेशीमध्ये विषाणूच्या विरुद्ध लढण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी तयार झालेल्या अँटीबॉडीजची तपासणी केली जाते.

रॅपिड अँटीजेन:

अँटीजेन हा एक विषाणूचा भाग असतो तो बाहेरूनच मानवी शरीरात प्रवेश करतो. या चाचणी  मध्ये सुद्धा घसा मधूनच स्वबचे नमुने घेतले जातात, या चाचणीचा अहवाल १५ ते २० मिनिटामध्ये भेटतो.

वरील पैकी कोणतीही एक चाचणी केल्यांनतर डॉक्टरांच्या सल्यानुसार ठरवलं जात कि घरी बसून विलगीकरणामध्ये उपचार घ्यायचे कि दवाखान्यात भरती करून उपचार घ्यायचे हे रुग्णाच्या लक्षणावरून ठरवलं जात ते किती तीव्र आहेत किंवा सौम्य आहेत.

त्याचप्रमाणे रुग्णाच्या लक्षणांच्या तीव्रतेवरूनच ठरवलं जात कि रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला द्यायचं आहे कि नाही. इथे महत्वाची गोष्ट म्हणजे रेमडेसिवीर औषध हे संबंधित रुग्णाला देणं आवश्यक आहे की नाही हा सल्ला पुर्णपणे डॉक्टर देतात. कृपा करुन आपले मित्र, हितचिंतक किंवा गुगल अशा ठिकाणावरून रेमडेसिवीर घ्यावे की नाही याचा सल्ला घ्यायचा नसतो. तो रुग्णावर उपचार करणाऱ्या संबंधित डॉक्टरांनीच घ्यायचा असतो.

आत्ता रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी शासनाने नवे निर्देश दिले आहेत ते पाहूया.

आरोग्य विभागाने रेमडेसिवीर इंजेक्शन वापरण्यासाठीचे नवीन निर्देश दिले आहेत. ज्या रुग्णाला रेमडेसिवीर द्यायचे आहे त्याच्याबद्दल सर्व वैद्यकीय माहिती देणे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर देणे बंधनकारक केले आहे.

रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता तसेच रुग्णाच्या रक्तामधील ऑक्सिजनची पातळी, ताप, रुग्णाला अशक्तपणा आहे का? धाप लागते का? पूर्वीपासून कोणता आजार आहे का? ही सर्व माहिती रुग्ण दवाखान्यात दाखल केल्या पासून देणे आता बंधनकारक केले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन कधी गरजेचं आहे आणि कुठे मिळवायचं..? 

यासाठी बोलभिडूने वैद्यकिय तज्ञ म्हणून पुणे येथील डॉक्टर अजित गायकवाड यांच्याशी संपर्क साधला.  त्यांनी संबधित प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले,

“रेमडेसिवीर इंजेक्शन त्यांना दिल जात ज्यांना खूप लक्षण आहेत किंवा काही रुग्णांना मध्यम लक्षणं आहेत पण त्या लक्षणांचा रुग्णाला खूप त्रास होत आहे.

तसेच हे इंजेक्शन कुठल्याही वयामधील व्यक्तींना दिले जाते.

प्रामुख्याने त्यांना पूर्वी कोणते आजार आहेत का? म्हणजे क्षयरोग किंवा मधुमेह असे असेल तर त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायला सांगितलं जात.

तर आता रेमडेसिवीर कसं मिळवायचे ते आपण पाहू.

सरकारी दवाखान्यामध्ये ज्या ठिकाणी कोरोना उपचार केंद्र आहे त्या ठिकाणी हे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर संबधित वैद्यकिय दुकाना मध्ये उपलब्ध आहेत.

खाजगी रुग्णालय आणि संबधित  वैद्यकीय दुकाना मध्ये देखील उपलब्ध आहेत. जर ती रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाही झाली तर तुम्ही 011 – 23978046 या किंवा १०४ या क्रमांकावर संपर्क करू शकता. 

बोलभिडू मार्फत १०४ या क्रमांकावर फोन करुन संबधित माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिल्याच रिंगमध्ये या नंबरवर संपर्क झाला. या नंबरवरून आम्हाला देण्यात आलेली माहिती अशी होती,

तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते ठिकाण, तुमचा रुग्ण ज्या ठिकाणी (उदा; जिल्हा, तालुका, पुणे शहराचा भाग, मुंबई शहराचा भाग) असे ठिकाण सांगितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणांपैकी जिथे  जिथे हे औषध उपलब्ध होत आहेत त्या ठिकाणे संपर्क क्रमांक संबधित व्यक्तिला दिले जातात.

तरिही रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाले नाही तर जिल्हानिहाय नियंत्रण संपर्क केंद्र स्थापन केली आहेत त्या ठिकाणी आपण संपर्क करू शकता असे सांगण्यात आले.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.