बाहेर पाठवलेला औषध-लसीचा साठा देशात ठेवला असता तर राज्यांना हात पसरायला लागले नसते

मागच्या अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीवरून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. हा ताण जसा आरोग्य कर्मचाऱ्यांवर आहे तसाच आरोग्य साधनांवर देखील जाणवत आहे. रुग्णांना बेडसाठी धावपळ करायला लागल्याची, आणि त्यानंतर देखील बेड न मिळाल्याच्या बातम्या येत आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा देखील जाणवत होता.

त्यासोबतच ऑक्सिजनचाचा तुटवडा, आणि रेमडीसीवीरची कमतरता यावर देखील राज्यांकडून सातत्यानं पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तर ऑक्सिजनसाठी अक्षरशः केंद्राच्या पाया पडायलाही तयार असल्याचं म्हंटलं.

दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारनं मागच्या काही काळात ऑक्सिजन, रेमडीसीवीर इंजेक्शन, आणि लस या सगळ्या वस्तूंची केलेली निर्यात हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना बऱ्याच टीकेला देखील सामोर जावं लागलं. हि निर्यात केल्यामुळेच देशात तुटवडा निर्माण झाला असल्याचं सांगण्यात आलं.

त्या पार्श्वभूमीवर नेमक्या कोणत्या गोष्टीची केंद्र सरकारनं परदेशात किती निर्यात केली हे पाहणं महत्वाचं ठरतं. 

नेमक्या कोणत्या, किती, वस्तूंची केंद्र सरकारनं परदेशात निर्यात केली?

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन :

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रेमडीसीवीरच्या आधी गेमचेंजर म्हणून ओळखलं मिळालेलं औषध म्हणजे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन. या औषधाचं उत्पादन भारतात होत असल्यामुळे त्यावेळी जगभरातील विविध देशांनी याची मागणी केली. यात अगदी अमेरिकेपासून बांगलादेश पर्यंतच्या देशांचा समावेश होता. अमेरिकेन तर औषध द्या, म्हणून धमकीच दिली होती.

मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांच्या काळात भारतानं तब्बल २०  देशांना हे औषध निर्यात केलं. यात अमेरिका, बांगलादेश सोबतच ब्राझील, स्पेन, जर्मनी, नेपाळ,भूतान, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशांचा समावेश होता. 

अमेरिकेला तब्बल ३ कोटी डोस भारतानं पाठवले होते. त्याबद्दल तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार देखील मानले होते. तसेच हे उपकार कायम लक्षात ठेऊ असं म्हणाले होते.

सोबतच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन न्येतन्याहू, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो आणि मालदीवच्या प्रमुखांनी देखील ट्विट करत भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर आभार मानले होते. आणि कोरोनाला हरवण्यासाठी भारत खरा मित्र असल्याचं सांगितलं होत.

रेमडीसीवीर : 

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन नंतर साधारण सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये कोरोनावर जगभरात रेमडीसीवीर औषधाचा वापर सुरु झाला. भारतात देखील त्याच दरम्यान याच उत्पादन आणि विक्री सुरु झाली होती. तत्पूर्वी ते बांगलादेशमधून आयात केलं जात होत.

केंद्रानं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात रेमडीसीवीरच उत्पादन सुरु झाल्यानंतर पुढच्या ६ महिन्यांमध्ये म्हणजे मार्च २०२१ पर्यंत जगभरातील वेगवेगळ्या १०० देशांना जवळपास ११ लाख डोस निर्यात केले गेले. यातील बहुतांश डोस हे भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान निर्यात केले होते. 

याच दरम्यान भारतात जवळपास ३५ लाख रेमडीसीवीर इंजेक्शन पुरवली गेली. यातील ३० लाख खाजगी आणि ५ लाख सरकारी हॉस्पिटल्सला पुरवली होती.

भारतात ७ कंपन्यांना रेमडीसीवीर इंजेक्शन उत्पादनाची परवानगी आहे. तर या कंपन्यांची उत्पादन क्षमता ३८ लाख ८० हजार डोस प्रतिमहिना अशी होती. मात्र मार्च आणि एप्रिलनंतर देशात कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाल्यानंतर प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यानंतर या इंजेक्शनच्या निर्यातीला बंदी घालण्यात आली असून या कंपन्यांची उत्पादन क्षमता देखील वाढवण्यात आली आहे.

ऑक्सिजन 

वाणिज्य विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार,

एप्रिल ते जानेवारी या कालावधीत ९ हजार २९४ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्यात करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा आकडा दुपटीपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४ हजार ५०२ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्यात करण्यात आला होता. हा सगळा साठा द्रवरुपात होता. त्याचा वापर औद्योगिक आणि वैद्यकीय या दोन्ही कारणांसाठी केला जाऊ शकत होता.

निर्यात करण्यात आलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी ९५ टक्क्यांहून अधिक निर्यात एकट्या बांग्लादेशाला करण्यात आली आहे. बांगलादेशला तब्बल ८ हजार ८२८ मेट्रिक टन ऑक्सिजन भारताकडून देण्यात आला.

गेल्या काही वर्षांपासून बांगलादेश भारताकडून आयात करत असलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी कमी होत गेलं. मात्र कोरोना संकट येताच बांगालदेशानं ऑक्सिजनची आयात वाढवली. सुरुवातीला बांगलादेशानं प्रामुख्यानं औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन मागवला. पण त्यानंतर वैद्यकीय कारणांसाठी देखील ऑक्सिजनची आयात करत आहे.

लस : 

परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार लसमैत्री या उद्देशात भारतानं आज अखेरपर्यंत ९४ देशांना तब्बल ६ कोटी ६० लाख १३ हजार लसींच्या कुप्यांची निर्यात करण्यात आली आहे.

यातील जवळपास १ कोटी लसीच्या कुप्या या देशांना भारताकडून मदत म्हणून देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित लसी खरेदी करण्यात आल्या आहेत.

यात सर्वाधिक म्हणजे १ कोटी लस कुप्यांचा पुरवठा बांग्लादेशला केला आहे. तर म्यानमार ३७ लाख, नेपाळ २४ लाख ४८ हजार, भूतान ५ लाख, श्रीलंका १२ लाख, कॅनडा ५ लाख अशा कुप्यांची निर्यात करण्यात आली आहे. 

या सगळ्या निर्यातीमुळे एका बाजूला जरी भारताचे परराष्ट्र संबंध मजबूत झाले असले तरी दुसऱ्या बाजूला सध्या देशात याच निर्यात केलेल्या गोष्टींचा तुटवडा मोठया प्रमाणावर जाणवत आहे. रेमडीसीवीर आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी नातेवाईक अक्षरशः वणवण भटकत आहेत. त्यामुळेच हा साठा जर देशात राहिला असता तर आज आरोग्य आणीबाणीत रुग्णांच्या नातेवाईकांना आणि राज्यांना हात पसरण्याची वेळ नक्कीच आली नसती असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.