बेगम अख्तर यांनी सिगरेटच्या पाकीटसाठी अक्खी ट्रेन स्टेशनवर थांबवून ठेवली होती !

प्रख्यात शायर कैफी आझमी यांनी एकदा गझलेबाबतीत म्हंटलं होतं,

“गझलेचे २ अर्थ होतात. एक म्हणजे गझल आणि दुसरा म्हणजे बेगम अख्तर”

आझमी साहेबांनी  बेगम अख्तर यांच्यासाठी वापरलेल्या या शब्दांवरून बेगम अख्तर नेमकं काय रसायन असलं पाहिजे, हे आपल्याला लक्षात यावं.

‘ए मोहोब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ असेल किंवा ‘वो जो हम में तुम में करार था’ असेल यांसारख्या अनेक गझलांनी  बेगम अख्तर यांना गझलेच्या इतिहासात अजरामर करून ठेवलंय.

संगीताच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारकडून त्यांचा ‘संगीत नाटक अकादमी’, ‘पद्मश्री’आणि ‘पद्मभूषण’ देऊन सन्मान करण्यात आला होता.

बेगम अख्तर यांच्या गजला आजही मोठ्या प्रमाणात ऐकल्या जातात. त्यांच्या गजलांविषयी खूप काही लिहिलं बोललं गेलंय. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही खास किस्से ‘बोलभिडू’च्या वाचकांसाठी !

बेगम अख्तर यांनी ‘पाकिजा’ ६ वेळा बघितला  होता ! 

चेनस्मोकर असणाऱ्या बेगम अख्तर यांच्याविषयी असं सांगितलं जातं की सिगरेटच्या चक्करमध्ये त्यांनी ‘पाकिजा’ हा चित्रपट ६ वेळा बघितला होता. झालं असं की त्या चित्रपट बघायला बसायच्या आणि मध्येच त्यांना सिगरेटची तल्लफ व्हायची. झालं, बेगम अख्तरमध्येच उठून जायच्या आणि चित्रपट अर्धवट राहायचा.

सिगरेट पिण्यासाठी म्हणून थेटरच्या बाहेर गेलेल्या काळात जो काही चित्रपट पुढे सरकलेला असायचा,तेवढा भाग त्या पुढच्या वेळी पुन्हा बघायच्या. त्यामुळे ‘पाकिजा’ ६ वेळा बघितल्यानंतच हा चित्रपट त्यांच्या पूर्ण बघण्यात आला.

बेगम अख्तर यांच्या सिगरेटच्या व्यसनासंदर्भातला अजून एक असाच किस्सा संगीतला जातो की बेगम अख्तर एकदा एका ट्रेनमधून प्रवास करत होत्या आणि त्यांच्याकडच्या सिगरेट संपल्या होत्या. एका स्टेशनवर जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा बेगम अख्तर यांनी गार्डला शंभर रुपये दिले आणि आपल्यासाठी सिगरेटचं पाकीट घेऊन यायला सांगितलं.

ट्रेनमधल्या गार्डने अख्तर यांना सिगरेट आणून द्यायला स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतर त्यांनी गार्डच्या हातातला झेंडा हिसकावून घेतला आणि सांगितलं की जर सिगरेट मिळाली नाही, तर ट्रेन पुढे जाणारच नाही. नाईलाजाने त्या गार्डने बेगम अख्तर यांना सिगरेटचं पाकीट आणून दिलं आणि मगच ती ट्रेन पुढे गेली. सिगरेट मिळेपर्यंत ट्रेन स्टेशनवरच थांबली होती.

दारूबद्दल त्या म्हणायच्या, “अच्छी शराब अच्छे गिलास में ही पीनी चाहिये 

बेगम अख्तर एकदा आर्मीच्या एका कार्यक्रमासाठी सीमेवर गेल्या होत्या. परत येताना जवानांनी त्यांना व्हिस्कीच्या काही बॉटल दिल्या होत्या. काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांनी एका बोट हाउसवर त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती.

बोट हाउसवर पोहोचल्यानंतर बेगम अख्तर यांनी व्हिस्कीच्या बॉटल काढल्या आणि वेटरला ग्लास आणायला सांगितले. वेटरने ग्लास तर आणून दिले पण त्यांना काही वेटरने आणून दिलेले ते ग्लास आवडले नाहीत.

त्यावेळी त्यांच्यासोबत रिटा गांगुली सुद्धा होत्या. रिटा जेव्हा त्यांच्यासाठी पेग बनवायला लागल्या, त्यावेळी त्यांना थांबवत बेगम अख्तर म्हणाल्या,

“जरा नीचे जाके देखो कोई अच्छी गिलास है या नही..? अच्छी शराब अच्छे गिलास में ही पीनी चाहिये”

रिटा गांगुली यांनी त्यांच्यासाठी ‘अच्छी’ गिलास मागवली आणि पुढे अर्ध्या रात्रीपर्यंत त्यांची महफिल सजली. त्यावेळी बेगम अख्तर यांनी सुप्रसिद्ध “कल चौदहवी की रात थी” देखील गायलं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.